Home > Max Woman Blog > आता मुलांना चांगले संस्कार देण्यावर भर द्यायला हवा

आता मुलांना चांगले संस्कार देण्यावर भर द्यायला हवा

आता मुलांना चांगले संस्कार देण्यावर भर द्यायला हवा
X

सध्या कुठेही महिलेवर अत्याचार वगैरे झाला की तीने फुलन देवी बनलं पाहिजे, स्वतःचे संरक्षण स्वतः केलं पाहिजे,अत्याचार करत असतांनाच त्याचे अवयव कापले पाहिजेत किंवा मारून टाकले पाहिजे, असे कपडे घातले पाहिजेत, याच वेळेतच बाहेर पडले पाहिजे. वगैरे सारखे मेसेज सुरू होतात. वास्तवात विचार करायला गेलो तर यांच्यातील तिच्याकडून समोरच्याला इजा करण्याची एक तरी गोष्ट शक्य आहे का? बलात्कार करणारे समूहाने येतात, हातपाय बांधून ठेवतात, गुंगीचे औषध देतात किंवा इतर काही गोष्टी करतात. बलात्कार हा काही फक्त वासना शमवण्यासाठी नसतो तर तो आपल जातीच, धर्माच, वर्गाच किंवा पुरुषीपणाच वर्चस्व दाखवण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी बऱ्याचदा केला जातो.

लहान मुली, म्हाताऱ्या महिला यांच्यावरही तो होतो म्हणजे इथे कपड्याचा काही संबंध नाही हे स्पष्ट होते. कथुआ मधील चिमुकली असिफा कसा प्रतिकर करू शकत होती त्या मंदिरातील नराधमांचा? फाशीची कडक शिक्षा तर झाली पण आता आपला गुन्हाच सापडू नये म्हणून सरळ सरळ जिच्यावर अत्याचार केला तिला आणि तिच्या बाजूने लढणाऱ्या सर्व लोकांना संपवण्यापर्यत मजल गेली आहे. गुन्हेगारांची उन्नाव मधील युवतीच्या केसमध्ये न्यायासाठी लढणाऱ्या तिच्या नातेवाईकांना मारून टाकले आणि नंतर काही दिवसांनी तिलाही जाळून मारले. सुबोधकुमार या IPS अधिकाऱ्याला दिवसाढवळ्या काही झुंडीने घोषणा देत मारले गेले, शक्ती, शस्त्र, वर्दी सगळं असणाऱ्या व्यक्तीची हे हाल केले जातात तर सामान्य महिला कसा प्रतिकार करू शकेल? आणि खोटे आरोपी पकडून देऊन त्यांचे सरळ एन्काऊंटर करून खऱ्या गुन्हेगाराला बाजूला ठेवण्याचे ही प्रकार यामध्ये होतात.

तर मग आपण म्हणाल यावर उपाय काय तर उपाय हाच आहे की मुलांना लहानपणापासून स्त्रीपुरुष समानतेचे संस्कार देणे. स्त्री ही वर्चस्व गाजवण्याची, धडा शिकवण्याची, उपभोग आणि सेवा करून घेण्याची वस्तू नसून आपल्यासारखीच माणूस आहे. हे लहानपणापासून मनात बिंबवण्याची. शिव्या न देण्यापासून सुरवात करावी लागेल, कारण प्रत्येक शिवीत समोरच्या माणसाच्या आई-बहीण यांचे लैगिक शोषण करण्याबद्दल बोलले जाते. क्रिकेटचे सामने असो वा इतर काही तिथे सुद्धा विरुद्ध टीम मध्ये असलेल्या स्त्रियांबद्दल, खेळाडूंच्या आई बहिणीबद्दल जे उद्गार काढले जातात त्यात स्त्रियांबद्दल ची मानसिक वृत्ती दिसून येते.

बदल करायचा असेल तर या मानसिकतेपासून करायला हवा. घरातील कोणतेही काम असो ते मुलानेही मुली एवढीच करायला हवीत. मला माहित आहे एवढ्या वर्ष पुरुषसत्ताक व्यवस्था आहे ती लगेच जाणार नाही पण हळूहळू प्रयत्न करून हे घडू शकते. समतेने वागणाऱ्या पुरुषांना प्रोत्साहन ही द्यायला हवे, बहुतेक ठिकाणी अश्या पुरुषाचे स्वागत होते पण अपवादाने. काही ठिकाणी उलटही घडते. नाते टिकवूयात. एक केस आली त्यात महिलेला तिचा नवरा थोडा रागीट, घरात आई-बहीण-पत्नी या सर्वांवर जरब असणारा वगैरे हवा होता. तर, नवरा म्हणत होता मी कोणाला घाबरत नाही आणि मला कोणी घाबरावे असे मला वाटत नाही.तिच्याशी अधिक संवाद साधला असता लक्षात आले की तिला तिच्या भावा सारखा किंवा माहेरच्या कुणा नातेवाइका सारखा तो हवा होता ज्यांचा तिच्या घरात धाक असेल आणि त्यांना महिला घाबरत. गुलामामध्ये त्याच्या बेड्याप्रती आकर्षण निर्माण करायचे आणि एखाद्याने त्याची त्यातून सुटका केली तरी दागिने समजून त्या बेड्या परत घालाव्यात असा तो प्रकार.

सोबत अजून एक चुकीची गोष्ट आत्ता घडत आहे ते म्हणजे बलात्का-याचे समर्थन. तो आपल्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा असेल तर त्याला समर्थन म्हणून तिरंगा हातात घेऊन मोर्चेही काढले जात आहेत. यात इतिहासाचे उदाहरण देऊन इसवी सन अबक मध्ये आमच्या पूर्वजांवर असे असे अत्याचार झाले तेव्हा का नाही काय बोलले? आत्ताच का? दुसरीकडे कुठेही बलात्कार कधी झाला म्हणून इथे होणाऱ्या बलात्काराचे समर्थनच कसे होऊ शकते?त्या स्त्रीला तिच्या कुटुंबाला किती यातना होतात हे दिसत नाही का यांना? त्यामुळे धर्म, जात , पक्ष, वर्ग याच्या बाहेर जाऊन मानवतावादकडे वाटचाल होणे सुद्धा आवश्यक आहे.

यासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेता येईल. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा शिवाजी राजांकडे त्यांच्या एका सरदाराने भेट म्हणून पुढे आणले तेव्हा राजांनी मानसन्मान देऊन त्या सुनेला परत पाठविले होते तेही अश्या काळात ज्या काळात युद्धामध्ये हरल्यानंतर शत्रूच्या स्त्रियांची विटंबना केली जाई. स्त्रियांना भेटवस्तू म्हणून दिले जाई. शत्रूकडच्या महिलांना ही सन्मानाची वागणूक देणाऱ्या राजांकडून हा आदर्श आपण घ्यायला हवा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण वेळीच अन्यायाविरुद्ध आवाज नाही उचलला तर हे विकृत विचारांचे वारे तिकडून इकडे यायला ही वेळ लागणार नाही.ज्यात आपल्या घरातील ही कोणी जवळचे नातेवाईक बळी पडतील त्याला.

तर चला बदलाची सुरवात स्वतः पासून करूयात...

  • संकेत मुनोत

Updated : 6 Oct 2020 5:50 AM GMT
Next Story
Share it
Top