Home > Max Woman Blog > आई गं..! "ठेव मोबाईल" म्हणत मुलांना ओरडणाऱ्या आईलाही लागलं मोबाइलचं जबर व्यसन!

आई गं..! "ठेव मोबाईल" म्हणत मुलांना ओरडणाऱ्या आईलाही लागलं मोबाइलचं जबर व्यसन!

लॉकडाऊनमुळे गृहिणींना मोबाईल, इंटरनेटचं व्यसन लागलं आहे का? मोबाईल पाहू नका म्हणणाऱ्या घरातल्या स्त्रिया मोबाईलच्या जाळ्यात नेमक्या कशा अडकल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

आई गं..! ठेव मोबाईल म्हणत मुलांना ओरडणाऱ्या आईलाही लागलं मोबाइलचं जबर व्यसन!
X

संकलन - साहेबराव माने

"अरे मुलांनो मोबाईल पाहू नका रे....", म्हणून ओरडणाऱ्या बहुतांश आईंचा आवाज आता थांबला आहे. कारण खुद्द आईच आता मोबाईच्या कचाट्यात सापडल्या आहेत.

मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी आई आता मात्र स्वत:च मोबाईलची जबरदस्त शिकार झाली आहे. कोरोनानंतर जगण्याचं सगळं तंत्रच बदललं आहे. "मोबाईल पाहू नका रे", असं म्हणत कधी काळी मुलांना ओरडणारी आई आता स्वत:च त्यांना सांगते आहे की, "अरे घ्या रे तो मोबाईल आणि बसा अभ्यासाला...." बरं गोष्ट इथेच थांबत नाही. मुलांना असं सांगणारी आईदेखील आता तिचा स्वत:चा मोबाईल घेऊन इंटरनेटच्या विश्वात हरवत चालली आहे.

लहान मुले असोत की मोठी माणसे. ज्याला मोबाईलचं खेळणं कसं वापरायचं हे कळलं, तो त्यात गुंतत जातो. लॉकडाऊन काळात बाहेरच्या जगाशी जो काही संपर्क होता तो केवळ मोबाईल आणि इंटरनेटमुळे. त्यामुळे साहजिकच आपल्या माणसांशी संवाद साधायला गृहिणी, महिला सगळ्याच मोबाईलला जवळ करत गेल्या. लॉकडाऊन काळातच वेगवेगळे चॅलेंजेस सोशल मिडियावर यायला सुरूवात झाली आणि मग महिला वेगवेगळे फोटो काढून सोशल मिडियावर टाकत गेल्या.

पुढच्या काही दिवसांमध्ये रेसिपी आणि कुकींग यांची नवी लाट आली. या लाटेत तर बहुसंख्य महिला ओढल्या गेल्या. वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी पाहण्यासाठी मोबाईलवरचे यु ट्यूबच कामाला आले. त्यामुळे महिलांना इंटरनेटकडे ओढणारा हा एक नवा मार्ग सुरू झाला.

लॉकडाऊन काळात सगळी दुकाने बंद होती. पण ऑनलाईन शॉपिंग साईट मात्र खुल्या होत्या. महिलांना मोबाईलकडे ओढणारे हे तिसरे कारण. मुलांसाठी काही गोष्टी किंवा घरासाठी काही सामान मागवायचे असल्यास महिला थेट ऑनलाईन शॉपिंग करत गेल्या आणि त्यात गुंतत गेल्या.

यानंतर सुरूवातीच्या काही काळात कोरोना रूग्ण कुठे आणि किती आढळत आहेत, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. शिवाय कोरोनाच्या बाबतीत येणारे अपडेट्स, कशी काळजी घ्यावी, काय करावे, काय टाळावे हे पाहण्यासाठी मोबाईलचे वॉट्सॲप हा एक सोपा पर्याय होता. त्यामुळेही बायकांना जणू तासातासाला मोबाईल हातात घ्यायचा आणि अपडेट्स पाहायचे, अशी सवय लागली.

याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे आणि मालिका पाहण्याचा नादही अनेक महिलांना लागला. रेसिपी, शॉपिंग, युट्यूब आणि इतर करमणूकीसाठी एकदा मोबाईल आला की आपोआपच अनेक विषय समोरच्या विंडोमध्ये दिसू लागतात आणि माणसं त्या इंटरनेटच्या गर्तेत अडकू लागतात. असाच काहीसा प्रकार महिलांसोबत झाला असून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महिला इंटरनेटच्या प्रचंड व्यसनी झाल्या आहेत.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख सांगतात की,

सध्याच्या काळात समारंभ, भेटी- गाठी खूप कमी झाल्याने विरंगुळा म्हणून अनेक बायकांना आता मोबाईलचा आधार वाटू लागला आहे. मोबाईल हे असे एक जाळे आहे की लहान मुलांसकट मोठी माणसे त्यात अडकत जातात. मोबाईलमुळे होणारे मानसिक आजार हा त्रास जरी महिलांना होत नसला, तरी खूप वेळ मोबाईलमध्ये जातो, अशी तक्रार आता बहुसंख्य महिला करत आहेत. अनेकदा नवरा बायकोच्या भांडणातही बायको खूप वेळ मोबाईलवरच असते, अशी तक्रार आता नवरे करायला लागले आहेत. स्त्री असो किंवा पुरूष, गृहिणी असो किंवा नोकरदार महिला कोरोना आणि लॉकडाऊननंतर मोबाईल पाहण्याचे वेड बहुसंख्य महिलांमध्ये वाढलेले आहे.

संकलन - साहेबराव माने

Updated : 6 Aug 2021 12:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top