Home > Max Woman Blog > स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला...

स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला...

स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला...
X

आपण सर्वांनी 1 जानेवारीला नववर्षाचं स्वागत अगदी जल्लोषात केलं असेल. पण लव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील मुलींची पहिली शाळा सुरू झाली होती हे किती जणांना ठाउक आहे? हेच जर ठाउक नसेल तर या शाळेसाठी किती लहान मुलांचे बळी गेले होते हे कसं ठाऊक असेल? याच साऱ्या गोष्टींचा आठवण करून देणारा लेख TV9 मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकार अश्विनी सातव-डोके यांचा हा लेख प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवा.

स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला...

एक जानेवारीला नवीन वर्षात पदार्पण केलं या आनंदापेक्षाही कैकपट आनंद, हा एक जानेवारी 1948 ला माझ्यासारख्या स्त्री-शुद्राती शूद्र म्हणून गणल्या गेलेल्या तमाम मुलींसाठी महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशातील मुलींची पहिली शाळा सुरु केली याचा होतो... स्त्री म्हणून जन्माला आलेल्या इथल्या प्रत्येकीसाठी आजचा दिवस हा भाग्योदय असणारा दिवस आहे.... आणि म्हणूनच ज्योतिबा आणि सावित्रीमाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण गरजेचं वाटतं...

1 जानेवारी 1848 हा फक्त कॅलेंडर मधला एक दिवस नाहीये.... तर वर्षानुवर्षे इथं असलेल्या दमनकारी, कर्मठ रूढी परंपरांना सुरुंग लावणारा, व्यवस्था उलथवून टाकणारा दिवस आहे... आणि माझ्या सारख्या मुलींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...!

फुले दांपत्याबरोबरच या दिवशी आणखी एका व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी....ती म्हणजे काशीबाई विश्राम घोले अर्थातच बाहुलीची....डॉ. विश्राम घोले यांच्या मुलीची.... डॉ. घोले हे त्याकाळातले प्रसिद्ध शल्यविशारद... फुलेंच्या संपर्कात आले अन त्यांनीही सत्यशोधक धर्माचं काम पुढं नेण्याची जबाबदारी उचलली.... फुलेंच्या सहवासाने त्यांनाही स्त्री शिक्षणाची प्रेरणा मिळाली... आणि या कामाची सुरुवात त्यांनी आपल्या घरातुन करण्यास सुरुवात केली....आपल्या सहा-सात वर्षाच्या मुलीला म्हणजेच बाहुलीला त्यांनी देशातील पहिल्या मुलींच्या शाळेत शिकायला पाठवण्यास सुरवात केली... अवघी सहा-सात वर्षांची हुशार चुणचुणीत पोर... या शाळेत जाऊ लागली...

पण, रुढी-परंपरेने ग्रासलेल्या त्या काळतल्या कर्मठ लोकांना ही बाब काही रुचली नाही.... त्यांनी डॉ. घोलेंना ऐन केन प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली.... या कोणत्याच त्रासाला डॉ. घोले बधले नाहीत.... त्यामुळं या कर्मठ लोकांनी ज्यात डॉ. घोले यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता... बाहुलीला काचा कुटुन घातलेला लाडू खायला दिला....हा लाडु खाल्ल्यावर अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बाहुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला... स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी म्हणून बाहुलीच्या मृत्यूची नोंद इतिहासात आहे....

आपल्या लाडक्या बाहुलीच्या या दुर्दैवी मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ डॉ. घोल्यानीं बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.... या हौदाचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी ठेवल्याची नोंद सापडते...

आज माझ्यासारख्या मुली शिकल्या त्यामागे अश्या किती बाहुलींच योगदान असेल याची नोंद इतिहासात सापडत नसली तरी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण हे कर्तव्य वाटत...

खऱ्या, प्रेरणादायी इतिहासाच्या खुणा संपवण्याची, स्मृती पुसण्याची परंपरा इथं आहे..... पुण्यातल्या जगविख्यात गणपतीच्या मंदिराच्या मागे या बाहुलीच्या हौदाचे मोडके अवशेष शिल्लक आहेत... तर याच मंदिराच्या समोर मोडकळीस आलेली या देशातील मुलींची पहिली शाळा आहे....

स्वातंत्र्यानंतर सत्तेत असलेल्या आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या एकाही नेत्याला या प्रेरणादायी इतिहासाला जपावं, अशी इच्छा झाली नाही. आता कुठे भिडे वाड्यातल्या या मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा कागदावर करण्यात आलीये... हे ही नसे थोडके... पण या शाळेनंतर फुले दांपत्याने पुणे जिल्ह्याच्या विविध भागात पाच शाळा सुरु केल्या... पण दुर्दैवाने यातली एकही शाळा आज सुरु नाहीये.... स्वतःच्या राजकारणासाठी अन स्वतःला मोठं मोठे विचारवंत म्हणवून घेण्यासाठी उठता बसता फुले दांपत्याच नाव घेणाऱ्यांनाही या शाळा सुरु कराव्यात यासाठी प्रयत्न करावे वाटले नाही, हे खूप मोठं दुर्देव आहे....

पण निदान ज्या मुलींसाठी सावित्रीमाई, फातिमाबी यांनी कष्ट सोसले... ज्या बाहुलीने आपला प्राण दिला... त्यांच्या लेकींनी तरी त्यांच स्मरण ठेऊन ज्ञानज्योत लावण्याचा हा वसा पुढे न्यायला हवा....

Updated : 2 Jan 2022 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top