Home > Max Woman Blog > नो चॉइस

नो चॉइस

मूल जन्माला घालण्यासाठी एक गर्भाशयच लागतो.आणि तो फक्त एक स्त्रीचं देते म्हणून तिने तिचं शोषण होऊ द्यायचं का? किंबहुना महिलाचंच शोषण केलं जावं आणि तिला ते समजूनही तिने ते सतत कोणतीही व्यवस्था नसल्यानं ‘नो चॉईस’ म्हणत सहन करायचं का? वाचा हेमंत कर्णिक यांनी ‘नो चॉइस’ या चित्रपटाचं केलेलं समीक्षण

नो चॉइस
X

या इराणी चित्रपटाचं मूळ नाव आहे, मजबुरी. 'मजबुरी'चा सगळा आशय 'नाइलाज'मध्ये देखील येत नाही; 'नो चॉइस' तर अगदीच कमी पडतं, असं वाटतं. पण भाषांतरात आशय नाही तरी अर्थ बरोबर आला आहे.

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मी पाहिलेला हा सर्वोत्तम चित्रपट.

एक बेवारशी १६ वर्षांची मुलगी. फूटपाथवर झोपणारी. अकरा-बाराव्या वर्षापासून कोणासाठी तरी मुलं जन्माला घालणे, हा तिचा पोटापाण्याचा व्यवसाय. पण हे इराण आहे, तिला 'सरोगेट मदर' असलं काही नामाभिधान नाही. सिनेमाच्या सुरुवातीला तिचा यार तिला एका 'कुळा'कडे नेतो. तो मध्यमवयीन पुरुष तिला सांगू बघतो की 'मी नीट शादीशुदा आहे, मला बायकोबरोबरच राहायचं आहे; पण तिला मूल होत नाही!' महिनाभर एकत्र काढून ती गरोदर रहात नाही. म्हणून हा पुरुष तिच्या याराकडे तक्रार करतो. या निमित्ताने यार तिला हॉस्पिटलात नेतो आणि तिथल्या तपासणीत कळतं की तिच्या 'ट्यूब'ला गाठ मारण्यात आली असून ती पुन्हा गरोदर राहू शकणार नाही!

इथून एक चमत्कारिक प्रवास सुरू होतो. तिला, तिच्या याराला हॉस्पिटलात वा इतर कुठे कोणी धूप घालत नाही. एक समाज कार्यकर्ती तिला मानवी अधिकारांवर काम करणाऱ्या एका तरुण वकील बाईकडे नेते. ती वकील बाई या मुलीला तिचा अधिकार नाकारणाऱ्याला (किंवा नाकारणारीला) कोर्टासमोर उभं करून मुलीला न्याय मिळवून देण्याच्या इरेला पडते. त्यात खूप धक्के खाते. वाटेत मुलीचं ऑपरेशन करणारी गायनॅकॉलिजिस्ट डॉक्टरीण आडवी येते. दोघींचा संघर्ष होण्याला नाईलाज असतो.

नाईलाज प्रत्येकाचा असतो. त्या मुलीचा, वकील बाईचा, डॉक्टरीण बाईचा; अगदी त्या याराचासुद्धा. प्रत्येक जण व्यवस्थेने सोपवलेलं आपापलं 'काम-कर्तव्य ' करण्याच्या मागे असतात. निरक्षर मुलगी जगण्यासाठी या धारेला लागलेली असते. याराला म्हणते, आता पुरे! मला फक्त तुझ्याबरोबर रहायचं आहे. तो म्हणतो, आणि खायचं काय? हे नवं गिऱ्हाइक पैसेवालं आहे. हे काम शेवटचं. मग आपण सुखाने एकत्र राहू. वकील मुलगी म्हणते, मूल होऊ द्यायचं की द्यायचं नाही, हा सर्वस्वी त्या मुलीचा अधिकार आहे. दुसरं कुणी काय म्हणून तिच्या वतीने निर्णय घेणार? हा अन्याय आहे. डॉक्टरणीचा नवरा, मुलगा कधीच परदेशी (अमेरिका?) जाऊन पोचलेले असतात आणि तिला लवकर येण्याची गळ घालत असतात. ती द्विधा मनस्थितीत असते. कामात पूर्ण बुडालेली असते. गरीब बायकांना पदरचे पैसे खर्च करून मदत करत असते.

याराला परिस्थितीने गुन्हेगार केलेलं असतं. मग कोणीतरी लिहिलेला कायदा धाब्यावर बसवून तो समाजाला जे हवंय, ते देण्याची 'सेवा' पुरवत असतो. पुरुष म्हणून वाटाघाटी करणे, बाळाची नेआण करणे, पैसे देणे-घेणे हे व्यवहार तो सांभाळतो; पण मूल जन्माला घालण्यासाठी एक गर्भाशयच लागतं. ते ती मुलगी पुरवते. सगळे कसे छान एका जगड्व्याळ चक्रात अडकून आपापली जागा सांभाळत रहातात.

वकील बाई आणि डॉक्टरीण, दोघींच्या परिचयात मदत करणारे, आधार देणारे सहृदय पुरुष असतात – जसा त्या मुलीला यार असतो, तसेच एक प्रकारे. तो यारही तिचं लैंगिक शोषण करत असतोच, असं नाही. आणि मुलगीही स्वखुशीने तो सांगेल ते करत असते.

मग या अमानुष स्थितीचा खलनायक कोण? हे असं होतंय, तीन्ही बायका जीव तोडून कष्टताहेत आणि कोणीच सुखी, समाधानी नाही; याला जबाबदार कोण?

याचं उत्तर आहे, व्यवस्था. पुरुषप्रधान व्यवस्था. चित्रपटात हे फार चांगल्या रीतीने सुचवलं आहे. सगळ्या पुरुषांचे चेहरे समोर येतात; फक्त 'व्यवस्थे'च्या वतीने बोलणी करणारे पाठमोरे दिसतात. हॉस्पिटलात ताटकळणाऱ्या, सहन करत बसलेल्या बायकांच्या समोरून, आजूबाजूने खूप वर्दळ असते; पण बिनचेहऱ्याची. कधी तर नुसत्या सावल्याच घाईघाईत इथून तिथे जाताना दिसतात. व्यवस्थेला चेहरा नाही.

चित्रपटाला वेग आहे. कोणाच्याही दु:खावर, अडचणीवर, संकटावर चित्रपट रेंगाळत नाही. चित्रपट मूकही आहे. यातलं काहीही तो अधोरेखित करत नाही. एखादा पुरुष एखाद्या बाईला व्यवहार शिकवतो, 'अगोदर स्वत:ची कातडी बचाव,' असे सल्ले देतो; पण त्या क्षणावर चित्रपट थबकत नाही.

कॅमेरा सतत हलत रहातो. घाईच करतो. एकेका पात्राला जवळून न्याहाळतो; तसंच दूर होऊन गर्दीसुद्धा दाखवतो. पण या दोन गोष्टी एकत्र होत नाहीत. दुरून दिसणाऱ्या, विशाल चौकटीत ओळखीचं पात्र क्वचित दिसतं. एक व्यक्ती आणि सगळे मिळून व्यवस्था, मिसळत नाहीत; वेगळेच रहातात.

चित्रपटाचं पार्श्वसंगीत तेवढं 'बोलकं' आहे. ते आघाती आहे. जे चाललं आहे, त्याबद्दल नापसंती व्यक्त करणारं आहे. आणि ही एकमेव गोष्ट सोडल्यास चित्रपट भावनेला अजिबात थारा देत नाही! प्रेक्षकाच्या विश्लेषक बुद्धीला आवाहन होत रहातं; पण भावनेच्या आहारी जाऊन कोणाची 'बाजू घेण्या'ची संधी चित्रपट नाकारत रहातो. मानेवर सुरा फिरून एक बाई मरते, तेव्हा ती अनामिकच रहाते. कुणीतरी जसा तिचा चष्मा पळवतं, तसंच आणखी कुणी तिच्यावर पांघरूण पसरतं. आणि मग त्या कापडावर येणारे जाणारे नाणी टाकत जातात. एकाचंही दर्शन न होता.

सुन्न करणारा, अंतर्मुख करणारा, व्यवस्था नामक बहुतोंडी आणि बिनओळखीच्या प्राण्याची भयंकर दहशत घालणारा अनुभव.


हेमंत कर्णिक

Updated : 9 April 2021 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top