Home > Max Woman Blog > Toilet: कथा झोपडपट्टीतल्या एका सार्वजनिक शौचालयाची

Toilet: कथा झोपडपट्टीतल्या एका सार्वजनिक शौचालयाची

झोपडपट्टीतलं शौचालय म्हणजे घाण, अस्वच्छता, तुटलेले दरवाजे असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं ना? मात्र, घाटकोपर मधील मीना कांबळे यांनी सार्वजनिक शौचालय कसं स्वच्छ ठेवावं यांचं उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे. या संदर्भात पत्रकार साधना तिप्पनाकजे यांनी सामाजिक स्वच्छतेचा मांडलेला आंखो देखा वृत्तांत

Toilet: कथा झोपडपट्टीतल्या एका सार्वजनिक शौचालयाची
X

खाली जे फोटो दिसतायत ना ते सार्वजनिक शौचालयाच्या गच्चीवरचे आहेत. या गच्चीत 70 मुलांकरिता अभ्यासिका, महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, कापडी मास्क आणि कापडी सॅनिटरी पॅड असे अनेक उपक्रम सुरू आहेत. झोपडपट्टीतलं शौचालय म्हणजे घाण, अस्वच्छता, तुटलेले दरवाजे असंच सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर येतं ना? पण मीनाताईंचं शौचालय याला अपवाद आहे. घाटकोपर पूर्वमधल्या कामराजनगर इथं हे शौचालय आहे. कामराजनगरचं अगदी शेवटच्या टोकाला आहे. या शौचालयाच्या पलिकडं खारफुटी, देवनार डपिंग आणि खारफुटीत राजकारण्यांच्या वरदहस्तानं वसणाऱ्या झोपड्या आहेत. सावित्रीबाई फुले महिला मंडळ या शौचालयाचं व्यवस्थापन करतं. मीना कांबळे या महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत.


बृहन्मुंबई महापालिकेच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत हे शौचालय बांधण्यात आलंय. रहिवाशी मंडळांद्वारे या कार्यक्रमातल्या शौचालयांचं व्यवस्थापन म्हणजेच देखभाल करण्यात येते. हे शौचालय वापरणारी कुटूंब मासिक पासद्वारे वापराकरता पैसे देतात. त्यातून पाणी, वीज, स्वच्छता केली जाते. गेले सहा महिने मी कामानिमित्त मीनाताईंच्या संपर्कात आहे. त्यांचं शौचालय व्हिडिओ कॉलद्वारे पाहिलं, तेव्हाच आश्चर्य वाटलं होतं. काल इथं प्रत्यक्ष गेले. तळमजल्यावर महिलांकरता 25 आणि पहिल्या माळ्यावर पुरुषांकरता 25 शौचालय आहेत.


अपंगांकरता कमोडची सोय आहे. अगदी काटेकोरपणे इथली स्वच्छता पाळली जाते. कोरोना काळात मीनाताईंनी इतर शौचालयांनाही खूप मदत केली. वस्तीलाही शौचालय वापरण्याची, स्वच्छतेची शिस्त त्यांनी लावलीय. गंमत म्हणजे शौचालयाच्या आत छान म्युझिकही ऑन असतं.


हे शौचालय बांधण्याकरता अडचणी खूप निर्माण केल्या गेल्या. त्यामुळं पायाकरता दोनवेळा खड्डे खणण्यात आले. कंत्राटदाराला त्रास दिल्यानं तो पळून गेला. पण मीनाताई आणि त्यांच्या मंडळातल्या सदस्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. 2015 ला सुरू झालेलं काम 2017 ला पूर्ण झालं. परिस्थितीमुळं मीनाताईंना शिक्षण घेता आलं नाही. वस्तीतली मुलं शिकावित म्हणून त्यांनी एका शिक्षिकेची नेमणूक करत 1 ते 10 वीच्या मुलांकरता अभ्यासिका सुरू केली.


लॉकडाऊनच्या काळात वस्तीतल्या अनेकांचे रोजगार गेले. शिवणकामाचं प्रशिक्षण तर त्या देत होत्याच. त्यांनी वस्तीतल्या महिलांना धीर दिला. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शिलाईमशीन मिळवल्या. मास्क, हॅण्डबॅग, सॅनिटरी पॅड, नाईटी शिवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि ऑर्डरही मिळवल्या. वस्तीतल्या महिलांकरता नियमितपणं विविध प्रशिक्षण आणि आरोग्यशिबिरंही त्या भरवतात. शौचालय स्वच्छतेबाबतची सामाजिक चौकट मोडून यशस्वी आणि उत्तमपणे शौचालय व्यवस्थापन करणाऱ्या मीनाताईंना सलाम..

- साधना तिप्पनाकजे

(लेखिका पत्रकार आहेत)

Updated : 18 March 2021 7:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top