Home > Max Woman Blog > लॉकडाऊन आणि #Bois Locker Room

लॉकडाऊन आणि #Bois Locker Room

लॉकडाऊन आणि #Bois Locker Room
X

गेल्या चार दिवसापूर्वी दिल्लीतील #बॉइज लॉकर रूमची घटना ताजी असतानाच कोलकत्ता येथेही अशाच पद्धतीची घटना उघडकीस आली आहे. कोरोना लॉकडाऊनने स्त्रियांच्या कौटुंबिक हिंसाचारात भर घातली. यात इंटरनेटवर उपलब्ध असलेले अश्लील व्हिडीओ नी राहिली साहिली कसर भरून काढली. परिणामी जगभरातील स्त्रियावर कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी समोर आली.

हे सगळं सुरू असतानाच देशात शाळकरी मुलाच्या ग्रुपने सोशल मीडियावर बॉइज लॉकररूम हे हॅशटॅग सुरू केले. २०-२२ मुलांच्या या ग्रुपमध्ये होणार्‍या चर्चा थेट मुलीवर बलात्कार करण्याची भाषा बोलू लागले. या घटनेने देशात नव्हे तर जगात स्त्रिया आणि मुलीवर होणार्‍या हिंसाचार विकृत स्वरुपात समोर आणला आहे.

देशात नोटबंदी आणि आताचे लॉकडाऊनने देशातील कष्टकरी, गरीबी लोकांच्या मानवी हक्कावर वर्मी घाव घातले आहेत. तर स्त्रियांसाठी हे घाव त्याच्यावर होणार्‍या हिंसाचाराचे हत्यार म्हणून समोर आले आहे. ह्या लॉकडाऊनने जगात असलेले समाजातील वर्गीय भेदभाव प्रखरपणे समोर आणले आहे. हे डिजिटल युग आहे. ह्या डिजीटल युगाने लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होमची द्वार खुली केली. चार भिंतीच्या आत सुरक्षित असणार्‍यासाठी हे डिजिटल युग करमणुकीचे साधन आहे. याच साधनाच्या माध्यमातून पितृसत्तेचा विषाणू पिढ्यानपिढ्या समाजात एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जशाच्या तशा स्वरुपात बॉइज लॉकर रूमच्या माध्यमातून हस्तांतरित झाला आहे. जेव्हा सगळे जग लॉकडाऊन आहे आणि जगातील एक वर्ग चार भिंतीच्या आत सुरक्षितपणे जीवन व्यतीत करत आहे, जिथे सर्वप्रकारच्या मूलभूत गरजा जीवनावश्यक वस्तूची कमतरता नाही अशा घरातून पितृसत्तेचा विषाणू मुलीवर बलात्काराची भाषा खुलेआम मांडत असतो.

जगाने शाश्वत विकासाची उद्दिष्टे स्वीकारली आहेत. यातील उद्दीष्ट चार प्रमाणे चांगले शिक्षण, पाच नुसार लिंग समभाव, अकरा नुसार शाश्वत शहर आणि समाज आणि उद्दीष्ट १६ प्रमाणे शांतता, न्याय आणि मजबूत संस्था संस्थात्मक व्यवस्था पूर्ण मजबूत करणे हे आहे. तसेच प्रामुख्याने स्त्रिया आणि मुलीसाठी सुरक्षित शहरे आणि सार्वजनिक ठिकाणे निर्माण झाली पाहिजे हे उद्दीष्ट वर्ष २०३० पर्यंत गाठायची आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला संघटनेने During Covid 19 Response and Safe cities च्या अहवालानुसार कॅनडामध्ये दर तीनपैकी एका महिला सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हिंसाचार, sexual beheviour सारख्या घटनांना सामोरी जाते. भारतात 2/3 महिला आणि मुली प्रामुख्याने ग्रामीण भागत रात्रीच्या वेळी लैंगिक हिंसाचाराच्या घटनांना बळी जातात. तर यूरोपियन देशात १५ वर्षाच्या वयोगटातील दहापैकी एक मुलगी ही सायबर हिंसाचाराची शिकार होते. चिली, कॅनडा, नायजेरिया, फिलिपिन्स, केनया, भारत, यूनायटेड स्टेट्स या देशातील किशोरवयीन मुली ऑनलाइन छळ, सायबर बुलिंग, लैंगिक हिंसाचार, सेक्स ट्रोलिंग सारख्या घटनांना बळी पडतात. ऑस्ट्रेलिया ऑनलाइन बुलिंग म्हणजे ऑनलाइन धमकी देण्याच्या प्रमाणात लॉकडाऊनच्या काळात ५०% वाढ झाल्याचे समोर आले आहे. यातील २१% प्रमाण हे व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून धमकी दिल्या आहेत.

भारतात दिल्लीतील घटनेतील मुलीने तक्रार नोंदवली म्हणून ही घटना समोर आली. यात सहभागी एक दोन नव्हे तर तब्बल २२ मुले होती. दिल्ली पाठोपाठ कोलकत्ता येथेही असेच प्रकरण समोर आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही पिढी आहे. काही वर्षापूर्वी आपल्याकडे बालक पालक नावाचा मराठी चित्रपट अशाच विषयावर प्रदर्शित झाला होता. वयात आल्यानंतर शारीरिक आकर्षण, मुलीचे फोटो, फिल्म्स पाहणे याबद्दलची मांडणी चित्रपटात होती. चित्रपटात शेवटचा संवाद महत्वाचा आहे की, आपल्या लहानपणी आपण चोरून पुस्तके पाहिली, आपल मूल फिल्मसच्या सीडी पाहतो. प्रश्न तेच आहेत प्रश्न पडणार्‍याचे वय फक्त अलीकडे आले आहे. आताच्या डिजिटल युगाने मुलांचे वय अजून कमी करून टाकले आहे. मोबाइल इंटरनेटमुळे सगळं काही चोवीस तास उपलब्ध झालं आहे. म्हणून ह्या गोष्टी वापरण्यास मनाई नाही.

डिजिटल साक्षरता काळाची गरज आहे. पण काळ कोणताही असला तरी स्त्रिया आणि मुलींसाठीचे प्रश्न, मानसिकता स्त्री देहापुरतीच मर्यादित का राहत आहे. सर्व प्रसारमाध्यमातून स्टे होम.. स्टे सेफच्या जाहिराती सातत्याने सुरू आहेत. पण...ह्या लॉकडाऊनमध्ये स्त्रिया आणि मुलींसाठी होम किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न शेष आहे. म्हणून कोरोना विषाणूने लॉकडाऊनमधील आणि लॉकडाऊननंतर खर्‍या अर्थाने पितृसत्ताक मानसिकतेवर लस शोधण्याचे चॅलेंज कुटुंब, समाज, शाळा आणि व्यवस्थेपुढं आहे.

  • रेणुका कड

Updated : 11 May 2020 10:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top