Home > Max Woman Blog > कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी परसबागेची अभिनव संकल्पना…

कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी परसबागेची अभिनव संकल्पना…

कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी सकस आणि पौष्टिक अन्न मिळणे गरजेचे आहे. पण झोपडपट्टीमधील लोकांना अन्नाची वानवा असतांना त्यांना पौष्टिक अन्न कसे परवडणार हा प्रश्न आहे. पण याच प्रश्नावर राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने अभिनव प्रयोगाद्वारे उत्तर शोधून काढले आहे. त्यामुळे आता अनेक गरिबांच्या ताटात सकस आहार उपलब्ध होऊ लागला आहे, या अनोख्या प्रयोगाची माहिती देणारा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा लेख

कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी परसबागेची अभिनव संकल्पना…
X

राजकारणात येण्याच्या आधीपासून मी एक बातमी नेहमी नियमितपणे वाचत आलीय, कुपोषणाने देशभर बालकांचे-मातांचे मृत्यू होतायत. अशा बातम्या वाचल्या की जीव अस्वस्थ व्हायचा. आजही अशा बातम्या आल्या की झोप लागत नाही. साधारणतः माध्यमांमध्ये अशा बातम्यांचे होणारे वार्तांकन अनेकदा संवेदनशील नसते, काहीच माध्यमे अतिशय शास्त्रीयपणे अशा विषयांवर बातम्या करतात. बहुतांश वेळा माध्यमांमध्ये टीका केली जाते, राजकारण्यांना व्हिलन दाखवलं जाते. अशा बातम्या आल्या की मी अस्वस्थ होते, कारण मी राजकारणी असले तरी माणूसही आहे. मी माणूस आधी आहे आणि नंतर राजकारणी.

मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळून दोन वर्षे होऊन गेली. माझ्याकडे या देशातील सर्वांत महत्वाचं खातं आहे. महिला व बालविकास हे खातं समाजातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येशी संबंधित आहे. त्यातही माझं खातं हे लोकांच्या जीवाशी ही संबंधित आहे. सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र अशी चतुःसूत्री मी जाहीर केली. महिला सक्षम असेल तर बालक सुदृढ होईल याचा अर्थ केवळ गर्भधारणेसाठी महिलांना सक्षम करणं असा नाहीय. जेव्हा महिला सक्षम होते, तेव्हा ती शारिरीक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्टीकोनातून सक्षम होत असते. अशा महिलेचं योग्य पोषण झाल्यामुळे कुपोषणाच्या परिस्थितीवर ही मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणणं शक्य होत आहे. त्यामुळे सक्षमीकरणाला आम्ही पोषणाच्या चळवळीचाही पाया बनवला. पोषण म्हटलं की पोषण आहार असा विषय आधी रूढ होता. मात्र आम्ही त्याला चळवळ करण्याचा निर्णय घेतला.

शहरी-ग्रामीण अशा सर्वच भागांमध्ये कुपोषणाची समस्या भेडसावतेय. शहरी भागांमध्ये तर झोपडपट्ट्या सोबत उच्चभ्रू वस्त्यांमध्येही कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. सर्व प्रकारची साधनं असूनही शहरी भागात वाढत असलेलं कुपोषण हे आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा परिपाक आहे. त्याउलट ग्रामीण भाग तसंच झोपडपट्टयांमध्ये पोषणासंदर्भात तीव्र वेगाने जागरूकता येत आहे.

शहरी भागांमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये साधारणतः हिरवी-ताजी भाजी मिळणं मुश्कील. जे स्वस्त असेल, जे मिळेल ते शिजवायचं असं चालत आले आहे, पण आम्ही यावर उपाय म्हणून परसबागेची कल्पना युद्धस्तरावर राबवण्याचा निर्णय घेतला. महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका तसंच इतर अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आणि आता ताटात हिरव्या भाज्या दिसू लागल्या. त्यामुळे आता पोषणाची मोठी समस्या सुटताना दिसत आहे.

कोणत्याही जिल्ह्यातील एखाद्या झोपडपट्टीच्या आवारात घेतल्या जाणाऱ्या परसबागेच्या भाजीपाल्यावर तेथील कुटुंबांचे पालन-पोषण होते. एखादी चिमुकली परसबागेतील भेंड्या अथवा वांगी तोडून आपल्या आईच्या पदरात टाकते. तेव्हा परसबागेच्या निमित्ताने सुरू झालेली ही पोषणाची चळवळ आता थांबणार नाही याची खात्री होते. सध्या राज्यात लाखों परसबागा कार्यरत आहेत त्यांची संख्या कशी लवकरात लवकर वाढवता येईल, यासाठी चळवळ म्हणून आम्ही कार्य करतो आहोत. एखाद्या मोहीमेची चळवळ होते ती त्यासाठी झटणाऱ्या लोकांमुळे. प्रसिद्धीपासून दूर हे सर्व सैनिक देशासाठी काम करतायत. आज या कामामुळे लाखों मुलांना कुपोषणापासून दूर ठेवलंय.

राज्याच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाड्यांच्या माध्यमातून परसबाग ही संकल्पना राबवण्यात येत आहे. केवळ राज्यातील अंगणवाड्यांमध्येच नव्हे तर आपल्या घराशेजारील मोकळ्या जागेत अथवा कुंडीत कशाप्रकारे भाज्या पिकवता येतात आणि त्याद्वारे स्वच्छ, ताज्या, रासायनिक खते विहित भाज्या उपलब्ध होऊन योग्य पोषण आणि सकस आहार कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत राज्य सरकारने सलग दोन वर्ष देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. याचे बरेचसे श्रेय या परसबागांना जाते. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या परिसरात परसबागांचा उपक्रम घेण्यात येतो आहे. यामध्ये विविध पालेभाज्या आणि फळभाज्या यांची पिके घेतली जातात यामुळे अंगणवाडीत येणार्‍या विद्यार्थ्यांना ताज्या आणि सकस पालेभाज्या शिजवून देणे सोपे झाले आहे. पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येत असलेली परसबाग योजना आता कुटुंबांसाठी वरदान ठरते आहे, यामुळे अनेक कुटुंबांची दररोजची थाळी चौरस आहाराने सजते आहे. परसबाग या सुंदर संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केलं, ते अंगणवाडी सेविकांनी. अशाच एक अंगणवाडी सेविका माया निकाळजे यांची कहाणी या निमित्ताने मला इथे सांगावीशी वाटते. करमाड पासून दोन किलोमीटरवर असलेल्या झोपडपट्टीतली अंगणवाडी माया सांभाळतात. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या इथल्या लोकांनी सुरुवातीला त्यांना प्रतिसाद दिला नाही. पण नंतर ताईंची जिद्द आणि प्रामाणिकपणा पाहून लोकांनी त्यांचं ऐकण्यास, त्यांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि त्यांनी मोकळ्या जागेत उपलब्ध साधनांचा वापर करत देशी वाण वापरून अत्यल्प खर्चात परसबाग तयार केली आहे.हे चित्र थोड्याफार फरकाने राज्यातील विविध जिल्ह्यात पाहायला मिळते आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला या गावातील परसबाग. ही परसबाग सेंद्रिय शेतीचे उत्तम मॉडेल म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कृषी विद्यापीठाच्या सहाय्याने आणि त्यांनी पुरवलेल्या तांत्रिक मार्गदर्शनाच्या सहाय्याने अंगणवाडी सेविकांनी याठिकाणी अठरा विविध पालेभाज्या आणि फळांची पिके घेतली आहेत. हळूहळू परस भागांची ही मोहीम आता पोषण चळवळीचे रूप घेऊ लागले आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात लाखों परसबागा तयार झाल्या आहेत. पूर्वी अंगणवाडीत अन्न शिजवून दिले जात होते, त्यामुळे बालकांना पूर्ण जीवनसत्त्वे मिळण्याच्या हेतूने 'परसबाग'ही संकल्पना उद्यास आली. अंगणवाडीजवळील जागेत फळभाज्या, पालेभाज्या, शेवग्याच्या शेंगाची लागवड करुन ते मुलांना शिजवून दिले जाते. यात पालकांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच नर्सरीज, कृषीविद्यापीठ यांचा मोठा सहभाग यामध्ये लाभला आहे. मागील पोषण अभियानात महाराष्ट्र देशात पहिला आला आहे त्यामध्ये देखील परसबागेचा मोठं योगदान आहे. ही चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी आणि सुपोषित महाराष्ट्राचे स्वप्न अधिक दृढ करण्यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.


अत्यंत गरीब असलेल्या लोकांसाठी परसबाग ही संकल्पना उपयुक्त ठरली आहे. भाजी विकत घेणे परवडत नसेल तर ती परसात घेऊ शकता, त्यासाठी थोडेसे कष्ट घेतले आणि निगा राखली की दररोज सेंद्रिय भाजी मिळायला अवघड नाही असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. कोरोना संकट आणि महागाईच्या काळात परसबागेमुळे अशा हजारो लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी आधार तर दिलाच पण प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या भाज्यांनी कोरोनाच्या संकटावरही मात केली. सरकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे सामान्यांच्या जीवनात किती फरक पडू शकतो हे या परसबागेने दाखवून दिले. येत्या काळात घनदाट वस्त्या आणि झोपडपट्टयांमध्ये हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स तसंच तत्सम मातीविरहीत शेतीच्या माध्यमातून Vertical farming करूनही ही पोषण चळवळ अधिक व्यापक करण्याचा विचार आहे.

- ॲड यशोमती ठाकूर

मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र

Updated : 24 Jan 2022 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top