Home > Max Woman Blog > लॉकडाऊन, डिप्रेशन आणि भीती

लॉकडाऊन, डिप्रेशन आणि भीती

लॉकडाऊन, डिप्रेशन आणि भीती
X

लेखिका आरती आमटे-नानकर यांचा 4 वर्षांचा स्टाफ नर्स म्हणून अनुभव आहे. तसेच बहिलोलपूर - गुळगव्हाण येथील पारधी वस्तीमध्ये नियमीतपणमे नर्सिंग केअर कॅम्प घेतात. मुलांच्या व महिलांच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करतात, त्यांनी निराधार लोकांसाठी निवासी प्रकल्प सुरु केला आहे, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग

माझी एक मैत्रिण सध्या एका फोन based counseling support group मध्ये सहभागी झालेली आहे. त्यांना अनेक फोन येत आहेत. आणि प्रत्येक फोन करणाऱ्यांची गोष्ट एकदम वेगळी नसली तरी लोक तोंड देत असलेल्या अडचणींचे प्रकार, त्यांच्या मनात असलेले प्रश्न आणि भीती मात्र विविध प्रकारची आहे. बहुतांश लोकांच्या मनात भीती आहे ती म्हणजे मला, आम्हाला कोरोना होईल का? झाला तर? सध्या काम सुरू नाही, मिळेलच याची खात्री पण नाही, पैसे संपत आले, आता काय करायच? आपल्या मुलांचे भवितव्य काय असेल? इत्यादी. पण काही प्रश्न आणि काहींच्या मनातील भीती मात्र अगदीच वेगळी आणि न बोलता येण्यासारखीही आहे. पण तरीही या सगळ्यांचा सूर जवळपास एकच आहे – भीतीचा आणि नैराश्याचा.

आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या, आपण वाचत, पहात असलेल्या गोष्टींमधून ते सगळ्यांना जाणवतही असेल. मलाही ते जाणवत आहे. माझा लहान मुलगा अगदी सहजपणे बोलून जातो की “बाहेर जाऊ नये कारण बाहेर कोरोना आहे” तेव्हा त्याच्या मनात ही भीतीच तर आहे. आमच्याकडे (आम्ही सुरू केलेल्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पामध्ये) लॉकडाऊनच्या फक्त काही दिवस आधीच रहायला आलेले बाबा जेव्हा मला म्हणाले की “ लॉकडाऊनच्या सुरवातीला तुम्ही मला सोडून देणार असं मला वाटत होत” ही देखील त्यांच्या मनातली भीतीच तर आहे. आज एकाच घरात, सोबत राहत असलेल्या या दोघांच्या मनातील भीती मात्र वेगवेगळी आहे, आणि मा‍झ्या किंवा उदयच्या मनातली भीती? अर्थातच, ती ही यापेक्षा वेगळीच आहे, पण मनात भीती मात्र आहेच.

तसं पाहिलं तर भीती आणि नैराश्य या काही नवीनच गोष्टी किंवा भावना आहेत अशातला भाग नक्कीच नाही. कमी अधिक प्रमाणात का असेना पण जवळपास सगळ्यांनाच या भावनांनी यापूर्वी ही पछाडलेले असेलच. आणि त्यातील बऱ्याच लोकांनी या भावनांवर नियंत्रण देखील मिळवलं असेल, तर काहींना मात्र या भावनांनी आजही ग्रासलेलं असेल व काहींचा यामुळे बळीही गेला असेल. आता सगळ्यांनीच या भावनांवर नियंत्रण मिळवणं गरजेच असलं तरी ते सोप्पं मात्र नक्कीच नाही आणि त्यासाठी काही हमखास उपाय ही नाही, असलाच तर तो मला तरी माहिती नाही. पण, मी प्रयत्न करते तो यापूर्वी मला जेव्हा या भावनांनी ग्रासलं होत तेव्हा त्यांच्यावर मी कसं नियंत्रण मिळवलं ते आठवायचा व ज्या काही गोष्टींमुळे मला यापूर्वी या भावनांवर नियंत्रण मिळवता आलं त्या गोष्टी पुन्हा व नियमीतपणे करण्याचा आणि त्याचा मला तरी फायदाच होतो. कदाचित तुम्हालाही होईल.

आरती आमटे – नानकर

Updated : 25 May 2020 5:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top