Home > Max Woman Blog > पत्रं, तार ते Email, सोशल मिडीया; मानवी विकासाचा की तुरूंगाचा प्रवास?

पत्रं, तार ते Email, सोशल मिडीया; मानवी विकासाचा की तुरूंगाचा प्रवास?

पत्र, तार ते आताचा सोशल मिडीया हा मानवी प्रवास माणसासाठी किती नफ्याचा आणि किती तोट्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा निलेश अभंग यांचा हा लेख!

पत्रं, तार ते Email, सोशल मिडीया; मानवी विकासाचा की तुरूंगाचा प्रवास?
X

साधारण 20 वर्षांपूर्वी पत्रे होती. संदेश पाठवण्यासाठी पत्रं वापरली जात. साधारण 25 वर्षांपूर्वी आमच्याकडे कल्याणला गावाहून आंतरदेशीय पत्रं यायची. ती दुसरी ओपन आयताकृती पत्रं यायची. हा वारला, त्याला मुलगा-मुलगी झाली, पैशे पाठवून द्या, असा मोजकाच पण महत्वाचा मजकूर असायचा. माणसाच्या मरणाच्या खबरी मात्र पत्र उशिरा पोहोचत असल्याने फार घोळ व्हायचा. साधनं नव्हती, तेव्हा थोड्याफार अडचणी होत्या.

जसंजसं आपण पुढे जातो, तसंतसं चाक पुढे जाण्याऐवजी मागेच जात चाललं आहे.

शेतीच्या शोधाने माणसं स्थिर केली की बांधून टाकली, तर त्याचं उत्तर बांधून टाकली, गव्हाची गुलाम झाली, असे एकूण अभ्यासांती युवाल नोव्हा हरारी देतो.

शिवाय भटक्या आयुष्यामुळे माणसाला विविध कौशल्ये आत्मसात करावी लागली, वेगवेगळ्या हंगामात टिकून राहण्यासाठी तयारी करावी लागली. निरनिराळ्या हंगामात निरनिराळ्या ठिकाणी उगवणारी, येणारी फळं, कंदमुळं, खाण्याचे पदार्थ शोधावे लागले. कोणत्या ऋतूत काय खावे, काय खावू नये, यावर R & D करावा लागला. कुठल्या प्रदेशात कुठले प्राणी आढळतात पासून कधी कोणते प्राणी खावे यावर अभ्यास झाला. शिकारीमुळे अंगी चपळता आली. शेती काळातील माणसांपेक्षा hunting period मधील माणसांची शरीरं निरोगी होती. त्यांच्या खानपानात वैविध्य होते.

शेतीने माणसं बांधली गेली, एकाच जागी राहण्यामुळे अन तेच ते अन्न पिकवल्यामुळे अन्नातील वैविध्य संपले. सकाळ उगवल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस शेतीत अडकून पडला. शिवाय स्थिर असल्यामुळे माणसं तुलनेत कमी निरोगी झाली.

माणसाने छोट्या तुरुंगातून मोठ्या तुरुंगात प्रवेश केला.

सेम,

पत्राच्या काळात माणसं महत्त्वाचेच संदेश पोहोचवत होते, मजकूरही अगदी मोजकाच असे. मेसेज convey होणे महत्त्वाचे असे.

नंतर फोन आले. एक पायरी ओलांडली. Tata to Tata free असल्यामुळे girlfrind सोबत तास दिड तास बोलणे होऊ लागले. जेवलीस का पासून सुरुवात होऊन उद्या कॉलेजमध्ये भेटूयापर्यंत गप्पा रंगू लागल्या. फोन उचलला नाही, केला नाही की दोघे एकमेकांना रागे भरू लागले. थोडेफार वादविवाद होऊ लागले.

त्यो पाव्हना कव्हा फोनच करीत नै, त्या घराला मायाच नै, त्याहला कव्हा आपली आठवणच होत नै, आपुन तरी काह्याला झक मारायला त्याहला फोन करायचापर्यंत विषय पोहोचला. बरं, पाव्हण्याच्या ध्यानीमनी असं काहीच नव्हतं. पण लोकांचे रिकामे अंदाज.

इंटरनेट आले होते, पण वापर गरजेपुरता होता. Cyber मध्ये अर्धा तास बसून email पाठवणे, प्रिंट मारणे, document scan करणे, word मध्ये biodata बनवणे, त्यातून पाच मिनिटे उरली तरी orkut वर एखाद्या online असलेल्या मैत्रिणीशी chat करणे. फ़ार जपून मापून काम चाले.

तरी अजून android यायचा होता. माणसं बारक्या तुरुंगातून आणखी मोठ्या तुरुंगात प्रवेश करणे बाकीच होते.

गाडी पुढं सरकत गेली. Android आला अन त्याने माणसं पार घेरुन टाकली. खऱ्या अर्थाने माणसाला गुलाम करून टाकले. माणसं जेवतानासुद्धा मोबाईल वापरू लागले. अनेक जण toilet मध्येही मोबाईल घेऊन जातात. अनेक दिवसांनंतर चार मित्र जमले की त्यातले तीन दहा मिनिटांनंतर मोबाईलमध्ये मुंडकं खुपसतात.

आधी तिला मेसेजवर फक्त जेवलीस का इतकेच विचारावे लागे, तीही बिचारी, हो की नाही, ते कळवे. आता मात्र ती जेवणाच्या ताटाचा फोटोही पाठवते. थोडक्यात तिला अधिकचे काम लागले. चहा घेतलास का, नाही मी आज कॉफी घेतली म्हणत ती तात्काळ कॉफीच्या मगाचा फोटो व्हाट्सअप्पवर पाठवून देते. खूप जास्तीच्या लडतरी मागे लागल्या.

शिवाय मेसेंजर, email, व्हाट्सअप्प, instagram वर ढिगाने मेसेज आदळत असतात. त्यामध्ये महत्त्वाचे असे काही नसते. पण तरीही पाठवणाऱ्यांना उत्तरांची अपेक्षा असते. जर भला माणूस इतक्यांना उत्तरं देत बसला तर पोटाला लागणारी भाकरी कधी कमावणार. बरं त्यामुळे अनेक जण नाराजही होतात, खट्टू होऊन जातात. पण त्याला पर्याय नसतो. समंजसपणा दाखवणारी माणसं नाराज होत नाहीत. मात्र समंजस माणसे कोणत्याही काळात संख्येने अल्पच होती. त्याला सध्याचा काळही अपवाद नाही.

सोशल मीडियाने जग जवळ आणले आहे की ते माहित नाही, पण माणसं एका जागी बांधून टाकली आहेत. बरं इथे न राहिलो तरी गोचीच होणार आहे. मध्यममार्ग शोधणे क्रमप्राप्त आहे, तरी तो गवसण्याच्या शक्यता कमीच. आता अँड्रॉइड टाळणे भल्याभल्यांना शक्य नाही. अनेकांचे धंदे, नोकऱ्या याच्यावरच अवलंबून आहेत.

जसे त्या काळी लोकांना कृषक संस्कृती टाळणे शक्य नव्हते, तसेच आता समाजमाध्यमे, मेसेजप्रणाली, अँड्रॉइड टाळणे शक्य नाही. अमीर खान, युवाल हरारीसारख्या मोठ्या लोकांची उदाहरणे देऊ नका. ती आर्थिकदृष्ट्या फार मोठी माणसं आहेत. ह्या सगळ्या उद्योगांसाठी ती लोक माणसे hire करू शकतात. म्हणून त्यांना 'साधा फोन' वापरणे शक्य होते.

आपण पत्र-तारेपासून email, मेसेंजर, instagram डियेमपर्यंत पोहोचत विकास केला आहे, असे जरी वरकरणी वाटत असले तरी एक मनुष्यजात म्हणून आपण लहान तुरुंगातून भल्या मोठ्या तुरुंगात प्रवेश केला आहे, हे मान्य करावेच लागेल.

निलेश अभंग

व्यावसायिक

Updated : 9 May 2022 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top