- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

झिका व्हायरसचा गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका, कसं कराल संरक्षण?
X
झिका व्हायरसचा गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका का आहे? या आजाराची लक्षणे कोणती? यावर लस आहे का? या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? वाचा साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचं विश्लेषण
केरळ मध्ये झिका व्हायरस बाधित १३ रुग्ण सापडले. या बातमीमुळे आपण काही काळजी घ्यायची गरज आहे का? नक्कीच घ्यायची. कारण झिका देखील संसर्गजन्य व नूतन आजार असल्याने प्रसाराची क्षमता आहे. तसेच सध्या पावसाळा सुरु झाल्याने झिका पसरण्याची शक्यता वाढते.
हा आजार कसा पसरतो? (how to spread zika Virus)
हा डासजन्य आजार आहे. एडीस नावाचा डास (ज्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुन्या पण पसरतात) चावल्याने या आजाराचा मुख्यतः प्रसार होतो. पण त्याच बरोबर, आईकडून वारेद्वारे अर्भकाला, तसेच दूषित रक्ताद्वारे आणि लैंगिक संबंधातून देखील प्रसार झाल्याच्या घटना ज्ञात आहेत.
हा नवा आजार आहे का?
हा विषाणू १९५४ मध्ये युगांडा मध्ये सापडला होता. मात्र, २०१३ नंतर जगातील विविध देशांमध्ये याचे रुग्ण सापडू लागले. मात्र, या आजाराबद्दल अजून संपूर्ण माहिती उपलब्ध नाही .
आजाराची लक्षणे कोणती?
इतर कोणत्याही व्हायरल आजाराप्रमाणे ताप, डोळे लाल होणे, डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी व अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
विषाणूबाधित डास चावल्यानंतर ३ ते १४ दिवसांनी लक्षणे दिसू शकतात.
हा आजार सहसा सौम्य असतो. लक्षणे आल्यास सहसा २-७ दिवस त्रास होऊ शकतो.
बरेच जण लक्षणविहीन देखील असू शकतात, त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
याने मृत्यूचा धोका नगण्य आहे.
असे असून देखील हा आजार महत्त्वाचा का समजला जातो?
या आजाराचा मुख्य धोका गर्भवती महिलांना व अर्भकांना आहे. आई गरोदर असताना झिका विषाणूचा संसर्ग झाल्यास जन्माला येणाऱ्या बाळामध्ये मेंदूची वाढ न होण्याचा धोका खूप वाढतो. नवजात बालकाचा मेंदू अविकसित असणे, जन्मतः मृत बाळ जन्मणे, अपुऱ्या दिवसाचे बाळ जन्मणे असे परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे गरोदर स्त्रिया आणि जे गर्भ राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अश्या स्त्रियांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
या आजारावर उपाय किंवा लस आहे का?
या आजारावर उपाय नाही तसेच लस देखील उपलब्ध नाही. त्यामुळे संसर्ग टाळणे हा एकच मार्ग स्त्रियांना सुरक्षित ठेवू शकतो.
या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी?
१. गरोदर स्त्रिया व गरोदर राहू इच्छिणाऱ्या स्त्रियांनी सध्या केरळला भेट देवू नये. तेथील आजार पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर प्रवास करू शकतात.
२. गरोदर स्त्रियांना डासांपासून, विशेषतः एडीस या डासांपासून सुरक्षित ठेवायला हवे. यासाठी पायावर काळे पांढरे पट्टे असणारे व दिवसा चावणारे डास घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी असल्यास योग्य ते डास प्रतिबंधाचे उपाय (जसे घरामध्ये व आजूबाजूला कचरा न साठू देणे, पाणी न साठू देणे, ड्राय डे इ. ) तसेच डासांपासून सुरक्षेचे उपाय करणे ( जसे अंगभर कपडे घालणे, दासांची क्रीम लावणे इ.) आवश्यक आहे. याविषयी अधिक माहिती खालील लिंक्स मध्ये मिळेल.
३. गरोदर स्त्रियांनी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत ( उदा.कंडोमचा वापर ) अथवा संबंध ठेवू नयेत.
४. गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असाल तर पतीने देखील डासांपासून सुरक्षित राहण्याची सर्व खबरदारी घ्यावी.
५. आपल्या राज्यामध्ये जर झिका रुग्ण आढळला तर विशेष काळजी घ्यावी.
६. कोणी केरळला जाणार असेल तर तिथे असताना डासांपासून सुरक्षेचे सर्व उपाय करणे आवश्यक आहे.
७. ज्यांना ताप आहे अश्या सर्व व्यक्तींनी डासांपासून सुरक्षित राहावे जेणे करून कोणताही ताप असला तरी त्याचा प्रसार होणार नाही. यासाठी सर्वांनीच आपल्या परिसरामधील डास कमी करण्याचे वैयक्तिक व सामुहिक तसेच प्रशासनिक प्रयत्न करायला हवे.
स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी महत्वाचे..
सध्या केवळ केरळ मध्ये असलेल्या आजाराबाबत व प्रसाराबाबत अद्ययावत माहिती मिळवत रहा व त्यानुसार सर्व गरोदर मातांना सुरक्षित राहण्याचे उपाय व आजाराची लक्षणे यांची माहिती द्या.
या आजाराचे केवळ प्रतिबंधन शक्य आहे. काळजी घेतली तर काळजी करण्याची वेळ येत नाही.
डासांपासून सुरक्षा मिळवली कि झिकापासून सुरक्षित राहाणे शक्य आहे.
डासांचे ऑडीट करा आणि सुरक्षित रहा!
झिका बद्दल अधिक माहिती : https://tinyurl.com/yzwtnylw
Youtube व्हिडीओची लिंक : https://www.youtube.com/watch?v=0_8Y7pzUJNY&list=PLEdJz8Z9PzVUj80Z1lG1PXHKwn0KSz9wp
डास ऑडीट बाबत पोस्ट : https://tinyurl.com/yhnwxv6f
डास ऑडीट का करायचे ? : https://tinyurl.com/yhhjjhr8
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ , मिरज.
(साभार @UHCGMCMIRAJ page)