Home > Max Woman Blog > "आता, विसाव्याचे क्षण..." वाचा लता दिदींचं मनोगत

"आता, विसाव्याचे क्षण..." वाचा लता दिदींचं मनोगत

रविवारी भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं. दिवसभर त्यांच्याभोवतीच जणू सार जग फिरत होतं. काय वाटत असेल लता दिदींना त्या क्षणी? त्यांच्या मनाची घालमेल तर होत नसेल ना.... लता दिदींचं काल्पनिक मनोगत मांडलंय रेखा दैठणकर यांनी

आता, विसाव्याचे क्षण...  वाचा लता दिदींचं मनोगत
X

आता, विसाव्याचे क्षण....

28 दिवसापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टींची सुरवात झाली..... कामवाल्या बाईचे निमित्त झालं.... खरंतर या वयात काय, काहीही छोटं कारण पुरतं म्हणा.....काहीतरी 'लेबल' तर लागलं पाहिजे ना..... मग नेहेमीचीच धावपळ...... ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये भरती.....(तिथल्या नर्स ला विचारलं हॉस्पिटल चं नाव).... सुहास्य मुद्रेचे डॉ समदानींनी आश्वस्त केलं, "सगळं काही ठीक होणार दीदी"..... मी मनातल्या मनात हसले....आता ही बहुदा 'शेवटच्या प्रवासाची' नांदी च असावी.....

मग सुरु झाले सगळे उपचार..... नाकातोंडांत नळ्या, सतत अस्थिर ऑक्सिजनची पातळी...... कधी कधी शुद्ध असायची, कधी नसायची...... शुद्ध असेल तेंव्हा सगळा 'जीवनपट' डोळ्यांसमोरून सरकायला लागायचा...... थोड्या थोडक्या होत्या का आठवणी?....92 वर्षांपैकी, 87-88 वर्षांच्या तरी आठवत होत्या..... एकामागून एक नुसती आठवणींची भेंडोळी...... कधी कधी संदर्भ लागत होते, कधी कधी नाही.....

लहानपणीचे दिवस आठवताना चेहऱ्यावर नकळत स्मित येत होतं .... माई, बाबा आम्ही सगळी भावंड..... बाबांचं स्वर्गीय गाणं.... समजत नसलं तरी कानांना तेच छान वाटायचं.... बाबांकडे गाणं शिकायला येणारे विद्यार्थी.... त्यांच्या शिकवणीकडे माझं असणारं लक्ष..... आशाची मस्ती, दंगेखोर पणा जो मला अजिबात आवडायचा नाही....बाळ चं दुखणं..... आणि मग एक दिवस आम्हाला मुलांना कुणीतरी वरच्या मजल्यावर नेलं.... खाली येऊ दिलं नाही..... त्या दिवशी 'बाबा' आम्हांला सोडून गेले होते..... मी अचानक मोठी झाले, व्हावंच लागलं.....

मग सगळ्या परिवाराला सांभाळायचा केलेला निश्चय.... नाईलाजाने सिनेमाकडे वळलेली पाऊले..... स्टेज शो करून मिळवती झाल्याचा आनंद.....काय काय आठवत होतं...... आणि परत शुद्ध गेली..... काही कळेनासं झालं.....

आयुष्यभर किती माणसं जोडली गेली..... गणनाच नाही....शुद्ध येत होती, जात होती...... अनेक चेहरे समोर येत होते..... नौशादजी, सज्जादजी, रोशनजी, खय्यामजी, मदन भैया, हेमंतदा, सचिनदा, फडके साहेब, खळेकाका, अनिल विश्वासजी, मुकेश भैया, किशोरदा, रफी साहेब....... सगळ्यांनी जणू फेर धरलाय...... काही जणांशी वाद ही झाले..... आत्ता हसू च येतंय सगळ्यांचं, नको होते ते व्हायला....

आज परत सगळ्या तपासण्या केल्या गेल्या..... आता अजून काय काय सहन करायचंय काय माहित?......

आज सकाळपासून आठवतायत, मिळालेले सत्कार, पदव्या, अनेक अवॉर्ड्स.... विशेष म्हणजे 'भारतरत्न' पुरस्कार.... फारच प्रेम दिलं लोकांनी.... देशात - परदेशात केलेले शोज.....कसे उतराई होणार यांचे?.....

किती परीक्षा बघणारे प्रसंग, किती संकटं, पण मंगेश्याच्या कृपेने आणि माई-बाबांच्या आशीर्वादाने सगळं निभावून नेलं.....

पण आता जीव थकलाय.... काही नको वाटतंय....7-8 वर्ष झाली, गाणं पूर्ण थांबवलंय..... बाहेर पडणंच बंद झालंय..... घरात बसून TV वर बघत असते, आजूबाजूला काय चाललंय ते.....

घरातले सगळे स्थिरावलेत..... फारशी कुणाची काळजी राहिली नाहीये..... आता ही 'यात्रा' संपावी असं मनापासून वाटतंय..... पण 'त्या' ने बोलावले पाहिजे ना?..... मन अगदी तृप्त आहे.... हजारो नाही, लाखो नाही तर करोडो लोकांचे प्रेम मिळालंय....आदर मिळालाय.....अजून काय पाहिजे..... परत विचारांची भेंडोळी........

कालपासून डॉ समदानीच्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये.... श्वास जड झालेत.... आता तर एकेक श्वास घ्यायलाही कष्ट पडतायत.... मंगेशा, सोडव रे आता...... हे कुठलं गाणं रुंजी घालतंय, " तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले! आता हे परि सारे सरले..... उरलं मागं नाव "...... परत सगळं भोवतीचं फिरतंय.... काही समजत नाहीये.... खूप खोल खोल, खड्ड्यात किंवा भोवऱ्यात फिरतीये असं वाटतंय..... थांबता येत नाहीये..... सहन होत नाहीये......

मगाशीच आशा येऊन गेली.... बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे ही येऊन गेले...... आज काहीतरी विशेष दिसतंय..... सचिनही बघून गेला.... आज 'सुटका' दिसतीये.... आज श्वास जास्तच जड झालेत..... आशाच्या गाण्याप्रमाणे 'जड झाले ओझे ' असं वाटतंय..... सोडवा कुणीतरी.... डॉक्टर, डॉक्टर............

........... आता एकदम हलकं वाटतंय.... पिसासारखं...... सगळ्या नळ्या काढल्यात..... उंचावरून खाली सगळ्यांकडे बघतीये असं वाटतंय.....

सगळीकडे असं का वातावरण आहे? सुतकी, दुःखी?.... म्हणजे.... म्हणजे..... मी....... बहुतेक तसंच असावं...... आज माईची, बाबांची खूप आठवण येतीये.... त्यांना कधी एकदा भेटते असं झालंय......

माझ्या डोक्यावरून पांघरूण घातलंय.... पण ही काय जादू आहे? मला सगळं दिसतंय...... मला न्यायला आलेत हे 4-5 जण.... रोजचेच हॉस्पिटल मधले..... रडताहेत.... मी विचारतीये त्यांना, पण लक्ष देत नाहीयेत..... त्यांच्या बोलण्यावरून कळतंय, मला घरी नेताहेत.... प्रभुकुंज वर..... कधी एकदा घर आणि घरातली माणसं दिसताहेत, असं झालंय.... आली, आली गाडी....हे उलट्या अक्षरात काय लिहिलंय? ऍम्ब्युलन्स..... हं..... घरी सगळे वाट बघत असतील नाही? उषा, आशा, हृदयनाथ, सगळी मुलं.... घाबरले असतील बिचारे..... पण आता त्यांच्या डोक्यावर हात ही फिरवता येणार नाही...... ह्याचं मात्र वाईट वाटतंय.....

सगळीकडून, कानावर पडतंय, मी अनंताच्या प्रवासाला निघून गेलीये म्हणे.... नाही नाही, अजून इथेच घुतमळतीये मी..... इतकं सोपं आहे का, इतक्या लोकांचे प्रेमपाश इतक्या चटकन सोडवणं..... किती मोठी मोठी लोकं येताहेत प्रभूकुंज वर.... मी तर पार संकोचून गेलीये..... हे काय, हे इतके मिलिटरी आणि पोलीस कशाला?..... तिरंगा दिसतोय.... मला फार अभिमान आहे या तिरंग्याचा आणि त्याची प्राणपणाने रक्षा करणाऱ्या सैनिकांचा..... तुम्हाला आवडतं ना माझं ते गाणं ,'ए मेरे वतन के लोगो...... "..... ते गाताना नाही आता ऐकताना अजूनही घशात हुंदका दाटतो..... पण आज तुम्हा सगळ्यांचा हुंदका अडकलाय, हे पाहून खूप भरून येतंय.... किती प्रेम कराल माझ्यावर? मी काय केलंय? फक्त गाणी तर म्हटलीत.....

आत्ताच कानावर आलंय, मोदी साहेब येताहेत, मला पाहायला...... बापरे, मोठ्ठा माणूस... पंतप्रधान असावा तर असा..... मला भेटायला खास येताहेत, सगळे कार्यक्रम रद्द करून.... हे मात्र अति होतंय हं...... आज त्यांना परत एकदा डोळे भरून, सॉरी, बंद डोळ्यांनी पाहता येईल.....

आता मला तिरंग्यात लपेटलंय....काय वाटतंय म्हणून सांगू?... साऱ्या भारताची शान आहोत आपण, असं काहीतरी feeling आलंय..... मिलिटरी व्हॅन पण काय सुंदर सजावलीये.... यातून जायचंय आता..... माझा खूप हसरा फोटो लावलाय समोर.... खरंच वाटत नाही, मी अशी होते..... आत्ताही, बहिणींनी साथ सोडली नाहीये.... आशा, उषा दोन्ही बाजूला उभ्या आहेत..... मी हळूच बघतीये त्यांच्याकडे..... रडवेल्या झाल्यात अगदी..... आमची गाडी मुंबईच्या रस्त्यावरून धिम्या गतीने चाललीये.... दुतरफा खूप लोकं उभी आहेत, साश्रू नयनानी मला एकदा, शेवटचं बघायची इच्छा ठेऊन..... किती हे प्रेम?.... कशी उतराई होणार यांची?....खूप संकोचून गेलीये मी....

अच्छा, शिवाजी पार्क वर आणलंय वाटतं.... म्हणजे बाळासाहेबांच्या इथेच.... असतात असे ऋणानुबंध काही काही..... मिलिटरी चे जवानानी 'सलामी' देऊन आता, 'gard of Honour' म्हणून मला अत्यंत आदराने खांद्यावरून घेऊन चाललेत.... जणू काही लहानपणी बाबांच्या खांद्यावरून जत्रा च बघतीये..... हो जत्रा च..... इतकी माणसं जमलीत इथे..... नजर टाकावी तिकडे माणसंच...... आणि आणि हे काय?... मला खांद्यावरून खाली एका पांढऱ्या चौथऱ्यावर ठेऊन, हे सगळे कुठे चाललेत?.....पण एक मात्र खरं.... माझ्या पांढऱ्या रंगावरच्या प्रेमाची आठवण ठेवलीये यांनी..... पण खूप एकटं वाटतंय..... मला इथे सगळ्यांच्या मध्ये ठेवलंय.... कुणीच नाही आजूबाजूला...... लांब खुर्च्यावर, बाळ, आशा, उषा, आदिनाथ, भारती वहिनी सगळे दिसतायत..... पार कोलमडून गेलेत.... कसं समजावू त्यांना.... खूप थकले आहे मी..... आता 'विसाव्याचे क्षण' हवेत मला.....

ही अचानक गडबड कसली? मोदीजी आले वाटतं? हं..... बापरे, ते माझ्यापुढे नतमस्तक होतायत.... आत्ता मात्र वाटतंय, उठून त्यांना नमस्कार तरी करायला हवा होता..... देशाचे पंतप्रधान आपल्यापुढे वाकतायत...... धन्य झाले मी..... त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून, मन भरून आशीर्वाद दिलाय मी, तुम्हीच माझ्या या भारत देशाला प्रगतीपथावर नेऊ शकता..... माझा लाडका सचिन ही दिसतोय....डोळे पाणावलेत त्याचे ही... मानसपुत्र च माझा..... सुखी रहा.....

आता कानावर पडतंय , मंत्रपठण!.... म्हणजे वेळ आली वाटतं....... चंदनाची शय्या..... वाट बघतीये.....माईला, बाबांना भेटण्यासाठी आतूर झालीये मी..... खूप हलकं वाटतंय.... आता लाखो, करोडो हृदयात कायमचं, 'ज्योत' बनून रहायचंय..... आपल्याच आवाजाची जादू, त्यांच्या हृदयातून ऐकायचीये.......सर्वाना त्यांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी, आपल्या सुरातून साथ द्यायचीये..... याच साठी तर आपल्याला माई-बाबांनी इथे ठेवलं होतं ना..... बाबा, तुम्ही कल्पवृक्ष होऊन मला सर्व काही दिलंत.... आता तुमचाही शब्द नाही मोडवत.... येतीये मी... आले.... सगळीकडे ज्वाळा उसळल्यात.... आणि मला तुमच्या भेटीची आस लागलीये......

सर्वांना 'नमस्कार' आणि 'आशीर्वाद'!.... कधीही आठवण करा, मी हजर असेन...... पण आता जाऊदे..... "अखेरचा हा तुला दंडवत 🙏, सोडून जाते गाव........... दरी दरितून, मावळदेवा, देऊळ सोडून धाव रे "......... sssssssssssss

(आपल्या सर्वांच्या लाडक्या, लतादीदींचे मनोगत)

सौ. रेखा दैठणकर

Updated : 8 Feb 2022 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top