Home > Max Woman Blog > काळावर उमटवते स्वत:चा ठसा…

काळावर उमटवते स्वत:चा ठसा…

पतीची सरकारी नोकरी असलेल्या ठिकाणी २० वर्षे निवास करूनही रत्नाबाई अपसुंदे या आपल्या अंध सासऱ्यांच्या सेवेसाठी गावाकडे आल्या. गावी येऊन घरची जबाबदारी पार पाडत शेतीत स्वत:चं अस्तित्व निर्माण करणार्‍या रत्नाबाई अपसुंदे यांचा प्रवास आज जाणून घेणार आहोत

काळावर उमटवते स्वत:चा ठसा…
X

पाडेगाव (ता. दिंडोरी) येथील बाबुराव अपसुंदे यांच्याशी १९७१ मध्ये रत्नाबाई यांचा विवाह झाला. पती पोलिस खात्यात नोकरीला होते. पतीच्या नोकरीमुळे बाहेरगावीच वास्तव्य करावे लागत होते. तब्बल २० वर्षे नाशिक भागातील मनमाड, मालेगाव, वणी, नाशिक अशी वेगवेगळ्या ठिकाणी बाबुराव यांची बदली होत राहिली. त्या काळात रत्नाबाईही फिरतीचे बिऱ्हाड घेऊन त्यांच्यासोबत होत्या.

पुढे घडलेल्या काही घटना ह्या रत्नाबाईंच्या आयुष्याला एक नवीन वळण देणाऱ्या होत्या. एका आजारामुळे सासऱ्यांना अंधत्व आले होते. शिवाय पुढील काही वर्षांतच सासूबाईंचे निधन झाले. पतीच्या नोकरीमुळे दोघांना गावी येणे शक्य नव्हते त्यामुळे पती बाबुराव यांनी रत्नाबाईंना मुलांसोबत आपल्या सासऱ्यांकडे गावी जाण्यास सांगितले. १९८९ साली रत्नाबाई गावी आल्या आणि बाबुराव यांची पीएसआय पदावर बढती होऊन ते मुंबईला राहण्यास गेले. गावी येऊन रत्नाबाई मुलं आणि सासरे या सर्वांची जबाबदारी आनंदाने पार पडत होत्या. मुख्य म्हणजे त्यांना सरकारी निवास सोडून गावी येऊन राहण्यात कुठलाही कमीपणा वाटत नव्हता. त्यांनी या परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहिले. गावी नदीलगत सासऱ्यांची ३ एकर शेती होती. रत्नाबाईंना देखील आधीपासूनच शेतीची आवड होती. या शेतीतून आपली एक ओळख तयार करण्याचा त्यांनी ध्यास घेतला.

या जमिनीत मिरची, कोबी या भाजीपाला पिकांची लागवड करून सुरुवात केली. सुरुवातीला शेतरस्त्याची एक अडचण होती. शेताकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यांना निळवंडी मार्गे ३ किलोमीटर रोज पायी जावे लागत असे. सुरुवातीच्या काळात रत्नाबाईंची तारांबळ होत होती. सासरे अंध असल्याने त्यांची अतिशय व्यवस्थित काळजी घ्यावी लागत असे. सोबत मुलगी आणि दुसरा मुलगा लहान असल्याने त्यांचीही जबाबदारी होती. मोठा मुलगा रवी तेव्हा ८वीत असल्याने त्याची मदत होत होती. या सगळ्या धावपळीत एक गोष्ट ताईंच्या मनाला उभारी देत होती ती म्हणजे आपल्या सासऱ्यांची सेवा आज करायला मिळतेय ही त्यांच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट होती. त्यांच्यामुळेच या शेतीसोबत त्यांचे एक नाते तयार झाले होते. पुढे दीड एकर क्षेत्रात द्राक्षबाग लावला. सुरवातीला उत्पादनाला भाव कमीच मिळत होता. सर्व उत्पादन स्थानिक बाजारपेठेत जायचे. त्या वेळी शेतावर विहीर नव्हती. नदीच्या पाण्यावर शेतीचे काम सुरु होते. पुढे शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून विहिरीचे काम सुरु केले. या विहिरीसाठी रत्नबाईंनी स्वतः रोजावर असलेल्या मजुरांसोबत काम केले. १९९२-९४ ला नवीन जमीन खरेदी केली. त्यासाठी नदीवरुन पाईपलाईन केली. नवीन ३ एकर जमिनीत २००० साली ओनरूटचा बाग लावला. दरम्यान सासऱ्यांचे निधन झाले ही घटना अस्वस्थ करणारी होती. पुढे मुलं मोठी होत होती तशी त्यांचीदेखील या सर्व कामांमध्ये मदत होत होती. २००९ मध्ये द्राक्षतज्ज्ञ मंगेश भास्कर यांच्याशी लहान मुलगा सचिन यांची भेट झाली. त्यांचे द्राक्षशेतीसाठी चांगले मार्गदर्शन मिळू लागले आणि त्यांच्याच माध्यमातून सह्याद्री फार्म्ससोबत या कुटुंबाची नाळ जोडली गेली. आज एकूण १२ एकर क्षेत्र असून ३० टन द्राक्षांची निर्यात केली जात आहे. सासऱ्यांची सेवा आणि तीनही मुलांचे शिक्षण संगोपन करत असताना दुसरीकडे शेतीत जिद्दीने कष्ट करीत रत्नाबाईंनी या शेतीलाच आज कुटुंबाचा मुख्य आर्थिक स्रोत बनवून दाखवला. आज या टप्प्यावर त्यांच्या मनात सासऱ्यांविषयी कृतज्ञतेची भावना दाटून येते. कारण त्यांच्यामुळेच रत्नाबाईंची शेतीशी नाळ जोडली गेली. सासऱ्यांच्या आशिर्वादातूनच प्रतिकुलतेशी लढण्याचे बळ मिळाल्याचे त्या आवर्जून नमुद करतात.

Updated : 27 Sep 2022 4:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top