Home > Max Woman Blog > "कॉंग्रेसच्या गरिबी हटाव चा प्रचार मी केला, पण अजून माझी गरिबी हटलेली नाही"

"कॉंग्रेसच्या गरिबी हटाव चा प्रचार मी केला, पण अजून माझी गरिबी हटलेली नाही"

कॉंग्रेसच्या गरिबी हटाव चा प्रचार मी केला, पण अजून माझी गरिबी हटलेली नाही
X

काँग्रेस हा गोरगरीबांचा पक्ष आहे. अशा श्रद्धेने लोककलावंत सरूबाई धडे यांनी आयुष्यभर या पक्षाची सेवा केली. काँग्रेस आज जो तळागाळापर्यंत पोहचला आहे त्याचे कारण सरुबाईंसारखे कलाकार आहेत. त्यांनी गाण्यांच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचवली आहेत.

ज्या काळात आजच्या सारखा सोशल मीडिया नव्हता. गावातील पुढाऱ्यांच्या सभांना काहीच लोक उपस्थित असायची अशा प्रतिकूल काळात सरूबाई काँग्रेस पक्षासाठी माध्यम बनून काम करत होत्या. गावात प्रचारासाठी फिरणाऱ्या भोंगा लावलेल्या गाडीत बसून त्या गाणी म्हणत होत्या. गावात शेतात वाडीवस्तीवर फिरून महिलांचा पक्षाला पाठिंबा मिळवून देत होत्या. त्यांना जनतेने डोक्यावर घेतलं होतं. पुढाऱ्यांच्या भाषणाला एकदा टाळ्या वाजायच्या पण सरुबाईनी गाणी सुरू केल्यापासून शेवटपर्यंत टाळ्या वाजत असायच्या. त्या प्रचार करायच्या काँग्रेस नेत्यांना गुलाल आपलाच आहे म्हणून धीर द्यायच्या. दिवंगत पतंगराव कदम यांच्या अनेक निवडणुकांचा प्रचार त्यांनी केला.



साहेबांच्या प्रत्येक वेळी पडलेल्या गुलालात त्यांचा खारीचा वाटा असायचा. त्या प्रचाराचे काम करत असताना त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं. त्यावेळी झोपडीत राहणाऱ्या सरुबाई एक किस्सा सांगतात " माझ्या या कामामुळे मी माझ्या कुटुंबावर फार मोठा अन्याय केला आहे. एक एक येळला घरात काही नसायचं माझ्या घरात जेवण नव्हतं मी बाहेर होती घरात पोरांना भूक लागली होती बुटीतील वांगी पोरांनी कापली आणि वांग्याच्या फोडी चटणीत बुडवून खाल्ली.

त्या सांगतात गरीबी हटाव हे काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे याचा प्रचार मी केला पण आजही माझ्या कुटुंबाची गरीबी हटलेली नाही. मला आज या पृथ्वीवर एक इंच देखील जमीन नाही मला राहायला घर नाही. असे असतानाही मी पक्षाशी कधी गद्दारी केलेली नाही. मी आजही काँग्रेस पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि मरेपर्यंत राहीन. काळाच्या ओघात माध्यमं बदलली. सोशल मीडिया आला. सोशल मीडियावर ट्रोलिंग हे प्रचाराचे तंत्र आले. आय टी सेल स्थापन झाले. पण या सगळ्या झगमगत्या दुनियेत ज्यांनी पक्षासाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या सरुबाईंसारख्या कलाकारांच्या आयुष्यात मात्र कायमचा काळोख आला. त्यांना दिवंगत पतंगराव कदम यांनी घराचे आश्वासन दिले होते. अनेक वर्षे त्यांनी त्या साठी कदम घराचे उंबरे झिजविले. पण अद्याप त्यांचे घर उभा राहिलेले नाही. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यांना थोडीफार आर्थिक मदत केली पण त्यामध्ये घर उभे राहू शकले नाही.

सरुबाई आता थकलेल्या आहेत. त्यांना चालणे देखील होत नाही. पण या वयातही त्यांना त्यांच्या स्वतः च्या घराची आशा आहे. त्या त्यांच्याच गाण्यातून म्हणतात " तुमच्या प्रचारात राबून माझी गेलीय हयात नका हेटाळणी करू आता माझ्या उतारवयात "



इंदिरा गांधींपासून ते सोनिया गांधी पतंगराव कदम आणि विश्वजित कदम यांच्यावर त्यांनी गाणी रचली आहेत. सरूबाई यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य काँग्रेस साठी खर्ची घातले. पण पक्षाने त्यांचा आजवर विचार केलेला नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्या जिवंत आहेत तोपर्यंत तरी त्यांच्या स्वतः च्या घराचे स्वप्न पूर्ण करावे. कलाकाराच्या जिवंतपणी त्याची उपेक्षा होणे हा आपल्या इथला पायंडा पडला आहे. त्याच्या मरणानंतर त्याच्या साहित्याचे गुणगान होते. आणि जिवंतपणी त्याची अवहेलना केली जाते. राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच काँग्रेस च्या ज्येष्ठ नेत्यांनी सरूबाई धडेंच्या बाबतीत त्यांचे कर्तव्य पूर्ण करून चालत आलेला पायंडा मोडावा. त्यांचे घर उभे करावे. त्यांच्या साहित्याच्या जोरावर त्यांना अजुन उभारी येईल.



सागर गोतपागर



Updated : 3 Nov 2020 10:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top