Home > Max Woman Blog > आपण कुणाला म्यूट करु शकतो?

आपण कुणाला म्यूट करु शकतो?

सोशल मीडियावर संवाद साधतांना आपल्याला काही पर्यायदेखील असतात, हे पर्याय प्रत्यक्ष आयुष्यात देखील वापरता येऊ शकतात का, याचे विश्लेषण केले आहे सानिया भालेराव यांनी

आपण कुणाला म्यूट करु शकतो?
X

गेले काही महिने आपल्या सगळ्यांच्या कामाचं स्वरूप प्रचंड बदललं आहे . जमेल तितकी कामं घरातून, मिटिंग्ज, लेक्चर्स घरातून.. इतकंच काय तर मुलांच्या शाळासुद्धा ऑनलाईन.. सो झूम ऍपचा पुरेपूर वापर आपण करतो आहोत.. ऑनलाईन जगातली मला सगळ्यात भावणारी गोष्ट काय माहितीये? स्विच ऑफचं बटण! म्हणजे एखादी मिटिंग असली तर आपण स्वतःला म्यूट करू शकतो, दुसऱ्याला सुद्धा म्यूट करू शकतो.. हेच व्हिडीओ कॉलवर, ऑडिओ कॉलवर सुद्धा करता येतं.. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशी "स्विच ऑफ" ची किती सारी बटणं असतात.. अनफॉलो, अनफ्रेंड, ब्लॉक.. केवढे भारी ऑप्शन्स आहेत.. आपल्याला त्रास होतोय, उगाचच आपल्या अशा पर्सनल जागेत कोणी शिरू पाहत आहे असं वाटलं की हे ऑप्शन्स मदतीला येतात.. मग वहावत जाणं, अडकणं, त्रास करून घेणं, नको तिथे उतू जाणं.. टाळता येतं.. पण हे फक्त सोशल मीडियावरच शक्य आहे का?

आपल्या नेहेमीच्या आयुष्याचं काय?

परवा कुठेतरी एक फार छान वाक्य वाचलं.. "You can mute people in real life too. It's called boundaries".. पुन्हा एकदा वाचून बघा.. दुसऱ्यांदा वाचलं की अजूनच आत पोहोचतं हे वाक्य.. आपल्या पर्सनल स्पेसमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीला किती शिरू द्यायचं हे आपल्या हातात असतं.. आपण दुसऱ्या माणसाचं तोंड नाही बंद करू शकत पण आपण आपले कान नक्कीच बंद करू शकतो.. सो हे जे म्यूटचं बटण असतं ना.. ते सापडायला हवं.. ते एकदा दाबलं की समोरचा भले बडबड करत बसेल, पण आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही.. आपण आपल्या वागण्यातून बाउंड्रीज क्रिएट करत असतो.. आपल्याशी कोणी कसं वागायचं याच्या सीमा आपणच आखत असतो.. अर्थात व्यक्ती परत्वे त्या सीमारेषा बदलत जातात.. जन्मतः सगळंच शिकून कोणीही आलेलं नसतं.. आपण सगळेच चुका करतो, या चुकांमधूनच आपण स्वतःला आणि दुसऱ्याला ओळखायला शिकतो.. सो या सीमा आखाताना काही जणांच्या बाबत आपण चुकतो सुद्धा.. यामुळे त्रास सुद्धा होतो, पण किती अंतर ठेवायचं हे शिकणं गरजेचं असतं..आणि ते शिकतांना त्रास तर होणारच कारण विषय सोपा नाहीये हा.. ज्याला आतवर घाव बसतो, तो वेदना आत झिरपू देतो आणि त्यातून तो शहाणा होत जातो.. त्याला अंतराचं भान येतं.. खरं जग असो, व्हर्च्युअल असो.. असतात तर माणसचं आपल्या आजूबाजूला.. पण म्यूटच्या बटणाची जागा आपल्याला आता माहिती असते.. म्यूटवर सिन बघणं इतकं मजेदार असतं म्हणून सांगू.. जाम जाम भारी वाटतं.. कारण एकदा का बाउंड्रीज सेट असल्या की आपण सेट होतो बॉस..

आता असं सुद्धा होतं कधी कधी.. काही जणांच्या बाबतीत हे म्यूटचं बटण च्यामारी दाबता येत नाही .. म्हणजे दिसत सुद्धा असतं पण आपण नाहीच दाबत ते .. होतं असं.. हे लोक खास असतात.. तिथे कितीही ठरवलं तरी सीमा आखता येत नाहीत.. आपणच बनवलेल्या बाउंड्रीज आपणच मोडत जातो.. आपल्याला माहिती असतात सगळे नियम तरीही तोडत जातो आपण.. आता फरक हाच असतो की आपल्याला माहिती असतं आपण माती खातो आहोत हे.. पण हे बेटर असतं पहिल्यापेक्षा... माती खाता येणं.. सोपं नसतं राव.. म्हणजे जवळ अक्कल असतांना माती खाता येणं जाम जाम अवघड असतं.. सो हे पण एक शिकणंच असतं.. त्यातून जो निखार येतो ना.. तो च्यायला हजार फेअर अँड लव्हली टाईप्स क्रीम फासले तरी येणार नाही असा असतो.. सो अगदी मख़्सूस, दिल के करीब टाईप्स लोक सोडले तर म्यूटच बटण कुठे आहे याचं भान आपल्याला राहायला हवं.. बाउंड्रीज सेट करता यायला हव्या.. कुठपर्यंत, कोणासाठी हे आपण आपलं ठरवायचं.. म्यूटचं बटण दाबून आयुष्यातला डोकेदुखीवाला सिन आपण कॉमेडी करू शकतो राव.. फार मोठा शोध आहे हा.. हद, सीमा, लिमिट वगैरे.. कुठे हवी कुठे नाही.. आपण आपलं ठरवायचं.. फुटलं टाळकं तर येऊ द्यायचं रक्त.. काही घाव सुद्धा गरजेचे असतात म्हणून झेलायचे ते सुद्धा.. चलते रेहनेका भिडू लोग .. खुद की हदोंसे परे.. खुदी के पास..

हद-बंदी-ए-ख़िज़ाँ से हिसार-ए-बहार तक

जाँ रक़्स कर सके तो कोई फ़ासला नहीं - साक़ी फ़ारुक़ी

( ख़िज़ाँ - Autumn/पानगळ ; बहार - spring/वसंत ऋतू ; रक़्स - Dance/नाच)

©सानिया भालेराव

Updated : 18 Dec 2020 5:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top