Home > Max Woman Blog > मतांच्या गणितात कमलादेवींची निवड 'पोलिटिकली करेक्ट’

मतांच्या गणितात कमलादेवींची निवड 'पोलिटिकली करेक्ट’

मतांच्या गणितात कमलादेवींची निवड पोलिटिकली करेक्ट’
X

कमलादेवी हॅरिस यांचे वडील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते नाहीत किंवा त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही. तरीही, याच कमलादेवी अमेरिकेच्या उपाध्यक्ष होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांना अधिकृत उमेद्वारी दिली आहे आणि ज्यो बायडन यांच्यासोबत कमलादेवीही जिंकणार, असे अंदाज आतापासूनच वर्तवले जात आहेत.

कमलादेवींनी त्यांचं आत्मचरित्र आईला अर्पण केलं आहे. श्यामला गोपालन या त्यांच्या आई. विसाव्या वर्षी चेन्नईहून ही श्यामला कॅलिफोर्नियाला जाते. तिथंल्या विद्यापीठात कर्करोगावर संशोधन करू लागते. दरम्यान, जमैकातील अर्थशास्त्रज्ञ डोनाल्ड हॅरिस यांच्या प्रेमात पडते. लग्न होतं. दोन मुली पदरात असताना घटस्फोट होतो. ही एकटी बाई पोरींना वाढवते. त्याचवेळी स्वतःलाही संशोधक, कार्यकर्ती म्हणून सिद्ध करते.

भारतातली ही बाई, जमैकाच्या- कृष्णवर्णीय नव-यापासून झालेल्या मुली आणि काम करत असते अमेरिकेत. परमुलुखात असं उभं राहाणं, मुलींना उभं करणं सोपं नव्हतं. पण, तिच्यासोबत तिच्या मुलीही धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या. आईचा आत्मविश्वास आणि माणुसकी वर्धिष्णू करणारी मूल्यं घेऊन कमलादेवी राजकारणाच्या रिंगणात उतरल्या. सिनेटवर निवडून आल्या. आणि, आता तर त्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होऊ पाहाताहेत.

हिलरी क्लिंटन अध्यक्षपदाच्या 'प्रायमरी'पर्यंत पोहोचल्या होत्या. त्यापूर्वी बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. ट्रम्प भलेही निवडून आले असतील अपघाताने, पण खरी अमेरिका ती नव्हे. ओबामांना अध्यक्ष करणारी, कमलादेवींना उपाध्यक्षपदाच्या रिंगणात उभी करणारी अमेरिका त्याहून खरी आहे.

ओबामांचा आणि कमलादेवींचा प्रवास किती सारखा आहे! दोघेही तसे समवयस्क. कमलादेवी बराक यांच्यापेक्षा चार - पाच वर्षांनीच लहान. दोघांची आई संशोधक, स्कॉलर वडील. आई-वडिलांचा लवकरच झालेला घटस्फोट. आईनं एकहाती उभं केलेलं घर. नाव लावलं गेलं ते मात्र आफ्रिकन वंशाच्या वडिलांचं. दोघेही वकील. कोणताही वारसा नसताना सिनेटवर जाणं आणि पुन्हा सर्वोच्च पदापर्यंत जाऊन धडकणं…! बराक ओबामा हा तर लग्नापूर्वीच झालेला मुलगा. पण, त्या कुंतीनं काही तो नाकारला नाही! लग्न केलं. पुढं अल्पावधीतच घटस्फोट झाल्यावर, एकटीनं वाढवत त्याला आकाशाएवढं मोठं केलं!

आजचा काळ आणखी कठीण आहे.

'ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' आंदोलन अमेरिकेत तापलेलं असताना भारतीय- आफ्रिकन अथवा आफ्रिकन- अमेरिकन असलेल्या कमलादेवींची निवड होणं महत्त्वाचं. खरं म्हणजे, 'गो-या' अमेरिकेतील मतदारांचा विचार करता, आशियाई - अमेरिकी मतदार तिथे अवघे पाच टक्के आहेत, तर कृष्णवर्णीय तेरा टक्के. मतांच्या गणिताच्या अनुषंगाने कमलादेवींची निवड 'पोलिटिकली करेक्ट' आहेच, पण त्यापेक्षाही ती मोठी आहे. 'एकल "श्यामल"नं वाढवलेली ही पोर एवढ्या मोठ्या पदावर जात असताना, अमेरिकेच्या राजकारणाचा अवकाश लक्षात घेतला पाहिजे.

'अजित की सुप्रिया' आणि 'पार्थ की रोहित?' असली नॅरेटिव्ह तयार करणा-या आपल्या देशानं तर त्यापासून बरंच काही शिकलं पाहिजे. अमेरिकेला आजवर एकही महिला अध्यक्षा मिळाली नाही, म्हणून भारताचं कौतुक करताना अनेकजण थकत नाहीत. महिला पंतप्रधान भारतालाच काय, पाकिस्तान आणि बांग्लादेशला मिळाले आणि श्रीलंकेतही ते घडले, पण म्हणून राजकीय अवकाश खुला झाला, असे मानण्याचे कारण नाही.

भारतात 'कुटुंब' नावाच्या धारणेनं आपली सर्वगामी गोची करून टाकली आहे. त्याचेच पडसाद राजकारणातही उमटत असतात. जणू काही ही आपली इस्टेट आहे, अशा थाटात, पोरांना ही जहागीर बाप सोपवू पाहातो. आणि, लोकही मग त्याच थाटात या जहागिरीची चर्चा करू लागतात. राजकीय घरातील असणे ही अपात्रता नक्कीच नाही, पण ती गुणवत्ताही नाही.

ट्रम्प यांच्यापूर्वीच्या तिन्ही अमेरिकी अध्यक्षांना, म्हणजे, बिल क्लिंटन, धाकटे जॉर्ज बुश आणि बराक ओबामा या तिघांना मुलगा नाही. तिघांनाही मुलीच. आणि, या सर्व मुली आपापल्या आवडीच्या क्षेत्रात, खासगी फर्ममध्ये वगैरे काम करताहेत. त्यापैकी कोणीही 'सो कॉल्ड' राजकीय वारसा वगैरे चालवत नाही. आणि, मीडियाही तिकडे मालिया ओबामांचं राजकारणात स्थान काय असणार किंवा 'चेल्सी क्लिंटन की मालिया ओबामा' असल्या फालतू चर्चा करू शकत नाही.

भारतात 'राजकारणी' हा वर्ग नाही, वर्णच झाला आहे. (भारतीय संदर्भातला वर्ण!) आणि, तो अन्य चार वर्णांच्या फार वर आहे. तिथपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. शिवाय, हा वर्ण जन्माधिष्ठित असल्याने अन्य स्पर्धा नाही. बाकी, जातीअंताच्या दिशेने भारत कदाचित निघाला असेलही, पण हा वर्ण मात्र वरचेवर अधिकच भक्कम होत चालला आहे. त्यातून राजकारण आणखी आक्रसू लागले आहे. लोकांच्या हातातून निसटू लागले आहे.

मोदींनी चहा विकला की नाही, ते माहीत नाही; पण 'कॉमन मॅन' ही ओळखच त्यांनी विकली आणि म्हणून त्यांना हे यश मिळाले, हे लक्षात घेतले पाहिजे. पण, 'फॅमिली फर्म'प्रमाणे राजकारणाची परिभाषा विकसित करणा-यांना अद्यापही हे पुरेसे समजलेले दिसत नाही.

कमलादेवींचा प्रवास म्हणून महत्त्वाचा आहे. त्या भारतात असत्या, तर जात-धर्म-वंश-लिंगभेदाच्या पल्याडचा हा अवकाश राजकीय प्रक्रियेत त्यांना मिळाला असता का? ... हा प्रश्न विचारला म्हणजे अमेरिकेचे वेगळेपण लक्षात येते.

पन्नाशीला पोहोचल्यावर एका घटस्फोटित मित्राशी लग्न करणारी; मूलबाळ नसलेली; आई- वडिलांच्या नात्याची अशी गोष्ट असलेली; एकच एक अशी 'ओळख' नसलेली; बंडखोर आणि बहुसंख्याकवादाला न जुमानणारी बाई भारतीय राजकारणात सोडा, इथल्या एकूण व्यवस्थेतच कुठं असली असती?

ट्रम्प यांच्या अमेरिकेत बायडन आणि कमलादेवी यांची जोडी लोकप्रिय होताना दिसणे ही नवी आशा आहे. ओबामांनी बारा वर्षांपूर्वी दाखवलेली ही आशा आज पुन्हा अधोरेखित होते आहे. 'आय ॲम नॉट रेड अमेरिका, आय ॲम नॉट ब्लू अमेरिका; आय ॲम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका' असे सांगणारे ओबामा कमलादेवींच्या बातमीने त्यामुळेच तर खुश आहेत. तसेही कमलादेवी त्यांच्या लाडक्या. ("अमेरिकेची सर्वात देखणी ॲटर्नी जनरल" असे त्यांचे वर्णन करून 'अध्यक्ष' ओबामा अडचणीतही आले होते!)

कमलादेवींचे आजोबा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले. गांधींसोबत आंदोलनात उतरलेले. बाबासाहेबांची संविधानिक नैतिकता आचरणात आणणारे. हीच 'आयडिया' कमलादेवीही मानतात. 'किसी के बाप की अमेरिका थोडी ही है…!' असे म्हणत त्यांनी बंड केले असले, तरी त्यांच्याकडे असणारी सर्वसमावेशकता त्याहून जास्त ठळक आहे.

'अमेरिकन ड्रीम'च्या दिशेने कमलादेवींनी केलेला प्रवास भारतीय वंशाचा आहे हे खरेच, पण भारतीय राजकारण या दिशेने प्रवास करणार का, हा खरा प्रश्न आहे. कमलादेवींचा वंश भारतीय आहे, हे नक्की; पण आपला वंश कोणता आहे?

  • संजय आवटे

Updated : 15 Aug 2020 2:07 AM GMT
Next Story
Share it
Top