Home > Max Woman Blog > WorldBreastfeedingWeek : सासुमाय सुनाचं बाळंतपण कराना

WorldBreastfeedingWeek : सासुमाय सुनाचं बाळंतपण कराना

WorldBreastfeedingWeek : सासुमाय सुनाचं बाळंतपण कराना
X

बाई गरोदर राहीली की, कधी सातव्या महिन्यात तर कधी नवव्या महिन्यात बाळंतपणासाठी माहेरी जास्त जाते. क्वचित प्रसंगी महिलांची बाळंतपणे सासरी होतात. सध्या करोनाची परिस्थिती असल्या कारणाने पुणे मुंबई किंवा 500 किमी वर दूर माहेर असणाऱ्या गरोदर महिलांना बाळंतपणासाठी जाता नाही आले. यामुळे जास्तीत जास्त महिला ह्या नवऱ्याच्या घरीच बाळंतपणासाठी राहिल्या आहेत.

यामुळे साहजिकच या बाळंतपणाचा भार सासूवर येऊन पडला. या सासूला आता दाई अन् माई अशी दुहेरी भूमिकेतून अशी सुनेची बाळंतपणे करावी लागणार आहेत. त्यात सुनेला कितीही वाटलं की, दायीच्या जीवावर बाळंतपण थोडच आसतंय ! कळा तर आपल्यालाच द्यायच्या असतात त्यात सासुला ही आपल्या सोन्यासाठी दुसऱ्याची चिंधी आली असं वाटत असलं तरी पोटाच्या बाहीर गोळा पडुस्तर माय बहिनीची एकच रित जाणून या करोना काळात बाळंतपणाच्या निमित्ताने सासू-सूनेचं नातं नव्याने समजून घेण्याची ही संधी आहे.

या बाळंतपणाच्या निमित्ताने जेव्हा सून डिलेव्हरी वार्ड मध्ये जातेय त्या अगोदर सासूला स्वतःच्या मुलीसारखीच तयारी करावी लागणार आहे. बाळंतपणाला घेऊन जाताना ती सून नाँर्मल बाळंतीण होणार आहे की, सिझेरियन ने हे माहिती नसतं यामुळे बाळंतपणात लागणरे साहित्य कपडे मग गाऊन असेल लेकराचे बाळुते (बाळवते) बाळंतिणीच्या अंगावरून जात असतं यामुळे तिला लागणारे #धट्टे (आतील पँड) ती कापडं स्वच्छ धुऊन घेतली पाहिजेत. छातीचं अतिरिक्त दूध पिळण्यासाठी वेगळे कपडे सोबत खोबरेल तेल साबण आरसा (कंगवा टिकली कुंकु) दुपट्टं डब्बा ताट तांब्या चमचा असं लागणारं साहित्याची तयारी करून ठेवावी. वली बाळंतिण ही "येली गाय अन् काटे खाय" अशी अवस्था असल्याने, दिवसातून बऱ्याच वेळा भूक लागत असते यामुळे होईल तेवढा आहार तिला दयावा लागतो हे लक्षात घेऊनच तिला खाऊ घालावं. लेक बाळंतपणाला आणल्यास #डिगवडा_सुटवडा करतो ना तसा यावेळी सुनेसाठी करावा. लेकीला दूध यावं म्हणून काळ्या तिळाची भाजी खास करून खसखसीचं कालवण वजडीचं कालवण खाऊ घालावं मान्य आहे. आम्हाला तुमच्या काळात तुम्ही बाळंतिण झाल्यास खायला नव्हतं मिळत म्हणून तुम्ही मीठ साखरेचं पाण्यात भाकर चुरून त्यात तेलाचा काटा टाकुन खायच्यात कणी कोंड्यावर लेकरं मोठी केलीत. पण आता भेटतयं तर आपण खाऊ घातलं सुनबाई तर ती नक्कीच जाणीव ठेवेल. तसेच ती समजून घेईल की आपला नवरा आभाळातनं नाही पडला तर सासुनेही आपल्यासारखच तिचा लेक सुद्धा नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवला आहे.

असं निरीक्षणात आढळून आलं आहे की, एक स्त्री जेव्हा सासू होते तेव्हा तिला या व्यवस्थेत जरा जास्त अधिकार मिळतात तेव्हा या व्यवस्थेची वाहक न बनता थोडीशी दुर्वाहक बनत सुनेचं बाळंतपण करत सासु सुनेचं नातं सुंदर पद्धतीने फुलवावं जेणेकरून सुनेला सासरवास हा सासुरवास (छळ) न वाटता ती आनंदी राहील लेकरू बाळसेदार राहील महत्वाचे.... जर घरात दोघेच नवरा बायको/जोडीदार राहत असतील तर पुरूष सुद्धा बांळतपण करू शकतात बरं का !

  • सत्यभामा सौंदरमल

    निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था बीड

Updated : 7 Aug 2020 2:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top