Home > Max Woman Blog > प्रत्येक स्त्रिला स्वतःतील सावित्री दाखवणारी कलाकृती म्हणजे लोक-शास्त्र सावित्री!

प्रत्येक स्त्रिला स्वतःतील सावित्री दाखवणारी कलाकृती म्हणजे लोक-शास्त्र सावित्री!

सावित्री बाईंमुळेच आज महिला हिंमतीने शिक्षण घेतायत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. पण तरीही आजची महिला कुठे ना कुठे पुरूषावर अवलंबून राहते. दरवर्षी प्रत्येक महिला आनंदानं सावित्रीबाईंची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करते. परंतू त्यांच्यासारखं वागण्याचा, विचार करण्याचा प्रयत्न करते का आणि जर का नसेल करत तर मग तिने काय करायला हवं हे सांगणारी कलाकृती म्हणजे लोक-शास्त्र सावित्री!

प्रत्येक स्त्रिला  स्वतःतील सावित्री दाखवणारी कलाकृती म्हणजे लोक-शास्त्र सावित्री!
X

हम है… म्हणजे आम्ही आहोत! हे फक्त दोन शब्द नसून ती एक घोषणा आहे, हुंकार आहे एका नाट्यसंस्थेचा... नाही, खरं तर एका नाटकाचा.... तसंही म्हणणं योग्य ठरणार नाही. त्या नाट्यसंस्थेतील कलाकारांचा किंवा आपण असं म्हणुयात समतेच्या मार्गाने चालणाऱ्या प्रत्येकाचं हे घोषवाक्य आहे. धर्मांदतेकडे झुकत चाललेल्या या समाजामध्ये पुरोगामित्वाचा, समतेचा, शिक्षणाचा दिवा घेऊन आम्ही आहोत असंच जणू काही ही सगळी कलाकार मंडळी आपल्याला सांगत असतात. मी अचानक हे काय सांगतोय असं आपल्याला वाटत असेल. कोण आहेत ही मंडळी? कोणती नाट्यसंस्था? आणि त्यांच्या हम है या घोषवाक्याबद्दल मी का सांगतोय? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचा.


संपुर्ण महाराष्ट्रभर सध्या एक नाटक तुफान चालतंय प्रेक्षक भरभरून ते नाटक पाहण्यासाठी आवर्जून जातायत. ते नाटक आहे 'लोकशास्त्र सावित्री'! आता सावित्री आणि शास्त्र हे दोन शब्द एकत्र पाहुन गोंधळात पडू नका. सावित्री हा शब्द सावित्री बाई फुले यांचाच! शास्त्र हा शब्द 'शास्त्र असतं ते' मधील नाही तर तो आहे सत्याचा, तथ्यांचा, विचारांचा... आणि लोकशास्त्र म्हणजे काय ते आपल्याला उमगलं असेलंच. तर लोकशास्त्र सावित्री म्हणजे सावित्री बाई फुलेंचं लोकशास्त्र! हे नाटक आपल्याला फुल्यांची सावित्री न दाखवता आजच्या वर्तमानातील प्रत्येक स्त्रीमध्ये एक सावित्री आहे, तीला बाहेर काढण्याची गरज असल्याचं दाखवतं.


कसं आहे नाटक?

नाटकाची सुरूवात खरंतर प्रेक्षकांमधून लेखक/दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांच्या मनोगताने होते. नेहमीप्रमाणे कोणताही पडदा या नाटकामध्ये उघडला जात नाही. कारण उघडण्यासाठी आधी तो लावायला तरी हवा... रंगमंचावरील काळ्याकुट्ट अंधारात तीन महिला येतात. सावित्रीची तीन विविध रूपच जणू! असंच आपल्याला वाटू लागतं आणि तिथेच आपला अंदाज चुकतो. आता कसा ते जाणून घेण्यासाठी आपल्याला हे नाटक पाहावं लागेल. या नाटकात असे अनेक धक्के आपल्याला मिळत राहतात. अवघ्या दोन तासांच्या या नाटकात कोणत्याही प्रकारचा मध्यान्ह होत नाही. स्पष्टच अगदी नाटकाच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन तासांचं जरी असलं तरी एक अंकी नाटक आहे. या नाटकात आजच्या महिलांचे विविध प्रश्न मग ते सामाजिक असोत वा कौटुंबिक वा मानसिक..... स्त्रीच्या या प्रत्येक अंगावर या नाटकात प्रकाश टाकला गेला आहे.


अभिनेत्री अश्विनी नांदेडकर हिनं साकारलेलं पात्र या नाटकाची धुरा अतिशय उत्तमप्रकारे सांभाळतं ते तिच्या अभिनयामुळेच! यामध्ये तिला कोमल खामकर आणि सायली पावसकर या दोन गुणी अभिनेत्रींची लाभलेली साथ मोलाची आहे. या दोघींनीही आपापल्या पात्रांना(खरं तर या नाटकात कोणतंही असं पात्र नाही पण तरीही) पुरेपूर न्याय दिला आहे. विशेष म्हणजे कोमल खामकरने आई आणि श्रीमंत घरातील दबलेल्या महिलेची भुमिका अतिशय लिलया पार पाडली आहे. सायली आणि कोमल यांच्या मोलकरीण आणि घरमालकीण या दोन पात्रांमधील संवाद प्रेक्षकांना त्यांच्या नेहमीच्या आयुष्याचा आरसाच दाखवतात. शिवाय कोमल आणि तिच्या आईमधील मालमत्ता हक्कांवरून झालेला संवाद तर प्रत्येक स्त्रीला तिच्या अधिकाराची आणि मालकी हक्कांची जाणीव करून देतं. असे अनेक प्रसंग आपल्याला या नाटकात पाहायला मिळतात जे प्रत्येक महिलेला तिच्या अस्तित्वाची तिच्या सावित्री असण्याची जाणीव करूम देतात. शिवाय या नाटकात तुषार म्हस्के, सुरेखा, साक्षी, संध्या, नृपाली, प्रियंका, आरोही, तनिष्का आणि इतर कलाकारांनीही आपापल्या भुमिका चोख पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे ८ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ६० वर्षांच्या तरूणीपर्यंत या नाटकात आपल्याला कला सादर करताना दिसतात.


काय आहे वैशिष्ट्य?

या नाटकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील संगीत! या नाटकात प्रत्येक दृश्यामध्ये मी सावित्री का नाही पासून ते मी सावित्री आहे पर्यंत असा प्रवास संगीताद्वारे केला आहे. पोवाडा, ओवी, भारूड, लावणीतील सवाल –जवाब अशा सर्वच प्रकारच्या संगीत माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या नाटकात उत्तन प्रकारे केला गेला आहे. त्यासाठी लेखक/दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे.


सावित्रीचा हा जागर संपूर्ण भारतात होण्याची आवश्यकता

या नाटकाच्या प्रयोगाला ज्येष्ठ साहित्यिक प्रेमानंद गज्वी हे देखील उपस्थित होते. हे नाटक पाहिल्यानंतर त्यांनीदेखील प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की आज प्रत्येक ठिकाणी जागर करण्याची वेळ आलेली आहे. या नाटकातून जो जागर घालण्यात आला आहे तो कौतुकास्पद आहे. ज्या पद्धतीने या नाटकात कलाकारांनी कामं केली आहेत ती सुद्धा कौतुकास पात्र आहेत. आज देशभरात ज्या पद्धतीने राजकारणी धर्मद्वेषाचं राजकारण करत आहेत आणि तरूणांची माथी भडकवत आहेत त्यासाठी तर या नाटकाचे प्रयोग फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर होणं ही काळाची गरज आहे असं म्हणत त्यांनी थिएटर ऑफ रेलेव्हन्स या नाट्यसंस्थेचे तसेच लेखक दिग्दर्शक यांचं कौतुक केलं. मंजुल भारद्वज जे प्रयोग सध्या करत आहेत त्याचे परिणाम फक्त मराठीच नाही तर भारतीय रंगभुमीवर होत आहेत अशी प्रतिक्रीया यावेळी त्यांनी दिली.


काय आहे थिएटर ऑफ रेलेव्हन्स?

थिएटर ऑफ रेलेव्हन्स ही नाट्यसंस्था गेल्या ३० वर्षांपासून भारतीय रंगभुमीवर विविध नाटकांची निर्मिती करत आली आहे. या संस्थेची सुरूवातच मुळात १९९२ च्या दंगलींच्या वेळी झाली. दंगल सुरू असताना एके दिवशी मुंबईत या संस्थेच्या कलाकारांनी नाटक सादर केलं आणि उपस्थित शस्त्रधारी घोळक्याने शस्त्र त्यागल्याचा अनुभव या संस्थेचे निर्माते मंजुल भारद्वाज आणि कलाकारांना आला होता. तिथुन मंजुल भारद्वाज यांचा हा नाट्यप्रवास सुरू झाला जो आजतागायत सुरूच आहे. कोणत्याही नेपथ्याविना देखील नाटक करता येऊ शकतं हेच मंजुल यांचं सांगणं आहे. आज पर्यंत या नाट्यसंस्थेने संपुर्ण देशभरात विविध नाटकांचे हजारो प्रयोग केले होते. फक्त देशभरातच नाही तर परदेशातही य़ा संस्थेने आपली समतेची विचारधारा नाट्यनिर्मितीमधून मांडली आहे.


कला हे ज्ञानप्रसाराचं उत्तम माध्यम आहे आणि या माध्यमातील नाटक हे ज्ञानप्रचाराचं उत्तम साधन आहे. प्रबोधनात्मक विचार लोकांसमोर जाऊन त्यांच्यात उतरवण्याचे कार्य हे आपल्याला नाटकातून करता येतं. पण सध्याच्य़ा काळात नाट्य कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात दुरावा वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. व्यावसायिक नाटकातील नट - नट्या हे नाटक संपल्या संपल्या रंगमंदिरातून निघून जातात. प्रेक्षकांना अभिप्राय देण्याचीही संधी फार क्वचित आणि कमीवेळेला मिळते. परंतू ही नाट्यसंस्था कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये तयार झालेली ही चौथी भिंत तोडून प्रेक्षकांमध्ये जाऊन नाटकाची सांगता करते. कलाकार हा समाजाचा आरसा असतो आणि तो समाजाला उत्तरदायी असतो हेत हे कलाकार इतर नाट्यसृष्टीला सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. बाकी पुन्हा एकदा हेच म्हणावसं वाटतं की लोक-शास्त्र सावित्री हे नाटक फक्त महाराष्ट्राच्या १२ कोटी लोकांसमोरच नाही देशभरातील १४० कोटी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं सातत्याने वाटत राहतं.

Updated : 28 May 2022 12:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top