Home > Max Woman Blog > काश्मीरच्या कन्येचं माहेर जेंव्हा पंढरी असतं!

काश्मीरच्या कन्येचं माहेर जेंव्हा पंढरी असतं!

आपल्याला ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग गाणारी काश्मिरची एक मुस्लिम तरूणी आठवतेय. हो तीच तरूणी सध्या पुण्यामध्ये इंटरनॅशनल काश्मीर फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे त्यानिमित्ताने आली आहे. पुण्यात तिची भेट प्रसिध्द पत्रकार आणि संपादक संजय आवटे यांच्याशी झाली. काय झालं या भेटीत जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख!

काश्मीरच्या कन्येचं माहेर जेंव्हा पंढरी असतं!
X

जुलै महिन्यात येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारी निघेल काही दिवसात देहू आणि आळंदी येथुनही पालख्या निघतील. या वारीत नेहमीप्रमाणे अभंग, भजनांना टाळ-मृदूगांची साथ असेल. वारी म्हटलं की दिवंगत गायक भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी यांच्या आवाजातील 'माझे माहेर पंढरी' हा अभंग प्रत्येकाचे कान तृप्त करतो. अनेक गायकांना सतत खुणावतो. अशीच काश्मिरमधली नव्या दमाची गायिका शमिमा अख्तर हिला देखील हा अभंग गाण्याचा मोह आवरता आला नाही. तिने तो गायला आणि ती प्रचंड व्हायरल झाली होती. नुकतंच पुण्यामध्ये इंटरनॅशनल काश्मीर फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. त्या निमित्ताने काश्मिर मधले कलाकार पुण्यात आले आहेत. त्यामध्ये शमिमाचा देखील समावेश आहे. या शमिमाची भेट दै. लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्याशी झाली. काय झालं या भेटीत जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख

काश्मीरच्या कन्येचं माहेर जेंव्हा पंढरी असतं!

पुण्यात सध्या 'इंटरनॅशनल काश्मीर फिल्म फेस्टिव्हल' सुरू आहे. 'सरहद' ही संजय नहारांची संस्था हा विलक्षण खटाटोप करतेय. काश्मिरातील बरेच फिल्म मेकर्स आलेत त्यासाठी.

'नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया'त हा महोत्सव सुरू आहे. एका परिसंवादाचा वक्ता म्हणून तिथं गेलो. माझ्या ऑफिसशेजारीच 'एनएफएआय' आहे. 'एफटीआयआय' आणि 'एनएफएआय' यांच्या अगदी मध्ये आपलं ऑफिस असणं हे किती भारी असतं!

आजच्या सत्राची सुरूवात झाली ती 'माझे माहेर पंढरी' या गाण्याने.

गायिका खूप छान गात होती. त्यात आर्तता होती. भक्ती होती. या गोड मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

नंतर तिनं ज्ञानेश्वरांचं 'पसायदान' गायला सुरूवात केल्यावर तर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं वातावरण एकदम विश्वात्मक झालं.

या गायिकेचं नाव शमिमा अख्तर.

काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातली ही लहानगी सात-आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आली ती संजय नहारांचं बोट पकडून.

काश्मीरात तिच्या घरावर हल्ला झाला. तिची आत्या मारली गेली. या पाच बहिणी. सगळ्या गुणी. 'सरहद्द'नं सगळ्यांना पुण्यात आणलं आणि त्यांना हवं ते करता येईल, यासाठी पुढाकार घेतला.

शमिमा तशी औपचारिक अर्थानं फार शिकलेली नाही. पण, ती आहे प्रतिभावंत गायिका. तिला अभंग आणि संतसाहित्यानं झपाटून टाकलं. ती ते असं गाते की ऐकताना वाटतं, रोज तुळशीसमोर अभंग म्हणतच ही लहानाची मोठी झाली असावी.

पंचवीस वर्षांच्या शमिमाचा मित्र मजहर (आता या दोघांनी लग्नही केलंय!) संगीत देतो आणि शमिमा गाते. मजहर मूळचा लखनौचा. हे दोघे अपघाताने भेटले आणि प्रेमात पडले. 'सरहद'नं या दोघांच्या संगीत शिक्षणाची व्यवस्था केलीय.

शमिमाचं 'माझे माहेर पंढरी' एवढं गाजलं की पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी त्यावर चर्चा घडवल्या. बांग्लादेशातील दैनिकांच्या पुरवण्यांनी कव्हरस्टोरी केल्या.

विखाराला तोंड देत लहानाची मोठी झालेली मुलगी शिव्या-शाप देत नाही. तर, पसायदान मागते, याचं अवघ्या जगाला अप्रूप आहे.

आज ही गोड शमिमा भेटली आणि कमाल वाटली!

- संजय आवटे

संपादक, दैनिक लोकमत

Updated : 14 Jun 2022 6:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top