Home > Max Woman Blog > कोविड प्रतिबंधकात्मक लसीचे दोन डोस घेतले असतील तर पूर्ण सुरक्षा मिळते का?

कोविड प्रतिबंधकात्मक लसीचे दोन डोस घेतले असतील तर पूर्ण सुरक्षा मिळते का?

कोविड प्रतिबंधकात्मक लसीचे दोन डोस घेतले असतील तर पूर्ण सुरक्षा मिळते का?
X

काल फेसबुकवर एक वाक्य वाचले. "आम्ही सर्व एकत्र जमलो होतो, पण जमलेल्या प्रत्येकाचा व्हॅक्सीनचा एक तरी डोस झाला होता". आणि सोबत फोटो मध्ये खूप सारे हसरे चेहरे होते, म्हणजेच त्यांनी एकत्र असताना मास्क काढला होता किंवा लावलाच नव्हता. ज्यांनी लावला होता त्यांनी अर्थातच हनुवटीला लावला होता आणि नाक झाकले नव्हते.

असे काही ऐकले, वाचले आणि बघितले कि जरा टेन्शन येते ! अजून महामारी संपलेली नाही. आणि दोन लाटांच्या मध्ये आपल्यातील प्रत्येकजण ज्या जबाबदारीने वागेल त्यावर या महासाथीचे आणि आपले सर्वांचे भविष्य ठरेल! लसीचा एक किंवा दोन डोस घेतले कि आता आपण नियम न पाळता जगायला मोकळे झालो असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही पोस्ट नक्की वाचा.

कोविड लसीकरण उपयुक्त आहे का?

नक्कीच आहे. दोन लाटांमधील मृत्यू संख्येचा फरक पहिल्या फोटोमध्ये दाखवला आहे. इंग्लंड मध्ये रुग्ण दाखल झाल्यापासून पुढे ५० दिवसांपर्यंत होणारे मृत्यू दुसऱ्या लाटेमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाले होते. अर्थात तेथील साधारण ६६% जनतेचे संपूर्ण लसीकरण दोन डोस देऊन झालेले आहे. आणि सध्या भारतामध्ये ६ ते ७% जनतेला दोन डोस दिले गेले आहेत.

लसीचा एक डोस घेतला तर सुरक्षा मिळते का?

लसीचा एक डोस घेतल्यानंतर मिळणारी सुरक्षा अत्यंत अपुरी असते. मूळ करोना विषाणू विरुद्ध कोविशिल्ड लस एका डोस नंतर देखील ७६% सुरक्षा देत होती. मात्र सध्या सर्वत्र पसरत असलेल्या डेल्टा व्हेरीयंट विरुद्ध एका डोस नंतर केवळ ३३% सुरक्षा देऊ शकते. इतर लसींची सुरक्षा देखील एका डोस नंतर कमी असते.

त्यामुळे तुम्ही लसीचा एकच डोस घेतला असेल आणि तुम्ही नियम पाळणे कमी केले असेल तर तुम्हाला करोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. लसीकरणानंतर झालेले सर्वाधिक संसर्ग एका डोस नंतर झालेले आहेत. गाफील राहिल्याने संसर्ग झाला तर आजार गंभीर होण्याची शक्यता देखील जास्त असते. म्हणून लसीचा एक डोस झाला असेल तर संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्या!

लसीचे दोन डोस घेतले असतील तर पूर्ण सुरक्षा मिळते का?

कोणतीही लस संपूर्ण सुरक्षा देऊ शकत नाही. सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्व लसी गंभीर आजारापासून कमी-अधिक प्रमाणात सुरक्षा देतात. तिसरा फोटो पहा. मात्र डेल्टा व्हेरीयंट विरुद्ध दोन डोस नंतर कोविशिल्ड आणि कोव्हेक्सीन यांची एफिकसी साधारण ६५ – ६६ % इतकीच आहे. म्हणजे संसर्ग झाला तर लक्षणांसह आजार होण्याची शक्यता ६५% ने कमी आहे. काही नव्या संशोधनांमध्ये ही सुरक्षा याहून देखील कमी आहे असे दिसून आले आहे.मात्र तुम्हाला संसर्ग झाला तर तुम्ही काही प्रमाणामध्ये आजार इतरांपर्यंत पसरवू शकाल.

लसीकरणानंतरचा धोका काय आहे?

महामारी सुरु असताना महामारीला नियंत्रित करण्यासाठी लसीकरण हा एक उपाय इतर उपायांसह वापरला तरच परिणामकारक होतो. तसेच सोशल बबल मधील सर्वांनी लस घेतली असेल तर परिणामकारकता वाढते. जसे, कार्यालयातील प्रत्येकाने लस घेतली असेल तर नकळत संसर्ग होण्याची शक्यता बरीच कमी होते.

मात्र लस घेतली आहे म्हणून कोविड-प्रतिबंधाचे इतर उपाय करणे बंद केले तर संसर्गाचा धोका वाढतो.

सध्या उपलब्ध असलेल्या लसी संसर्ग टाळण्यासाठी फारश्या परिणामकारक नाहीत. मात्र संसर्ग झाल्यास तो लक्षण-विहीन अथवा सौम्य राहील याची शक्यता वाढवतात. अश्या वेळी तीन धोके संभवतात.

लसीकरणानंतर नियम न पाळणाऱ्या व्यक्ती मोठा संसर्ग होऊन गंभीर होऊ शकतात.

लसीकरणानंतर नियम न पाळणाऱ्या व्यक्ती लक्षण-विहीन राहून संसर्ग इतर लोकांपर्यंत पोचवण्यास कारणीभूत ठरू शकतात व साथ पसरवण्यास थोडा हातभार लावू शकतात.

लसीकरणानंतर नियम न पाळणाऱ्या व्यक्ती आपल्या निकटवर्तीयांसाठी संसर्गाचा धोका ठरू शकतात.

लसीच्या दोन्ही डोस नंतर काही मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे विनाकारण धोका पत्करू नका!

लसीकरणानंतरची जबाबदारी काय आहे?

लसीकरणाची परिणामकारकता नियम पाळण्यावर अवलंबून आहे.

स्विस चीज मॉडेल नेहमी लक्षात ठेवा.. जेवढे जास्त नियम पाळाल तेवढी अधिक सुरक्षा मिळेल.

ही गोष्ट सर्व वयाच्या नागरिकांनी लक्षात ठेवायला हवी!

लसीकरण झाले म्हणजे अमृत मिळाले असे नाही. जोपर्यंत भारताती ७० ते ८०% जनतेचे संपूर्ण लसीकरण होत नाही तो पर्यंत भारताच्या आर्थिक स्थैर्यासाठी आपल्या सर्वांना मास्कचा वापर सर्व ठिकाणी आणि योग्य पद्धतीने करायलाच हवा.

आपल्या व्यावसायिक बंधूंना व्यवसाय सुरु करायचे असतील तर केसेस वाढणार नाहीत ही काळजी आपल्यातील प्रत्येकाने घ्यायला हवी.

तुम्ही किती काळजी घेताय ?

नियम प्रत्येक क्षणी पाळताय?

तुमचा प्रत्येक निर्णय कोणाच्या ना कोणाच्या जीवन मरणाशी संबंधित आहे.. विचारपूर्वक निर्णय घ्या! ही खूप मोठी जबाबदारी आहे!

Every person matters! Every decison matters!
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ , मिरज.
साभार@UHCGMCMIRAJ page in FB

Updated : 27 July 2021 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top