Home > Max Woman Blog > बॉलिवूडच्या प्रथितयश अभिनेत्रींपैकी एक उर्मिला मातोंडकर !

बॉलिवूडच्या प्रथितयश अभिनेत्रींपैकी एक उर्मिला मातोंडकर !

३० वर्षे ! ३ दशकं ... बाल कलाकार ते बॉलिवूड सुपर स्टार .. अभिनयाचा एक मोठा प्रवास केलेल्या उर्मिला मातोंडकरला 'रंगीला 'सिनेमाने सुपर स्टारडम दिलं . अनेक हिंदी स्टार्ससोबत बरोबरीने भूमिका केलेल्या उर्मिलाने तिची इनिंग गाजवली . . अभिनेत्रींच्या लग्नाविषयी जशी अमाप उत्सुकता असते तशी ती उर्मिलाच्या लग्नाबद्दल होती , आणि एका देखण्या काश्मिरी मॉडेल युवकाशी लग्न करून महाराष्ट्र्र काश्मिरात वसवलं का ? उर्मिला मातोंडकरने प्रथम काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत प्रवेश का कसा केला .. महिला दिन आणि महिलांचे प्रश्न यावर उर्मिलाशी झालेलं हे हितगूज

बॉलिवूडच्या प्रथितयश अभिनेत्रींपैकी एक उर्मिला मातोंडकर !
X

उर्मिलाच्या फिल्म करियरला ३० वर्षे पूर्ण झालीत .. राम गोपाल वर्माच्या 'रंगीला 'ह्या सिनेमानंतर उर्मिलाच्या करियरला एक मोठीच कलाटणी मिळाली आणि म्हणून तिचं नाव 'रंगीला गर्ल 'असं ही पडलं . २०१६मध्ये मोहसीन अख्तर मीर ह्या श्रीनगर निवासी (काश्मिरी ) मॉडेलशी लग्न केलं तेंव्हा ती चर्चेत आली . २०१९मध्ये काँग्रेस पक्षासाठी तिने निवडणूक लढवली , आणि ह्या निवडणूकीत तिला अपयश मिळालं सर्वश्रुत आहे तेंव्हाही अभिनय क्षेत्रांतील सिताऱ्यांनी राजकीय रिंगणात येऊ नये असा धुरळा पुन्हा एकदा उडाला .. त्यानंतर उर्मिला मातोंडकर पुन्हा विविध वाहिन्या आणि दैनिकांचे मथळे बनली ..होय , उर्मिलाने 'शिवसेनेत प्रवेश घेतला ..

८ मार्च ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत उर्मिला मातोंडकरशी झालेली ही बातचीत -

बाल कलाकार ते बॉलिवूड अभिनेत्री हा तिचा प्रवास , बॉलिवूड आणि 'मी टू मूव्हमेन्ट 'एकूणच 'फेमिनिझम 'वर तिची रोखठोक मतं , तिचे मोहसीन अख्तरशी झालेले आंतर धर्मीय लग्न , तिचा राजकीय प्रवेश -काँग्रेसच्या तिकिटावर लढवलेली निवडणूक ,त्यात झालेली हार आणि मग शिवसेनेत प्रवेश .. अशा सगळ्याच मुद्द्यांवर उर्मिला मातोंडकरने कसलाही मुलाहिजा न बाळगता आपली मतं ह्या मुलाखतीत मांडली आहेत -

एकूणच राजकारणात महिलांचं प्राबल्य ,त्यांचा राजकारणांतला वावर पुरुषांच्या तुलनेत अल्प आहे ', तुझ्या मते ह्यामागे काय कारणं असावीत ?'

उर्मिला - 'होय , राजकारण , स्पोर्ट्स , विज्ञान ,क्रिकेट (फार उशिरा महिला क्रिकेट सुरु झालं )ह्या सगळ्या क्षेत्रात महिलांचा महिलांचं वर्चस्व अत्यल्प आहे ,हे दुर्देव आहे .. महिलांना ह्या सगळ्यात स्वारस्य नाही असं नाही पण त्यांच्या आवडीनिवडीना मुरड घालावी लागली वेळोवेळी कारण ही क्षेत्रं महिलांसाठी नाहीत तर पुरुषांसाठी मर्यादित आहेत ह्या सामाजिक मानसिकतेचे जोखड कित्येक पिढ्या महिलांवर होतं , आपल्या पूर्वापार पिढ्यांकडून महिलांना 'प्रोटेक्टेड 'ठेवण्याची , घराच्या चार भिंतींत ठेवण्याच्या वृत्तीतून पुढे चालत आली .. स्पोर्ट्स -क्रिकेट राजकारण ह्या आवडी -निवडी जोपासणं सोडून द्या , करियर निवडीला वाव नव्हता , घराचा उंबरठा ओलांडण्याची मूभा नव्हती , शिक्षण घेणे अशक्य होते , स्वतःच्या पायांवर उभं राहणं ,अर्थार्जन करणं त्याहून दिवास्वप्न होतं .. पुढे गोपाळ गणेश आगरकर , महात्मा फुले अशा समाज सुधारकांमुळे महिला शिकू लागल्या , पण सामाजिक -कौटुंबिक स्तरावर माईंड सेट -मानसिकता नाही बदलली ! कुटुंबातील मुलीचे जेमतेम शिक्षण झाले की तिचे लग्न व्हायलाच हवे , कारण तिचे लग्न वेळेवर न झाल्यास तिच्या धाकट्या भावंडांची लग्नें कशी होणार ही समजूत दृढ होती .. १२-१३व्या वर्षी लग्न मग १५-१६ वर आले ..कायद्याने १८ झाले .. पण ह्या ससेहोलपटीत कित्येक तेजस्वी मुलींची भविष्य अंधःकारमय झाली !

कुठल्याही क्षेत्रात करियर घडवण्यासाठी महिला सक्षम आहेत ,पण त्यांना पुढे जाऊ देण्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी .. नकारात्मक सूर घरा -घरांत आढळून येतो .. महिलांच्या पंखात बळ देणारे सकारात्मक शब्द हवेत .. घरात समाजात अशी उत्साही सकारात्मक मानसिकता हवीये .. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर वूमेन !

अमेरिकेत जेंव्हा कमला हॅरिस उपाध्यक्ष निवडून आल्यात त्यांचं कौतुक झालं , जे उत्तमच होतं . पण सरोजिनी नायडू , कमला नेहरू , इंदिरा गांधी , सोनिया गांधी , सुषमा स्वराज्य ,जयललिता अनेक नावं आपल्याकडे राजकारणात महिलांनी एक मोठी कारकीर्द घडवल्याचे दिसून येतेय . त्यांचेही कौतुक आहेच कारण आपल्या देशातील राजकारणात मोठी कारकीर्द घडवणाऱ्या स्त्रियांचा संघर्षही मोठाच .. राजकारणात सक्रिय काम करणाऱ्या महिलांना फार मोठया प्रमाणात विरोधाला तोंड द्यावं लागतं , त्यामुळे अतिशय खंबीर मानसिकता असणाऱ्या निडर महिलांनी ह्या क्षेत्राचा विचार करावा . खूप परिश्रम आहेत ह्यात .. हे पुरुषप्रधान क्षेत्र फार पूर्वीपासून मानलं गेल्याने टिकून राहणं आणि सातत्याने स्वतःला घडवणं ही मोठी आव्हानं आहेत .. '

''आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत प्रवेश ,ह्या राजकीय घडामोडींवर काय म्हणशील ? अभिनय आणि राजकारण दोन विरुद्ध बाजू .. त्यातून तुला राजकारणाची पार्श्वभूमी नाही .. ' तुलाही राजकारणात प्रवेश करू नकोस म्हणून दबाव , विरोध करण्यात आला का ?

उर्मिला - 'काँग्रेस पक्षाला एक दीर्घ परंपरा आहे , इंदिराजींबद्दल मला पूर्वीपासून खूप आदर आहे , त्यांनतर मला राहुल गांधींकडून काँग्रेससाठी निवडणूक लढवण्याची विनंती झाली . माझ्या इंदिराजींच्या श्रद्धेसाठी मी होकार दिला , घरोघरी प्रचार केला ,पण मी निवडणूक हरले ! मोहभंग झाला खरा माझा .. पण समाजातील विविध घटकांशी मी प्रत्यक्ष भेटले , बोलले आणि वाटू लागले , अनेक वर्षे पडद्यावर काम करताना ह्या प्रत्यक्ष -खऱ्याखुऱ्या माणसांना जाणून घेणे , त्यांच्यासाठी काही करणं राहूनच गेलं .. ह्यापुढे राजकारण नव्हे तर समाजकारण करावं ह्या विचाराप्रत मी आले .. आणि पुढच्या टप्पयावर मला शिवसेनेत प्रवेशाची संधी देऊ करण्यात आली .. '

होय , माझ्या बॉलिवूडच्या कारकिर्दीला ३० वर्षे पूर्ण झालीयेत .. मी नंबर वन अभिनेत्री कधीही नव्हते पण त्या 'रॅट रेसमध्येही कधी नव्हते . तरीही मी आत्मविश्वासपूर्वक सांगू शकेन , कुठलाही चित्रपट चाहता माझे टॉप १० सिनेमे सहज सांगू शकेल , ही माझी कमाई आहे .. प्रसिद्धी , मानमरातब -मुबलक पैसा आणि सप्ततारांकित आयुष्य लाभल्या नंतर मी जर राजकारणात आलेय तर नक्कीच इथे पैसे कमावण्यासाठी आले नाहीये .. इथे राजकारणासारख्या सर्वस्वी नवख्या क्षेत्रात मला पुढे यश मिळेल , अथवा अपयश मिळेल ह्याबद्दल मी आताच्या क्षणी अनभिज्ञ आहे .. त्यामुळे सिनेमाप्रमाणे मी इथे टिकेन अथवा नाही मला ठाऊक नाही .. कारकिर्दीच्या ह्या टप्प्यावर माझ्यासाठी ही रिस्क आहे खरी ,पण मी ही रिस्क घेतलीये शिवसेनेतून विचारणा झाली तेंव्हा मी होकार दिला , कारण निव्वळ एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजासाठी काम करणं सोपं नाहीच . बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या बद्दल , त्यांच्या कार्याबद्दल मी जाणून आहे .. पुढे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे , आदित्य ठाकरे मला काय सांगतील हे लवकरच ठरेल . सिनेमा क्षेत्रातील एन टी आर पासून कमल हसन आणि अमिताभ बच्चन ते जया प्रदापर्यंत अनेक दिग्गज राजकारणात आलेत . मला जशी राजकीय पार्श्वभूमी नाही तशी त्यांनाही नव्हती , मग मी इथे काम का करू नये ?

विरोध मला करण्यात आला ,पण मी कुणाचीही पर्वा केली नाही . नकारात्मक विचारांचं एक कुंपण माझ्याभोवती तयार करण्यात आलं ,पण माझं मनोबल सशक्त असल्याने माझ्यावर कसलाही प्रभाव पडला नाही .. माझी बहीण एक नामांकित वकील आहे . पण विवाहनंतर विशेषत दोन मुलांचे संगोपन , प्रपंच हे सांभाळताना तिचे यशस्वी करियर कधीच मागे पडले .. अर्थात तिच्यासाठी करियर तिचे प्राधान्य होते असं ही मला म्हणायचं नाही ,पण माझ्या मनाला मात्र क्वचित चुटपूट लागून जाते , तिला जर थोडा वेळ करियरलाही देता आला असता तर ! म्हणून कुठेतरी मला असं वाटतं स्त्रियांच्या बाबतीत अनंत अडचणी येतच राहतात , त्यावर मात करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे .. मी माझ्या करियर आणि व्यक्तिगत जीवनात नेमके काय केले पाहिजे आणि काय करू नये ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मी कुणालाही देणार नाही .. प्रत्येकी महिलेला तो मिळाला पाहिजे , तर तो महिला दिन ठरेल . '

'८ मार्च महिला दिन आहे ,तुझ्या मते स्त्री स्वातंत्र काय ? तू स्वतःला फेमिनिस्ट मानतेस का ? तुझं लग्न धर्माने मुस्लिम असलेल्या जोडीदारासोबत झालं आहे , त्याच्याकडून अथवा त्याच्या कुटुंबियांकडून तुझ्यावर काही बंधनं आहेत का ? '

उर्मिला - 'खरं म्हणजे मला 'फेमिनिस्ट 'हा शब्द मला पटत नाही . . आपण स्त्री -पुरुष -मूल ह्या वर्गवारीपेक्षा आधी माणूस आहोत . स्त्री म्हणून जन्माला येणे हा मी बहूमान -वरदान समजते . स्त्रीत्व स्त्रीला मातृत्व बहाल करते . स्त्रियांकडे मानसिक शक्ती ही पुरुषांपेक्षा कांकणभर अधिक असते . स्त्रिया मल्टिटास्किंग असतात . फेमिनिस्ट होण्याच्या भरात किंवा मी फेमिनिस्ट आहे हे दाखवण्याच्या भरात स्वतःचं स्त्रीत्व त्या बाजूला ठेवतात . माझ्या मते आजच्या समाजात स्त्री आणि पुरुष हे सम-समान पातळीवर आहेत , अनुभव आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळावी , फक्त स्त्री आहे म्हणून सगळ्या सवलती स्त्रियांना मिळणे गैर आहे . पती पत्नी -भाऊ बहीण ह्या सगळ्या निकटच्या नात्यांमध्ये स्त्री पुरुष हे नातं बरोबरीने -सन्मानाने वागवलं गेलं पाहिजे . 'पाच -सहा आकडी पगार घेणारी , एसी केबिनमध्ये बसणारी उच्यपदस्थ स्त्री म्हणजे ती फेमिनिस्ट , तिलाच व्यक्तिस्वातंत्र मिळाले पाहिजे असं एक चुकीचं चित्र दिसतं , त्यावर माझा विश्वास नाही .. पदपथावर भाजी विकणारी ,धुणे भांडी करून संसाराचा गाडा हाकणारी , स्वतः शिकलेली नसली तरी कोंड्याचा मांडा करून आपल्या लेकरांना अन्न भरवणारी - त्यांना शिक्षण देऊन त्यांना पायांवर उभं करणारी स्त्री देखील समाजासाठी आदर्श माता -अतिशय आदर्श स्त्री आहे ... घरातला मुलगा म्हणजे कुलदीपक आणि मुलगी म्हणजे दुसऱ्याच्या घरातील धन ही चुकीची धारणा -परंपरा बंदच व्हावी . घरातील मुलींना वाढवताना मुलींच्या पाठीशी पालकांनी ठामपणे कायम उभं राह्यला हवं . त्यांचा आत्मविश्वास भक्कम करणं हे धोरण आई-वडिलांनी सुरुवातीपासून ठेवलं पाहिजे . मुलींना त्यांचे महत्वाचे -करियरचे निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली पाहिजे . मुलगी म्हणजे असहाय्य -दुबळी असं मुलींना कधी वाटू देऊ नये . मुलींचे मनोबल आत्मबल वाढावं अशी घरातील वागणूक सगळ्यांची असावी . माझ्यासाठी ही स्त्रीमुक्ती आहे .. स्त्रीला सन्मानाची वागणूक घरातूनच मिळाली गेली पाहिजे .

मी श्रीनगरच्या मोहसीन अख्तर मीर ह्या कट्टर मुस्लिम कुटूंबातील युवकाशी २०१६ मधे विवाह केला . हे माझं भाग्य की मला एक समंजस -परिपकव आणि उदारमतवादी जोडीदार लाभला . मोहसिनचा विश्वास स्त्री -पुरुष समानतेवर आहे . माझ्या फिल्म राजकारण करियरबद्दल त्याचा कसलाही विरोध नाही . आम्ही टिपिकल पती पत्नी नाही , मित्र आहोत . विवाह माझ्यासाठी फॉलिन्ग अबाऊह लव्ह आहे , फॉलिंग इन लव्ह नाही !

जेंव्हा माझ्यासाठी मुंबईत काम असते , माझे आई-वडील -बहीण -कुटुंब मुंबईत आहेत , तेंव्हा मी मुंबईत असते . श्रीनगर -मुंबई अशा आमच्या दोघांच्या फेऱ्या वरचेवर चालू असतात . आम्हां दोघांचं सहजीवन प्रेरक आहे नव्या पिढीसाठी असं मी मानते . मोहसिनच्या धर्माचा मी आदर राखते ,आणि तो माझ्या धर्माचा यथोचित आदर राखतो . माझे सासू सासरे मुस्लिम धर्म पाळतात , नमाज पढतात .. माझ्या लग्नाच्या आधी माझ्या घरी जेंव्हा माझे सासू सासरे आलेत तेंव्हा मी वेस्टर्न पेहरावात होते . लग्नानंतर मी श्रीनगरला गेले तेंव्हा सतत सलवार कमीजमध्ये होते . गुलमर्गला माझे काम होते ,कडाक्याची थंडी होती ,म्हणून जीन्स आणि स्पोर्ट्स शूज असा पॆहराव केला , माझ्या सासूबाईंनी मला दाद देत म्हटलं , जो तुम्हे कम्फर्टेबल लगे ऐसे ही कपडे पहना करो .. सलवार कमीज हिजाब की कोई जरुरत नहीं !

एक पारपम्परिक मुस्लिम स्त्री त्यातून ती माझी सासू त्यांच्याकडून मला इतक्या आश्वासक शब्दांची अपेक्षाच नव्हती ! मला माझ्या आईसारख्या प्रेम आणि जिव्हाळा देतात त्या .. आणि काय सांगू ? '

'२ वर्षांपुरी बॉलिवूडमध्ये 'मी टू 'चळवळ जोमात सुरु झाली , त्याची चर्च जगभर पडसाद उमटलेत ,पण नंतर मात्र 'पीन ड्रॉप सायलेन्स 'असं का व्हावं ? ३० वर्षे बॉलिवूडमध्ये काम केल्यांनंतर तुझ्याशी कुणी गैरवर्तन केल्याचा तुला अनुभव आला का ?

नेपोटिझ्म अर्थात घराणेशाही बॉलिवूडमध्ये असताना स्वतःचं अस्तित्व कसं टिकवलंस ?'

उर्मिला - माझा जन्म -पालनपोषण एका मध्यमवर्ग महाराष्ट्रीयन कुटुंबात झाली . जगात कुठंही मध्यमवर्ग संस्कृतिचे आजही गोडवे गायले जातात ते उगाच नाही .. संस्कार -मूल्यं -आदर्शत्व ह्याचा वसा -शिकवण आई वडिलांकडून मिळाली आणि माझ्यावर ते संस्कार होणे स्वाभाविक होतं . हिंदी चित्रपट सृष्टीत मी 'नो नॉन्सेन्स गर्ल 'म्हणून प्रसिद्ध होते .. माझ्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिलं नाही ,तशी हिम्मतही झाली नाही . कुणाचा आगाऊपणा सहन करणारी मी नाहीच . माझ्या भूमिकांची गरज म्हणून मी ग्लॅमरस प्रसंगी तोकड्या कपड्यातही वावरलेय ,पण फिल्म्स मिळाव्यात म्हणून कधीही तडजोडी कदापि केल्या नाहीत , तडजोडी न करण्याच्या तत्वामुळे कदाचित काही बिग बॅनर सिनेमे मला मिळाले नसतील ,पण वाईट अनुभवांना मी सामोरी गेले नाही . .

'मी टु 'ह्या मुव्हमेंटची सुरुवात झाली हा आनंदाचा भाग . सगळ्या स्त्रियांमध्ये स्वतःच्या शोषणाची हकीकत सांगण्याची हिम्मत नसते . जिच्यात असते ती खरंच हिंमतवान . . सध्या जरी 'मी टू 'बद्दल शांतता आहे तरी ह्या चळवळीने भविष्यात देखील गरजूना न्याय मिळेल .

देशातील विविध भागातून शेकड्याने तरुणी अभिनय मॉडेलिंग मध्ये नाव -पैसे कमावण्यासाठी येतात ,त्यासाठी सगळी दिव्यं करण्याची त्यांची मानसिक तयारी असते . जर इप्सित साध्य झाले नाही तर त्या 'मी टु 'बद्दल वाच्यता करतात . ह्यात टाळी एका हाताने वाजत नाही असं ही निदर्शनास येतं .

'राजकारणात सक्रिय झाल्याने अभिनय बॅक सीटवर गेल्याची खंत वाटते का ? '

उर्मिला - 'राजकारणात मी स्वमर्जीने आलेय ,ते अभिनयाची विरक्ती आली म्हणून नाही . अभिनयामुळेच एका सामान्य उर्मिला मातोंडकरचा प्रवास अभिनेत्री उर्मिला असा घडला . श्रीदेवी ,नासिरुद्दीन शाह ,अनिल कपूर ,शाहरुख खान ,आमिर खान ,संजय दत्त अशा अनेक दिग्ग्जनसोबत मला काम करण्याची संधी गेली ३० वर्षे मिळतच गेली . अभिनयाचा प्रवास देखील मला समृद्ध संपन्न करून गेला . राजकारण ही माझी दुसरी इनिंग आहे , हा प्रवास माझ्यासाठी कसा -कुठल्या दिशेने जाणारा असेल मला ठाऊक नाही .

युवा नेते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनांखाली मी काम करेन . मी चित्रपट तेंव्हाच करेन जेंव्हा भूमिका मला यादगार वाटेल . गेल्या २-३ वर्षात काही फिल्म्स आणि वेब सिरीज यांची ऑफर येतच होती पण ह्या ऑफर्स मला खास वाटल्या नाहीत . योग्य भूमिका वाट्याला आल्यास भूमिका स्वीकारेन अन्यथा माझा वेळ राजकारणासाठी असेल.

- पूजा सामंत

Updated : 6 March 2021 4:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top