Home > Max Woman Blog > आई, कोरोना आणि आठवणी

आई, कोरोना आणि आठवणी

आई म्हणजे आठवणींचा कोलाज, लेकीचे बाळंतपण, जावयाचा पाहुणचार, बहिणी, नणंदा, जावा, सगळ्यांची मुलं म्हणजे तिचीच मुलं... फक्त ती आपलीच आई नसते. ती सर्वांची आई असते. अशी आई अचानक कोरोनानं आपल्याला सोडून गेली तर...? वाचा योजना यादव यांच्या आईबाबतच्या नखशिखांत भरलेल्या आठवणी

आई, कोरोना आणि आठवणी
X

आज आईचं दहावं झालं. दिवसांचे रकाने असेच भरत राहतील. तिच्या नसण्याचा सराव होत राहील. आणि मेंदूची एक एक पाकळी तिच्या आठवणींचा कोलाज करत राहील. सात बाळंतपण, बापूंचं अकाली जाणं, सहा मुलांना घेऊन एकटीनं संसाराचा गाढा ओढण आणि तरीही कुणाही पुढे हात न पसरण्याचं आजन्म व्रत.

अक्की इतिहासाचा अभ्यास करत नाही म्हणून तिनं एका बुक्कीत तिचे दात पाडले होते.. राणीनं कितीही नकार घंटा वाजवली तरी तिला हट्टान B.ed करायला लावलेलं. मुलींच्या लग्नापेक्षा प्रत्येकीने आत्मनिर्भर असणं तिला महत्वाचं वाटायचं. दुपारी झोपणं पूर्ण वर्ज्य. हात आणि मेंदू सतत कार्यमग्न असायला हवेत हेच तिचं तत्त्व. आणि तिला आजीनं दिलेला वसा असलेलं तिचं ठेवणीतल वाक्य होतं, 'काय ग्वाड तर काम ग्वाड' ...सगळे एकत्र जमले, गप्पा झाडत बसले की हमखास म्हणायची, घर येड, पॉर पिसं जावई मिळालं ते बी तसं

तेराव्या वर्षी लग्न होऊन सांगलीला आलेली शकी. गावाकडच्या प्रत्येक पाहुण्यांसाठी शहरातलं हक्काचं घर झाली. बहिणी, नणंदा, जावा, सगळ्यांची मुलं म्हणजे तिचीच मुलं. प्रत्येकाच्या शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक प्रगतीत तिचं योगदान..पण बापू गेल्यावर कुणाकडेही तिने हक्काने काही मागितलं नाही. तिच्या भाषेत सांगायचं, तर कुणाच्या दारात जायचं नाही. मला तिचं हे लॉजिकच कळायचं नाही. आपण फक्त दात्याच्या भूमिकेत राहायचं. दुबळेपण म्हणजे जणू आत्मघात.

तिचं बचतीच तंत्र तर भल्याभल्यांना कोड्यात पाडायचं. बापूंना शंभर रुपये पगार होता, तेव्हा तिनं प्लॉट घ्यायला तीन हजार रुपये साठवून सगळ्यांना चकित केलं होतं. त्याच हट्टाने तिनं घरही बांधलं. बापू गेल्यावर या घराच्या बळावर तिनं आम्हाला लहानाचं मोठं केलं. हळूहळू तिच्या पोरींनी तिच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. पण ते ही तिच्या काटेकोर नियोजनानुसार..आज गॅस संपेल म्हणायची, त्याच दिवशी गॅस संपायचा, मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्याला त्यानं मीटर पाहण्यापूर्वीच आकडा कळायचा, आमच्या सहा जणांचे LIC चे हप्ते केव्हा येणारेत आणि कधी पर्यंत भरायचेत...इतकं इतकं छोटं मोठं तिला माहीत असायचं. इतका तीक्ष्ण मेंदू एका क्षणात शांत झाला.

आईच्या किती गोष्टी साठलेत आत. ती आठवणी सांगायला लागली की साधी माणसं सारख्या एखाद्या सिनेमाची गोष्ट ऐकत असल्यासारखं वाटायचं. इतकं नाट्यमय आयुष्य जगली ती. कोरोनाचं निमित्त झालं आणि आईचं शरीर अस्तित्व संपलं. पण आई गेली नाही..आई जाणारही नाही... आई उभीच आहे शरीरात नखशिखांत.

(योजना यादव यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 11 Oct 2020 3:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top