Home > Max Woman Blog > 'सुशांतची आत्महत्या की हत्या' या घोळात कसा पिसला गेला मुंबई पोलिस??

'सुशांतची आत्महत्या की हत्या' या घोळात कसा पिसला गेला मुंबई पोलिस??

सुशांतची आत्महत्या की हत्या या घोळात कसा पिसला गेला मुंबई पोलिस??
X

एक बातमी समोर आली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. परंतु त्यात मसाला नसल्याने काहींना ती कंटाळवाणी वाटू शकते. आज मुंबई पोलिसांनी 80,000 फेक ट्विटर अकाउंट्स जे मुंबई पोलिसांविरोधात तयार केले गेले होते त्याचा तपास लावला आणि अश्या अनेक अकाउंट्सचा तपास सुरू आहे. आता ‘यात काय नवल?’ असं अनेकांना वाटण्याची शक्याता आहे. तर, हे ते अकाउंट्स आहेत जे एका पक्षाला बदनाम करण्यासाठी काही लोकांना पैसे देवून उघडले जातात, याचा फायदा असा की जास्त लोकांच एकच मत असल्याने आपण त्याला सपोर्ट करतो आणि त्यांचे हॅशटॅग फॉलो करतो. आणि हेच ते अकाउंट्स आहेत ज्यांनी आपल्याला आपल्या इवल्याश्या बोटांनी मुंबई पोलिसांविरोधात लिहण्यास किंवा तोंडामधून मुंबई पोलिसांविरोधात नारे ठोकण्यास मजबुर केले.

मी जरा सविस्तर बोलेन, “मी मुळची बारामतीची पण बारामती ला जाण्यासाठी कोणती गाडी पकडायची? हे वगळता बारामती बद्दल काहीच माहिती नसलेली मी बारामतीकर आहे. याच कारण असं की लहानपणापासून आपला एकचं जीव तो म्हणजे आमची मुंबई. बालपापासून मुंबई पोलिसांना पाहतच आले. आता पाहत आले म्हणून त्यांची बाजू घेणं फार चुकीचं. तर, चला तुम्हाला एक किस्सा सांगते.

हा किस्सा आहे माझ्या कॉलेज चा, आता थोडा मोठेपणा म्हणून सांगते माझं कॉलेज अगदी मरिन ड्राईव्ह च्या बाजुला, कॉलेज मधून पाऊल बाहेर टाकले की समोर मरिन ड्राईव्ह. झालं असं की मी इतर लोकांसारखे माझ्या वेदना मरिनच्या समुद्राला सांगत होते, यामध्ये मी एवढे व्यस्त झाले की मागे ठेवलेली माझी बॅग कोणी घेवुन जाईल याचं साधं भाणही मला नसावं आणि झालही तेच, मागे बघते तर बॅग गायब. लगेच त्या चोराबद्दल पोलिसांना सांगून त्याला मारण्याची सुवर्ण संधी मी हुकवु शकत नव्हते. म्हणुन आधी मी शोध घेण्यास सुरुवात केली. बिचाऱ्या चोराचं नशीब येवढं वाईट की मला एका झाडाआड माझ्या बॅगेतल सामान त्याच्या बॅगेत टाकताना त्याचे दर्शन झालं. मी एक मराठी मुलगी वरून मुंबईत राहिलेले तर अश्यांना भर चौकात कसं चोपायच हे अगदी उत्तम रित्या जमत हो मला, तर त्याच्यावर हात साफ करून झाल्यावर मी त्याला म्हटलं “बाबा मान्य कर चोरी केलीस तर सोडते तुला, नाहीतर पोलिसांत देते”, पण ऐकातात कुठं हे शेठ. मग काय बोलवलं आणि चौकशीसाठी मलाही सोबत जाव लागलं. माझ्या समोर पोलिसांनी त्याला असं बदडवून काढलं की त्याने मला ताई म्हणण्यास सुरूवात केली. आता हा किस्सा सांगण्याचा अट्टाहास यासाठी कारण त्याला मारताना पोलिसांना बॅग का चोरली यापेक्षा याचा राग जास्त होता की एका मुलीची बॅग का चोरी केली. मी सुरतक्षित घरी पोहचाव याची सोय ही मुंबई पोलिसांनी केली. आता हा झाला माझा अनुभव, प्रत्येकाचा वेगळा असु शकतो यात काही वाद नाहीये.

बरं, मिडीयाशी जुळले असल्याने म्हणा किंवा विरार फास्ट ट्रेन मध्ये मला लवकर चढता येत नसल्याच्या माझ्या अकार्यक्षमतेमुळे म्हणा पण मला घरी यायला रात्रीचे ११ हमखास वाजत असतं. आई नेहमी मला फोन करून एकचं विचारत असे, “रेल्वेच्या डब्ब्यात पुलिस उभा हाय ना?” आणि मी म्हणायचे “हो हो आहे गं नको काळजी करू.” मी रात्री रेल्वे मधे आले की पुर्ण वेळ उभा असणारा माझा मुंबई पोलिस मला नेहमी दिसत असे. त्यांच्यावर असलेला विश्वास म्हणा की काय ते रेल्वेत असले की मी निवांत झोपायचे.

निवांत झोपण्यावरुन आठवलं की, आता असुनही नाहीसा झालेल्या कोरोना पासुन आपल्याला वाचवण्यासाठी बाहेर ऊन्हामध्ये २४ तासं उभं असणाऱ्या आणि आपल्या मुलाबाळांना भेटु न शकणाऱ्या पोलिसांचे व्हिडायो ‘माझ्या देवाक काळजी रे’ असं गाण टाकून ते सर्व व्हॉटस्प स्टेटस मधे फिरवत आपण त्यांची प्रशंसा करत होतो, एवढंच काय तर इन्टाग्राम आणि फेसबुक चा प्रोफाईल ही आपण महाराष्ट्र पोलिस या नावाचा ठेवत होतो. २६/११ हा दिवस मुंबई चा सर्वांत काळा दिवस, तेव्हा मुंबई पोलिसांनी काय केल हे वेगळ सांगाव म्हणजे नवलचं.

असो, आता येवुयात मुळ मुद्दयावर ८०,००० फेक अकाउंट्सचा जो खेळ समोर आलाय तो असा की, ‘सुशांत सिंह राजपुतची आत्महत्या नसून ती हत्या आहे.’ हा डाव रचला जातो, यात काही आरडा-ओरडा करणारे आणि मी खरा पत्रकार म्हणणारे पत्रकारही भाग घेतात आणि सुरु होते एकानंतर एक मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारचा अपमान करण्याची स्पर्धा. यात अटेन्शनसाठी वेडी असणारी झाशीची राणी कंगना भाग घेते. आणि स्पर्धा अजून रोमांचक बनवते. मग यात भाग घेतो आपण सामान्य माणूस. मुंबई पोलिसांनी पैसे घेवून सुशांत सिंह राजपुतची हत्या लपवली यावर ठाम होवून आपण केस सी.बी.आय कडे देतो. आणि ‘विकला मुंबई पोलिस’ असं म्हणून नाचायला सुरुवात करतो.

AIIMS चे रिपोर्ट ही हेच म्हणतात की हत्या नाहीये. तेव्हा आपण त्यांना पण विकले गेले म्हणतो. कारण, ‘आपण शिकलेले अशिक्षित आहोत.’ मुंबई मध्ये राहून C.S.K ला IPL मध्ये सपोर्ट करणाऱ्याला आपण मुंबई सोबत गद्दारी केली म्हणतो पण कंगना जेव्हा त्याच मुंबईला पाकिस्तान बोलते, “मुंबई पोलिसांमुळे मला सेफ नाही वाटत” असं मत व्यक्त करते तेव्हा इवल्याश्या अपमानाने पेटुन उठणारे आपण तिला ‘अस्सल वाघिण’ म्हणतो.

असो, आपण असं का करतो? याचा कधी विचार केलाय का? सोशियल मीडियावरती म्हणजेच ट्विटर आणि इंन्टाग्रामवर हजारो लोक आपल्याला मुंबई पोलिसांविरोधात बोलताना दिसतात मग जास्त लोक बोलत आहेत म्हटल्यावर तेच बरोबर हा आपला समज बनतो. कारण भारतीय म्हणून जिथे गर्दी त्याच्या मागे जायचं आणि स्वत: डोक न वापरणं ही आपली वृत्ती.

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याच्या हेतुने उघडल्या गेलेल्या ८०,००० हुन अधिक फेक अकाउंट्सवर आपण विश्वास ठेवतो आणि कोरोना काळात आपल्याला वाचण्यासाठी ‘६००० पोलिस संक्रमित झाले आणि ८४ जणांना जीव गमावला’ हे मात्र आपण विसरतो.

सरतेशेवटी आपल्याच मुंबई पोलिसांचा आपण अपमान करतो. आपली मुंबई ही सेफ नाही म्हणणाऱ्यांना मुंबई ही भारतात सर्वांत सेफ आहे हे सांगायला दिल्लीच्या मुली ट्विट करतात. तेव्हा आम्ही मुंबईत राहणारे कंगना किती योग्य आहे हे सांगण्यात व्यस्त असतो. आता हे ८०,००० हुन अधिक फेक अकाउंट्स कोण उघडायला सांगत आणि कोणता पक्ष एवढ्या खालच्या पातळीला गेला? हे वेगळ सांगण्याची गरज नाही. पण महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची तुलना यु.पी च्या बलात्कार झालेल्या मुलीला रात्री – अपरात्री जाळून टाकणाऱ्या पोलिसांशी आणि यु.पी सरकारशी करताना उरली – सुरलेली थोडी जरी लाज असेल तर ती वाटू द्या.

  • रिंकी खाडे

Updated : 7 Oct 2020 6:17 AM GMT
Next Story
Share it
Top