Home > Max Woman Blog > लॉकडाऊन, घरगुती हिंसा आणि संधी

लॉकडाऊन, घरगुती हिंसा आणि संधी

लॉकडाऊन, घरगुती हिंसा आणि संधी
X

लॉकडाऊनला आता 3 महिने होत आले आहेत. या काळात सर्वांनी नवीन अनुभव घेतले आहेत. आपल्या घरी आपल्या माणसांसोबत बंदिस्त असणे व त्यांच्यासोबत आनंदात असणे असे मिश्र अनुभव सगळ्यांनी घेतले आहेत किंवा घेत आहेत. पण या सर्वांमध्ये काही स्त्रिया अश्या आहेत ज्यांना आपल्या नवऱ्याची फक्त चाहूल लागली तरी त्यांचा अंगाचा थरकाप उडतो, 5 मिनिटं सुद्धा त्याच्याजवळ राहणे हे त्यांचा सहनशीलतेच्या बाहेर असते. अश्या स्त्रियांचे काय?

"घरगुती हिंसाचार" (डोमेस्टिक वायलन्स) ह्या प्रश्नाला नेहमीच एखाद्या फटीएवढाच प्रकाश मिळतो. कारण बऱ्याच वेळेला "होईल हळू हळू नीट सगळं" हे औषध स्त्रिया या रोगावर वापरत असतात. आपल्याकडे नवरा म्हणजे देव तो नेहमीच बायकोपेक्षा वरच्या स्थानावर असायला पाहिजे अशी एक समजूत किंवा अशी एक मान्यता आहे. हि मान्यता सगळ्या वर्गवारीत आहे. पण प्रत्येक वर्गवारीत त्याचे रूप हे वेगळे असते. याची सुरुवात होते मुलगी "बघायला" जाण्यापासून. "बघणे" हा शब्द नेहमीच बोचरा आहे या बाबतीत. ज्या पद्धतीने हा "बघण्याचा" कार्यक्रम आयोजित केला जातो तो नेहमीच पुरुषी वर्चस्व दाखवणारा असतो.

रोज येण्याऱ्या बलात्काराच्या बातम्या किंवा घरगुती हिंसेच्या बातम्या ऐकून आपल्याकडे "स्त्री पुरुष समानता" हि समाजात नेहमीच अपुर्ण आहे असं दिसतं तसेच हि स्थिती बदलण्यासाठी सगळ्या संस्था कमी पडत आहे हे हि जाणवत आहे. "घरगुती हिंसा" चे प्रमुख कारण हीच "असमानता "आहे. आपल्या घरी असलेली बायको हि "स्त्री" आहे आणि तिची काही कामं हि नेमली गेली आहेत ती तिनेच केली पाहिजे अशी एक धारणा समाजात आहे. आणि ती कामं करायला जर ती कमी पडली तर तिची शिक्षा देणारा "पुरुष" हा सदैव तयार आहे. भारतामध्ये सरासरी 8000 स्त्रिया दरवर्षी घरगुती हिंसेचे बळी पडतात. हा झाला अधिकृत आकडा, अनधिकृत आकड्यांचा हिशोब कोण देणार? हा आकडा बाहेर न येण्याचा प्रमुख कारण "भीती" आहे. हजारो स्त्रिया या कुठल्या न कुठल्या भीतीपोटी हा अमानुष अत्याचार सहन करतात. मानसिक, शारीरिक, लैगिंक, आर्थिक अशी वर्गवारी ह्या अत्याचाराची नोंदवली गेली आहे.

ह्या लॉकडाऊनमुळे हतबल स्त्रियांची भीती कितीपटीने वाढली असेल याचे काही मोजमाप नाही. एका अहवालानुसार भारतात ह्या लॉकडाऊनमध्ये 92 हजार तक्रारीचें फोन कॉल आपातकालीन हेल्पलाईन वर नोंदवले गेले आहे. या मध्ये लहान मुलांच्या शोषणाच्या तक्रारीसुद्धा सहभागी आहेत. "नॅशनल कमिशन वूमन" (NCW) यांच्याकडे मार्च 25 ते एप्रिल 16 या दिवसात जवळजवळ 239 केस मेल आणि व्हाट्सप या माध्यमातून रजिस्टर झाल्या आहेत. याच कालावधीतला हा आकडा मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे येणारे कॉल आणि संदेश हे "उच्चभ्र वर्गा"तील आहेत. म्हणजे परत खालच्या वर्गाची गणना यात झालेली नाही त्याचा आकडा स्पष्ट नाही. यावरून दुसरी गोष्ट अशी दिसते कि "घरगुती हिंसे"ला नेहमी अशिक्षा, गरिबी हि मोजकी कारणे धरली जातात ती सपशेल खोटी आहेत. उच्च शिक्षित लोकांमध्येसुद्धा हि मानसिकता तशीच आहे हे दिसत आहे. एकट्या कोलकातामध्ये हिंसेचे 70 गुन्हे रजिस्टर झाले आहेत. यामध्ये मेंटली टॉर्चर आणि मारहाण या दोघांचा समावेश आहे. विशेष दखल घेण्याची गोष्ट म्हणजे यात लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या अश्या दोन्ही स्त्रियांचा समावेश आहे. लग्न झालेल्यामध्ये नवरा आणि सासरकडची मंडळी आणि लग्न न झालेल्या मध्ये भाऊ, वडील यांची नावं प्रामुख्याने येत आहे. म्हणजे यात "पुरुषी" स्वायत्ता आहे हे नात्यावरून ठरत नाही हे स्पष्ट आहे.

दिल्लीमधील एक घटना याचं उत्तम उदाहरण आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर नवरा आता रोज मारणार असे समजून घाबरून सासरहून पळ काढला आणि माहेरी आली. माहेरी आल्यावर भावाकडे काम आणि पैशांची चणचण भासू लागली आणि त्यात खाणारं एक तोंड वाढलं याच रागाने भावाने घरी आलेल्या बहिणीला मारायला सुरुवात केली. म्हणजे दोन्हीं बाजूकडे संकट आहेच. हैद्राबादमध्ये लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नाही या रागाने बायकोला अमानुष मारलेली घटना नोंदवली गेली आहे.

लॉकडाऊनमध्ये वाढलेले हे घरगुती हिंसेचे प्रमाण फक्त भारतामध्ये नाही जगभरात आहे. चीनमध्ये जिथे कोरोनाचा उगम झाला तिथल्या "हुबे" या शहरात फेब्रुवारीमध्ये नोंदवले गेलेल्या तक्रारींचीं संख्या हि मागच्या वर्षाच्या तिप्पट आहे. युरोपमधल्या लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसेचे प्रमाण हे 60% ने वाढले आहे. फ्रान्समध्ये हे प्रमाण 32% ने वाढले आहेत. यूएन (UN) कमिशनने हा "घरगुती हिंसेचा" आकडा पुढच्या 6 महिन्यात लाखाने वाढणार आहे अशी भीती व्यक्त केली आहे. यूकेमध्ये काही महिलांनी आपले मारहाण केलेले फोटो इंटरनेट वर टाकले होते आणि हे थांबावे अशी मागणी केली होती.

यामध्ये विशेष नोंद घेण्याची गोष्ट म्हणजे आपातकालीन हेल्पलाईनकडे येणारे फोन कॉलमध्ये अचानक घट दिसून आली मागच्या वर्षी या कालावधीत 808 कॉल आले होते या वर्षी या कालावधीत हि संख्या 337 वर आली आहे आणि हिच भीतीची बाब आहे कारण फक्त "भीतीपोटी" या स्त्रिया हेल्पलाईन ला पोहचत नाहीये. यामुळे सगळ्या एनजीओ काळजीत आहेत.

प्रत्येक ‘स्त्री’ मध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री जर या दोघांनीही आपली हि रुपं एकमेकांना योग्यवेळी दाखवली तर हि हिंसा कमी होऊ शकते. हि मानसिकता कमी होऊ शकते. हा सगळा लॉकडाऊनचा काळ एक माणूस म्हणून चांगलं बनण्याची संधी आहे. याचा फायदा आपल्याला पुढच्या काळात नक्कीच होणार आहे हे लक्षात ठेवून पुढे वाटचाल केली पाहिजे. संकटे येतात ती जातात सुद्धा, हीच वेळ असते आपलं मन आणि डोकं शांत ठेवून सभोवताली सकारत्मक वातावरण पसरवण्याची. कदाचित हि लॉकडाऊनची संधी परत मिळणार नाही आपल्या माणसांना समजून घेण्यासाठी. यावेळेचा फायदा करून घेऊया.

-प्रशांत वि. कांबळे

Updated : 17 May 2020 12:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top