Home > Max Woman Blog > सोप्पं नसतं एक बाप होणं – दिग्दर्शक प्रकाश झा

सोप्पं नसतं एक बाप होणं – दिग्दर्शक प्रकाश झा

प्रकाश झा… फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नाव... मात्र, त्यांची मुलगी दिशा बाबत तुम्हाला माहिती आहे का? कदाचित तुम्हाला हे देखील माहिती नसेल प्रकाश झा यांनी दिशाला दत्तक घेतलं...प्रेम–वात्सल्याच्या छायेत तिचं संगोपन करून तिला या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. त्या अभिनेता, दिग्दर्शक प्रकाश झा यांचा बाप होण्याचा प्रवास नेमका कसा होता? या संदर्भात मनोरंजन विश्वातल्या ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी प्रकाश झा यांची घेतलेली मुलाखत नक्की वाचा...

सोप्पं नसतं एक बाप होणं – दिग्दर्शक प्रकाश झा
X

मी त्यावेळेस पुण्याच्या फिल्म्स एन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटयूटमध्ये शिकत होतो. बिहारहून पुण्याला आलो आणि एफ टी आयमध्ये प्रवेश घेतला तेंव्हा अर्थपूर्ण सिनेमांची निर्मिती करायची. अशी स्वप्नं उरी बाळगून असताना एका लघुपटासाठी लहान मुलांच्या अनाथ आश्रमात जाण्याचा योग आला.. ह्या अनाथ आश्रमातील निरागस जग बघून मला जाणवलं, ही अनाथ मुलं पोटाच्या भूकेपेक्षा माणसांच्या वात्सल्याला -प्रेमाला पारखी असतात. त्या अनाथ आश्रमात बागडणाऱ्या बालिकांना पाहून मी तेंव्हाही स्तबद्ध झालो, भविष्याच्या उदरात काय असेल ह्याची ह्या अबोध बाळांना कल्पना नव्हती, पण त्यांचं निर्मळ हास्य माझ्या मनात घर करून केलं ! ज्या काळात मुलींचा जन्म नकोसा होता, त्याच काळात मी निश्चय केला, मी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यावर मी मुलीला दत्तक घेईन !

जीवन आणि करियरच्या पुढच्या टप्प्यावर दीप्ती (नवल ) माझ्या जीवनात आली, १९८५ मध्ये आम्ही विवाह केला. दीप्ती आठ महिन्यांची गर्भवती असताना तिचा गर्भपात झाला ! दीप्ती आणि माझ्यात कधीही गंभीर मतभेद नव्हते. आमच्या वैवाहिक जीवनात मला मुलगी दत्तक घेण्याची इच्छा फार पूर्वीपासून आहे हे दीप्तीलालाही ठाऊक होतं. १९८७ मध्ये मी आणि दिप्तीने संयुक्तपणे मुलीला दत्तक घेण्याचे ठरवले. १९८८ मध्ये मी दिल्लीच्या दूरदर्शनसाठी काही मालिका दिग्दर्शित करत होतो. १९८८ मध्ये एका स्वयंसेवकांकडून मला समजले, की अवघ्या १० दिवसांचे एक अर्भक सिनेमा थिएटर मध्ये सापडले असून ह्या अनाथ बालिकेला इन्फेक्शन झाले असून ती लहानगी तेंव्हा आजारी होती ! हे ऐकून माझं मन हेलावलं ! आणि योग्य त्या परवानगी मिळवून ह्या लहानगीला मी घरी आणले ! डॉक्टर नर्सेस यांची मदत घेऊन तिला चांगली ट्रीटमेंट दिली. १२-१५ दिवसांत ही चिमुकली बरी झाली. पण ह्या १५ दिवसांच्या काळात मला ह्या गोंडस -निरागस छकुलीने इतका लळा लावला की कायद्याने अधिकृतपणे मी तिला दत्तक घ्यावे असं ठरवलं. मी कामानिमित्त तेंव्हा दिल्लीत तर दीप्ती तिच्या फिल्म्सच्या शूटिंगसाठी मुंबईत होती. दिप्तीला मी ह्या मुलीस दत्तक घेतोय असं सांगितल्यावर ती दिल्लीत आली आणि आम्ही दोघांनी अधिकृतपणे आई-वडील म्हणून अडॉप्शन पेपर्सवर सह्या केल्यात. दिप्तीलाही ह्या आमच्या लेकीने आपलंसं केलं. दीप्तीनेच आमच्या मुलीचे नामकरण दिशा असे केले. १९८८ चौ उत्तरार्धात दीप्तीचे आणि माझे तात्विक मतभेद होऊ लागले होते.. आम्ही पुढे विभक्त झालोही परंतु दिशाच्या पालन पोषणात दीप्तीचाही सहभाग होता हे नक्की !

दिशाला आम्ही दत्तक घेतले ते पूर्ण वर्ष मी तिची अतिशय काळजी घेतली. तिला आंघोळ घालणे, तिला औषध देणे, तिला तीट पावडर लावणे ह्या बाळाला आरंभी वाढवण्याच्या सगळ्या कामात मला गती येऊ लागली. माझ्याकडे त्या काळात मारुती ८०० गाडी असे. मी ड्राइव्ह करतांना दिशाला वेताच्या मोठ्या बास्केटमध्ये बाजूच्या सीटवर ठेवत असे आणि शूटिंगच्या स्थळांवर नेत असे. माझे काम आणि दिशाला सांभाळणे मी ममतेने -हौसेने आणि कर्त्यव्य भावनेने केले. त्यानंतरच्या काळात मला दिल्लीत खास असे प्रोजेक्ट्स उरले नाहीत. दामूल सारख्या फिल्म्स मी एन एफ डीसीमधून केल्यात, त्या नंतर सक्रिय नव्हत्या, आणि मुंबईच्या व्यावसायिक सिनेमाचा मी त्या काळात हिस्सा नव्हतो ! दीप्ती आणि मी विभक्त झालो होतो ! मी माझ्या मूळ गावी पाटणा (बिहार )ला जायचे ठरवले. पाटण्याला जाऊन पूर्ण वेळ दिशाला द्यायचे ठरवले. पाटण्याला जाऊन एन जी ओ सुरु करावा, सामाजिक कार्य करावं आणि दिशाला सांभाळावं. मी पाटणा गाठलं. दिशा आणि माझी आई यांची छान गट्टी जमली! तोपर्यंत माझी लेक साडे चार वर्षांची झाली होती. दुर्दैवाने त्यानंतर माझ्या आईचं निधन झालं ! माझा मानसिक आधार गेला पण दिशाला सर्वस्व पणे सांभाळणारी आईचं निधन मला मोठ्या संकटात टाकून गेलं.

माझ्याकडेही म्हणावं तसं काम नव्हतं ! मग मी नाईलाजाने दिशाला घेऊन मुंबईला गाठली. तिला सांभाळणं आणि नवं काम शोधणे हे त्याकाळात काम असे माझे मुंबईत. मला राहण्यासाठी घर देखील नसे. ३-४ महिने मी गोल्डन मनोर ह्या हॉटेलमध्ये राहिलो. नंतर मी दिशाला पांचगणीच्या संजीवनी शाळेत प्रवेश घेतला ! दिशा तेंव्हा फारच लहान होती. शाळेने मला तिच्यासह शाळेच्या वसतिगृहात रहाण्याची परवानगी दिली ! ८-१० दिवसांनी दिशा त्या वातावरणाला-शिक्षकांना सरावली आणि मी थोडासा निर्धास्त होऊन मुंबईला आलो !

१९९५-९६मध्ये मला 'मृत्यूदंड' सिनेमा मिळाला आणि हळहळू कारकीर्द वेग घेऊ लागली ! दिशाला पांचगणीला भेटण्यासाठी मी दर सप्ताहात जात असे. दीप्ती देखील शुटिंगमधून वेळ काढून दिशाला भेटायला जात असे. तिचे खूपसे वाढदिवस आम्ही कधी मुंबई तर कधी पांचगणीला साजरे केलेत. दिशाने १३-१४ व्या वर्षात पदार्पण केले आणि मग दिप्तीने तिचा ताबा घेतला. त्या मायलेकींचे संभाषण भेटीगाठी वाढल्या. दिशा हळूहळू मोठी होत चालली आणि आपले प्रश्न -हितगूज ती तिच्या आईशी (दीप्ती ) शेयर करू लागली.

दिशाने तिच्या वयाची १२ वर्षे पूर्ण केलीत आणि मी तिला विश्वासात घेऊन ती माझ्या आणि दीप्तीच्या आयुष्यात कशी आली हे सांगितलं ! तिला अंधारात ठेवले नाही. पण ती प्रेमाने मला बिलगली !

दिशा मुंबईत माझ्या घरी येऊन सुट्ट्यांमध्ये राहू लागली. पिता म्हणून मी तिची गम्मत करत असे, आपल्या वाढत्या वजनावर लक्ष दे, व्यायाम कर, वाचन वाढव असं मी नेहमी सांगतो तिला. दिशाला वाढवताना कधी कुठल्या आजारपणाला, समस्यांना मला तोंड द्यावं लागलं नाही. तिने १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर मला आणि दीप्तीला( दिशाने )सांगितलं, तिलाही आमच्याप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्यात स्वारस्य आहे. आम्ही तिला कायमच प्रोत्साहन दिले. दिशाला अगोदर म्युझिकमध्ये करियर करण्याचा विचार होता, तिने क्लासिकल ट्रेनिंग देखील घेतलं, पण आमच्या होम प्रोडक्शन फिल्म्स साठी ती कॉस्ट्युम्स बनवू लागली आणि लक्षात आलं , दिशाला फॅशन -कॉस्ट्युम डिझायनिंगमध्ये खूप रस आहे. तिने माझ्या फिल्मसाठी कलाकारांचे कॉस्टयुम्स बनवायला आवडीने सुरुवात केली, आणि हा प्रवास पुढे स्क्रिप्ट्स आणि प्रोडक्शन अर्थात कार्यकारी निर्माती पर्यंत पोहचला. दिशाने 'फ्रॉड सैय्या' हा ह्या सिनेमाची निर्मिती केली, २-३ कथा लिहिल्यात, लवकरच माझी लेक पूर्णपणे निर्माती म्हणून स्वतःची स्वतंत्र कारकीर्द सुरु करतेय, तिच्या पुढील फिल्मचे नाव ' ड्रामा क्वीन ' आहे।. एडिटिंग -प्रोडक्शन यात ती रस घेतेय याचा मला नितांत अभिमान आहे ! स्वतंत्र राहून बघण्याची हौसही ती सध्या भागवून घेतेय. सावलीत न राहता खुल्या आकाशाचा अनुभव ती घेतेय.. तिला तिच्या जीवनात काय करायचे आहे हे तिने स्वतःहून ठरवल्याचा आनंद अधिकच आहे.

दिप्तीला साहित्य - कविता यांचं अंग -अभिरुची आहे, ह्याचा कल हळहळू दिशात दिसतोय. पण आमची आवड दिशामध्ये मुद्दामहून रुजवणं ह्यापासून आम्ही दूरच राहिलो. पण दिशाने तिच्या इच्छेनेंस्वेच्छेने करियरची निवड केलीये. आणि माझ्या आणि दीप्तीप्रमाणेच आमच्या लेकीला स्वातंत्र पसंत आहे.. तिला एक स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे आणि त्या दिशेने दिशाचा प्रवास घडतोय ह्याचा ह्या पित्याला समाधान आहे.

पूजा सामंत

(मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. )

Updated : 21 Jun 2021 5:11 AM GMT
Next Story
Share it
Top