Home > Max Woman Blog > मुक्ताई शोधायच्या असतील तर आळंदीच्या सिद्धबेटावर जावं……

मुक्ताई शोधायच्या असतील तर आळंदीच्या सिद्धबेटावर जावं……

जगात कोणत्याही प्रांताला नसेल अशी संतपंरंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. याच संतपरंपरेमधलं नाव म्हणजे संत मुक्ताबाई! आतापर्यंत मुक्ताबाईंची आपल्या समोर मांडण्यात आलेली प्रतिमाच खरी आहे का की मुक्ताईंची प्रतिमा आणखी वेगळी होती याबद्दल सांगणारा सचिन परब यांचा हा लेख वाचायलाच हवा.

मुक्ताई शोधायच्या असतील तर आळंदीच्या सिद्धबेटावर जावं……
X

यंदा २०२२ च्या आषाढी एकादशीला संत मुक्ताईंवर वार्षिक रिंगणचा विशेषांक करण्याचा संकल्प केलाय. त्यानिमित्त मुक्ताईंविषयी लिहिलेलं हे छोटं टिपण.

काही व्यक्तिमत्वं ही काळाच्याही पलीकडची असतात. त्यामुळे इतिहासाला ती नीट आकळतच नाही. त्यांच्या आयुष्यातल्या लक्षवेधी घटनांनी नोंद इतिहास घेतो. पण त्यांची चरित्र त्यापुरती मर्यादित नसतात. संत मुक्ताईंचं तसंच आहे.

ज्ञानेश्वर माऊलींची छोटी बहीण, इतकं त्यांचं वर्णन पुरेसं नाही. त्यांना फटकळपणाच्याच प्रतिमेत अडकवणंही त्यांच्यावर अन्याय करणारं आहे. तितकंच मुक्ताईंच्या दिव्य देहत्यागावर अडकून राहणंही. त्याचं वीजेच्या लोळात अदृश्य होणं लक्षवेधी आहेच. पण त्यानिमित्ताने त्यांचं माणूसपण नाकारलं तर खरोखरच्या मुक्ताई हरवून जातात. ब्रह्मचित्कला आणि महायोगिनी अशा विशेषणांच्या पलीकडेही मुक्ताई खूप उरतात.

त्या मुक्ताई शोधायच्या असतील तर आळंदीच्या सिद्धबेटावर जावं लागतं. तिथे गावाबाहेर कष्टकऱ्यांच्या वस्तीत राहणाऱ्या चार भावंडांच्या झोपडीत ज्ञानदेव ताटी म्हणजे दार बंद करून बसलेले आहेत. मुक्ताई दार ठोठावतात, आवाज देतात, हट्ट विनवणी करतात. पण ज्ञानदेव प्रतिसाद देत नाहीत. विषय खोल आहे हे साधारण अकरा वर्षांच्या मुक्ताईंच्या लक्षात येतं. त्यामुळे त्या थेट तत्त्वज्ञानाच्या चर्चेला हात घाततात.

तुम्ही संत आहात आणि संताने कसं असायला पाहिजे, हे मुक्ताई ज्ञानदेवांना सांगायला सुरवात करतात. एखाद्या पट्टीच्या ड्रायव्हरने टॉप गियरवर गाडी तुफान उडवावी, तसं झालं.

राग धरले कवणाशी। आपण ब्रह्म सर्वदेशी।।

ऐशी समदृष्टि करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

संत आहात तर बोलणं सहन करावं लागेल. अहंकार गेला तर थोरपण येतं. थोरपण असेल तर भूतदया येते आणि भूतदया असेल तर राग कसा? पहिल्याच ताटीच्या अभंगात त्या परफेक्ट लॉजिक मांडतात. 'विश्व रागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी।।' पावन मनाच्या योग्याने लोकांचे अपराध सहन करायलाच हवेत.

ज्ञानी झालात म्हणून स्वतःला उंच समजता म्हणजे इतरांना हलकं लेखता ना? मनावर कंट्रोल नसेल तर भगवे कपडे घालून काय फायदा? अशावेळेस प्रत्येक घासाला विष प्यालं तरच विवेक शाबूत राहतो. मुक्ताई थांबत नाहीत. संत तोचि जगी। क्षमा दया ज्याचे अंगी।।, अशी संतांची लक्षणं सहज सांगून जातात. आपला हात आपल्याला लागला, तर तो आपण तोडत नाही. दाताने जीभ चावली तर बत्तिशी फोडत नाही. तसंच हे जग एक आहे. दुसरं कुणीच नाही. मग राग कशाला? हे लोखंडाचे चणे खाण्यासारखं असेल, तरी ते करावं लागेल.

कोणी कोणास शिकवावे। सारासार शोधूनि घ्यावे।।

तुम्ही तरोनी विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

हे ऐकून आत बसलेल्या ज्ञानदेवांना उपरती झाली नसती तरच नवल. ते बाहेर आले ते माऊली बनूनच. जगाच्या उद्धाराचा संकल्प करूनच. कृष्णाने गलितगात्र झालेल्या अर्जुनाला गीता सांगून उभं केलं. तितक्याच मोलाचे हे ताटीचे अभंग आहेत.

एका परकरातल्या पोरीने सांगितलेल्या विचारांमधला वेदांत, योग, गूढ अध्यात्म शोधण्यात विद्वानांच्या पिढ्या गेल्यात. पण सगळ्याला उपाधी मानणाऱ्या वारकऱ्यांना ताटीच्या अभंगांतून जगण्याचं रोकडं तत्त्वज्ञान मिळालंय. मुक्ताईंच्या या अभंगांनी आम्हाला आमची माऊली दिलीय. त्या मुक्ताईंचे उपकार फेडणं शक्य तरी आहे का?

सचिन परब | वार्षिक रिंगणचा संपादक | ९९८७०३६८०५ | ९४२०६८५१८३ |

Updated : 27 May 2022 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top