Home > Max Woman Blog > लॉकडाऊन, लैंगिक शोषण आणि एकल महिला

लॉकडाऊन, लैंगिक शोषण आणि एकल महिला

लॉकडाऊन, लैंगिक शोषण आणि एकल महिला
X

रेणुका कड

लेखिका महाराष्ट्र राज्याच्या एकल महिला धोरणाच्या समिती समन्वयक आहेत. महिला हक्क, बाल हक्क व अन्य सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवून समाजबदलाचा लढा देत आहेत.

लोकमत सखी सन्मान, सकाळ पुरस्कार, एम जी एम महिला सक्षमा पुरस्कार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा पुरस्कार, भारत सरकार केंद्रीय मंत्रालय व प्रसारण यांचा मराठवाडा विभागीय पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत.

वंदना (नाव बदलेले आहे ) ३२ वर्षीय विधवा स्त्री. पतीच्या निधनानंतर दोन मुलांसोबत एकटी राहते. उदरनिर्वाहाच साधन म्हणजे चार घरच धूनीभांडी करणे. पती एचआयव्हीमुळे मरण पावला म्हणून नातेवाईकांनी तिच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. सासर्‍याकडून हिच्या पतीला त्याच्या वाटेचे दोन रूम मिळाली. त्यासाठीही तिला कायदेशीर मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे राहत्या घराचा प्रश्न फारसा नव्हता. नवरा कधी जबाबदारीने वागला नाही. घर चालविण्यासाठी ती आधीपासूनच काम करत होती. त्यामुळे सगळं ठीकठाक सुरू होत.

वंदना सात घराचं धूनीभांडी घासण्याचे काम करते. या कामाचे महिन्याला पाच साडेपाच हजार रुपये कमावते. यात घर खर्च, मुलांचं शिक्षण, कधी काही आजारपण असा सगळा पैसा दर महिन्याला खर्च होतो. किराणा सामान घरात लागेल तसे घेऊन यायचं. मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन झाल्यामुळे घरमालकांनी कामावर येण्यास बंदी घातली. त्यामुळे अशा घरकाम करणार्‍या महिलांना अचानकपणे हातच काम गेल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. अशीच ही वंदना.

घरात जे काही होत त्यावर कसाबसा आठवडा काढला. पैशाची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे बंदी असतांनाही घरमालकाकडे मार्च महिन्याच्या केलेल्या कामाचा पगार मागण्यासाठी गेली. घर मालकांनी पैसे दिल्यामुळे जरा मनावरच ओझं कमी झाल होत. घरी आल्यावर घरच्या कामाला लागली. मुले बाहेर खेळत होती. याच वेळेचा फायदा घेत तिच्या दिराने तिच्यावर घरात घुसून जबरदस्ती केली. सगळीकडे बंद असतांना बाहेर जाऊन तू काय धंदे करते माहित आहे. असे म्हणत तिच्यावर झडप घातली. त्याच्या शारीरिक जोरापुढे तिचा प्रतिकार कमी पडू लागला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. शेजारचे लोक जमा होऊ लागले हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा तिलाच मारहाण करत तुझ्यामुळे माझा भाऊ गेला असे म्हणत तिच्या घरातून बाहेर पडला. शेजारी जमले होते तेव्हा सगळी दुनिया बंद आहे तरी ही बाहेर कशासाठी जाते म्हणून विचारायला गेलो तर आरडाओरडा करायला सुरुवात केली, असे जमा झालेल्या लोकांना सांगू लागला. हिच्यामुळे कोरोना रोग आपल्या गल्लीत आला तर काय करायचं अशी बडबड करू लागला. तसे जमा झालेले लोक तिच्याकडे पाहू लागले. यावर चूप बसून चालणार नाही. याला वेळीच रोखले पाहिजे ही निर्धार करत बंद असतांनाही पायी चालत पोलिस स्टेशनला जावून तक्रार केली. तर सगळे प्रशासन कोरोना बंदोबस्तात गुंतलेले आहे. तक्रार घेण्यास लवकर कोणीच तयार होईना. शेवटी उपाय म्हणून तिने ती ज्या घरी काम करते त्या बाई वकिल आहेत. त्यांना फोन करून मदत मागितली. त्या वकील असलेल्या बाई जेव्हा पोलिसांशी बोलल्या तेव्हा पोलिसांनी तिची केस नोंदवून घेतली.

असे प्रसंग एकट्या राहणार्‍या स्त्रियांच्या आयुष्यात दुष्काळ असो की कोरोना असो याचा सामना त्यांना करावा लागतो. एकटी बाई, आर्थिक दृष्ट्या पुरुषावर अवलंबून नसलेली बाई आपल्या समाजात लॉकडाऊन असो किंवा नसो अशा घटनांना सामोरी जात असते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात राहणे हा पर्याय आहे. जेणे करून विषाणू फैलाव रोखला जाऊ शकतो. पण पितृसत्तेच्या विषाणूच काय करायचं. त्याला प्रतिबंध करण्यासाठी समाजाने एकत्रित उभे राहणे गरजेचे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने लॉकडाऊनच्या काळात महिलांवर घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्रगत समजल्या जाणार्‍या देशामध्येही महिलांची हीच अवस्था आहे. म्हणून स्पेनमध्ये ज्या महिलांना तक्रार करण्यासाठी फोन करणे किंवा मेल करणे शक्य नाही त्यांच्यासाठी सरकारने मेडिकल स्टोअरमध्ये ही तक्रार नोंदविण्याची सोय केली. त्यासाठी महिलेने मास्क १९ हा शब्द उच्चार करणेही पुरेसे होते. हीच उपाय योजना फ्रान्सनेही केली. आपल्या राज्यात महिला सहाय्य कक्ष आहेत, महिला हेल्पलाईन आहेत. पोलिस प्रशासन बंदोबस्तच्या कामात गुंतलेले आहेत. जर राज्य सरकारने याठिकाणी एमएसडब्ल्यू, मानसशास्त्र झालेल्या लोकांना ह्या कामात सहभागी करून घेतले तर किमान समुपदेश केले जाऊ शकते. राज्यात फॅमिली कोर्ट आहे त्यांना बंद ठेवण्यात आले हे हे कोर्ट सुरू करणे गरजेचे आहे. यासाठीचे नियोजन केले तर काही प्रमाणात अत्याचारग्रस्त पीडित स्त्रीला समुपदेश, भावनिक आधार देण्याचे काम होऊ शकते.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. राज्यात लॉकडाऊन कालावधी ३० एप्रिलपर्यंत करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे घरेलू कामगार स्त्रियांना घरमालकांनी कामावर येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राज्यात असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या सगळ्या लोकांच्या रोजगारावर कोरोनाची कुर्‍हाड चालवली गेली. यात एक मोठा वर्ग एकल महिलांचाही आहे.

एकल महिला अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडत असतात. त्यांच्यावरील अन्यायाला नोंदवून घेण्यासाठी प्रशासन सहजी तयार नसते. हे चित्र अशा एकल महिलांसोबत काम करत असतांना नेहमीच पाहायला मिळत. एकटी राहणारी बाई अशा घटनांना मोठ्या हिंमतीने मात देत असते पण प्रत्येकीला हे शक्य होईलच असे नाही. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात जगभरातील महिलांवर हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल सांगतो आहे. लोकांनी आपल्या कुटुंबातील महिलांवर कोणताही हिंसाचार करू नये, असे आवाहन केले आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी विविध उपाय योजना सुचविल्या जात आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील एकल महिला ह्या आधीच हालाखीचे जीवन जगत असतात. काहीजणींना जोडीदार सोडून (परित्क्त्या) गेला आहे. काहीजणींचा जोडीदार मरण पावला आहे. काहीजणी कौटुंबिक कलहामुळे विभक्त झाल्या आहेत. अशा वेळी माहेरचे कुटुंबही मदतीला काही दिवसच तयार असते. रोजचं हे सगळं घडत असेल तर मुलीला तुझं तू पाहून घे हे सांगितले जाते. हातात पैसा नाही. मदतीला नातेवाईक नाही. ज्याला आयुष्याचा जोडीदार म्हटले तो कधी जबाबदारीने वागला नाही. उलट मुलांच्या संगोपणाची जबाबदारी एकटीने पार पाडण्याची जबाबदारी बाईच्या खांद्यावर येऊन पडते. जेव्हा ह्या महिला एकटेपणाचे आयुष्य जगत असतात तेव्हा त्यांच्यावर मुलांची जबाबदारीही असते. कुटुंब प्रमुखाची भुमिका या महिला सर्वबाजूंनी निभावत असतात. असे असले तरी महिलांवरील अत्याचाराचा आकडा वाढता आहे. कोविड १९ च्या आधी जागतिक स्तरावर दिवसाला १३७ स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसाचाराच्या पीडित आहेत. कोरोनाने त्यात अजून भर टाकली आहे.

-रेणुका कड

Updated : 16 April 2020 8:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top