Home > Max Woman Blog > एकतर्फी प्रेमाच्या विकृतीला चित्रपट जबाबदार आहेत का ?

एकतर्फी प्रेमाच्या विकृतीला चित्रपट जबाबदार आहेत का ?

‘ तू सिर्फ मेरी है’, ‘तू मेरी नही हुई तो किसीकी नही हो सकती’ अशा चित्रपटातील डायलॉगमुळे एकतर्फी प्रेमाची विकृती समाजात वाढत चालली आहे का? एकतर्फी प्रेमाला फक्त मुलीचं बळी पडतात का ? मुलांवरही एकतर्फी प्रेम हावी झाल्यास काय केलं पाहिजे? वाचा सई मनोज देशमाने यांचा लेख..

एकतर्फी प्रेमाच्या विकृतीला चित्रपट जबाबदार आहेत का ?
X

परवाचीच एक घटना… पुण्यात १४ वर्षांच्या एका कब्बडीपटू मुलीवर, ३ मुलांकडून कोयत्याने वार करण्यात आले. यात त्या दुर्दैवी मुलीचा मृत्यू झाला.

एकतर्फी प्रेमातून निर्माण झालेली हि काही पहिली घटना नाही. या आधीही बऱ्याच मुलींचे यांत बळी गेलेले आहेत. काही वर्षांपूर्वी तर मुलगी नाही म्हटली की तिच्यावर ॲसिड टाकून तिला विद्रूप करून टाकायच ह्या अतिशय क्रूर मानसिकतेची बरीच उदाहरण दिसून येत होती. ह्या मानसिकतेला जबाबदार कोण? समाज, आजूबाजूची परिस्थिती, बिभत्स भावनांना नको तितके उंचीवर नेऊन ठेवणारे चित्रपट?

खरतर प्रेम हि किती सुंदर, नैसर्गिक भावना. कोणीतरी नजरेत भरावं आणि मनात घर करून बसावं अशी. मग त्या व्यक्तीची सुख दु:ख स्वत:च्या सुख दु:खांपेक्षा महत्वाची होऊन जावीत. त्या व्यक्तीच्या एका हास्यासाठी आकाशातले चंद्र तारे वगैरे तोडून आणावेत अशी कविकल्पना मनात खेळवणारी.. जरी त्या व्यक्तीने आपल्या भावना नाही स्विकारल्या तरी फक्त तिच्या सुखाची अपेक्षा करणारी..

इतक्या या सुंदर, तरल भावनेत विकृती येतेच कशी? मला जी आवडते, ती " माझीच" झाली पाहिजे हि मालकी हक्काची भावना निरपेक्ष प्रेमाची जागा कधी पटकावते?

याला बऱ्याच प्रमाणात स्त्रीला भोगवस्तू समजणारा आपला समाज जबाबदार आहे. पुरूषप्रधान मानसिकता जबाबदार आहे. मी पुरूष आहे, मला ती आवडली, तर ती मला हवीच हा विचार जबाबदार आहे. या विचारालाच हि तरूण मुलं प्रेम समजून बसतात हे केवढं मोठं दुर्दैव..

या सगळ्यांत आपल्याकडील चित्रपटसृष्टीचाही मोठा हातभार आहे असं म्हटल्यास चुकीचं नाही ठरणार. एक सुंदर मुलगी, तिच्या मागे लागलेला एका टपोरी, गुंड म्हणावा असा मुलगा. पहिल्या नजरेत वगैरे जो मुलीच्या प्रेमात पडलाय. मग तो मुलीच्या मागेपुढे रेंगाळतो. तिच्या अंगचटीला येतो. तिला खाणाखूणा करतो. कधी मुलगी काहीच प्रतिसाद देत नाही, तर मग सरळ सरळ जाऊन तिला प्रपोज करतो. तरीही मुलगी नाही म्हटली तर ' तू सिर्फ मेरी है', 'तू मेरी नही हुई तो किसीकी नही हो सकती' वगैरे डायलाॅग मारतो. बरेचदा तिला किडनॅप करतो. मुलीच आधी लग्न ठरलेलं असेल तर ते कसं मोडावं यासाठी प्रयत्न करतो. तरीही मुलगी नाही म्हटली तर तिला विसरण्यासाठी बऱ्याच मुलींबरोबर शारीरीक संबंध ठेवतो, फक्त सेक्स बरं का, नो स्ट्रिंग्स ॲटॅच्ड वगैरे. कारण मनात तर " ती" च आहे नाही का( म्हणजे इथेही स्त्री भोगवस्तूच ) शेवटी देवदास होऊन स्वत:च आयुष्य खराब करून घेतो.

बर या चित्रपटात कधी मुलगी हो म्हटलीच तरी आमचे चित्रपट तरूण वर्गाला काय शिकवण देतात तर, मुलगा जितका बॅडबाॅय तितका त्याच प्रेम जास्त. मुलींच्या मागे फिरणं, जवळिक करणं, खाणाखुणा करणं, अंगावर प्रेमपत्र फेकणं, ब्लॅंक काॅल्स करणं ह्या सगळ्या मनातल्या अतिउच्च प्रेमामुळे घडून आलेल्या कृतीच जणू. हे सगळं पाहून बऱ्याच मुली अशा मुलांना भुलतात. अशांच्या प्रेमातही पडतात. पुढची कहाणी प्रत्येकीची वेगळी असते. काहींची प्रेमकहाणी सफल होते ही. तर बऱ्याच जणी कधी प्रेमभंगाच्या, तर कधी डोमेस्टिक व्हायोलन्सच्या आगीत होरपळत आपलं आयुष्य काढतात.

एकतर्फी प्रेम फक्त पुरूषच करतात असं नाहीये. एकतर्फी प्रेमातून निर्माण होणारी विकृती स्त्रियांमध्येही दिसून येते. त्रास देण्याचे स्त्रियांचे मार्ग वेगळे असावेत कदाचित. बलात्काराचे, अत्याचाराचे, अतिप्रसंगाचे खोटे नाटे आरोप हा त्यातलाच एक प्रकार.

एखादी व्यक्ती मला हवीच, आणि ती मिळत नाहिये हि भावना, त्या भावनेने ग्रस्त व्यक्तीला आत्महत्येकडेही परावृत्त करू शकते. कुटुंबच्या कुटूंब उध्दवस्त होऊ शकतात या विकृतीने.

हि मानसिकता बदलायची कशी? तर याची सुरूवात घराघरांतून झाली पाहिजे. स्त्री हि भोगवस्तू नाही हे विचार मुलांच्या मनावर लहानपणापासून रूजले पाहिजेत. स्त्री फक्त शरीर नाही. स्वत:च्या आयुष्याचा निर्णय स्वत: घेण्याचा, नकार देण्याचा तिला अधिकार आहे ह्याची जाणिव मुलांना करून दिली पाहिजे. जे मुलांबाबतीत तेच घरातल्या मुलींबाबतीतही. एखादा आवडतो तर तो मला हवाच हि भावना चुकीची, प्रेम म्हणजे हिरावून घेणं नाही ह्याची शिकवण लहानपणीच मुला मुलींना मिळाली पाहिजे. काय चांगल, काय वाईट याचे निर्णय मुलं स्वत:ची स्वत: घेऊ शकतील, इतक पालकांनी मुलांना सक्षम बनवल पाहिजे. लहानपणीच हट्टीपणाच्या, तापटपणाच्या टोकाकडे झुकणाऱ्या, हवं म्हणजे हवच मानसिकता असणाऱ्या मुलांना पालकांनी काॅन्सलिंग, मानसोपचार या पध्दतींच्या मदतीने आधार दिला पाहिजे.

आताचे चित्रपट आधीसारखे राहिले नाहियत. तरीही बॅडबाॅय भूमिकेला अती ग्लॅमरस रूप देणे बंद केले गेले पाहिजे.

शेवटी प्रेम दोन्ही बाजूंनी असेल तर त्या इतकी सुंदर गोष्ट कोणती नाही. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिने आपले प्रेम नाकारलं तरीही त्या व्यक्तीचे सुख चिंतून स्वत:ही हि घटना म्हणजे एक अनुभव इतकच, असं मानून आयुष्यात पुढे जात रहाणं हा शहाणपणा अत्यंत सुंदर असतो..

- सई मनोज देशमाने

(लेखिका)

Updated : 14 Oct 2021 9:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top