Home > Max Woman Blog > HIV बाधितांच्या वसतीगृहातील सब्जीवाली दादी

HIV बाधितांच्या वसतीगृहातील सब्जीवाली दादी

एक म्हातारी ऐन लॉकडाऊनच्या काळात लातूरात अडकली. पोलिसांनी तिला क्वारंटाईन होम मध्ये ठेवलं. मात्र, तिला HIV असल्याचं समजलं... तेव्हा तिला कोणी वृद्धाश्रमातही घ्यायला तयार नव्हतं. अशा परिस्थितीतही आजीने परिस्थितीवर मात करत एक माळरान फुलवलं आहे... जीवनाचा अर्थ समजण्यासाठी नक्की वाचा महारुद्र मंगनाळे यांचा लेख...

HIV बाधितांच्या वसतीगृहातील सब्जीवाली दादी
X

मार्च महिन्यात करोनामुळं देशव्यापी लॉकडाऊन सुरू झालं. लातूरमध्येही त्याची अंमलबजावणी सुरू होती. सगळे लोक घरात असताना, पोलिसांना रस्त्यावर एक वयस्कर महिला फिरताना दिसली. त्यांनी जुजबी चौकशी केली. तेव्हा ती कोल्हापूरहून लातुरात कोणाला तरी भेटायला आल्याचं कळलं. पोलिसांनी त्या महिलेला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन होममध्ये ठेवलं. लॉकडाऊन पुन्हा वाढलं. तिला परत १४दिवसांसाठी तिथंच ठेवलं. लॉकडाऊन चालूच राहिलं .प्रशासनाने विचार केला,या महिलेला असं किती दिवस ठेवणार?

तिला वृध्दाश्रमात पाठविण्याची तयारी सुरू केली. तिच्या विविध वैद्यकीय तपासण्यात करण्यात आल्या. त्यात ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आली. वृध्दाश्रम चालकांनी तिला ठेवून घेण्यास नकार दिला. तिला कुठं पाठवायचं, असा प्रशासनापुढं प्रश्न निर्माण झाला.

महापालिकेतील कोणीतरी सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांच्याशी संपर्क केला. इथं एचआयव्ही संक्रमित लहान मुला-मुलींनाच प्रवेश दिला जातो, असं रवीनी उत्तर दिलं. त्या महिलेची इतरत्र कुठेच सोय होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर लातूरच्या तहसीलदारांनी रवी बापटले यांना फोन करून, काही दिवसांसाठी तरी या महिलेला सेवालयात ठेऊन घेण्याची विनंती केली. रवीनी होकार दिला. रीतसर पत्र देऊन, त्यांनी त्या महिलेला Happy village वर आणून सोडलं.

व्हिलेजवर आजीसाठी एक रूम देण्यात आली. दोन दिवस आजी शांत राहिल्या. दरम्यान त्या कोल्हापूरच्या ही त्यांची ओळखही कळाली. तिसऱ्या दिवशी सकाळच्या खुरपणीच्या कामात आजी मुलींसोबत सहभागी झाल्या...पुढच्या तीन-चार दिवसांत आजी लहान-मोठ्या सगळ्या मुलींच्या वास्तवातील आजी बनल्या.

मुलींची नावं त्यांना पाठ झाली. प्रत्येकीला नावाने हाक मारून, कधी प्रेमाने, कधी रागावून त्या काम करून घेऊ लागल्या. बघता-बघता भाजीपाला शेतीच्या त्या प्रमुख बनल्या. रवीच्या मागे लागून त्यांनी सगळ्या भाज्यांची रोपं,बियाणे मागवून घेतली.त्यांची लागवड केली.वांगे,टोमॅटो, भेंडी,गवार,चवळी,बटाटे,कारले,मिरच्या,कोथिंबीर, कांदा आणि लसूण या सगळ्यांची लागवड केलीय. यातील बऱ्याच भाज्या खाण्यासाठी आल्यात. कुठल्या भाज्यांना कधी पाणी द्यायचं, खत द्यायचे, फवारणी करायची ते त्या सांगतात. भाजीपाला तोडायचा असेल तर, त्यांच्या कानावर घालावं लागतं. आज ज्या भाज्या करायच्या आहेत, त्या स्वत: तोडून स्वयंपाकघरापर्यंत पोहोचत्या करतात.

एके दिवशी मी रात्रीच्या ठेच्यासाठी हिरव्या मिरच्या तोडत होतो. तर कानावर जोरात आवाज आला... ऐय... सर.. मिरच्या नीट दोन हातानं तोडा.. न्हायतर फाटे मोडायचेशीन... मी वळून बघितलं तर आजी. मी सांगीतलं, माझं बालपणापासूनचं आयुष्य शेतीत गेलयं.. माझ्या हातनं फाटा मोडणार नाही... मी शेतीतला आहे. हे कळल्यावर आजी माझ्याशी भाजीपाला लागवडीबाबत बोलू लागल्या. भाज्यांना रासायनिक खत घालायचं नाही, हा माझा सल्ला त्यांना पटला. काल मी तळ्यावर फिरताना आजीनं मला भाजीपाला बघायला बोलावलं. भेंडी, कोथिंबीर, मिरच्या छान आल्यात. त्या दाखवल्या. हरिणाने खाल्लेली पालक दाखवली. मला बोलल्या...सर तेवढं हरणाचा बंदोबस्त करायला रवीसरला सांगा की.... मी म्हटलं,तुम्हीच सांगा की...

ते लई कामात असतेत.. मला त्रास द्यायला नको वाटतं... मी म्हटलं, ठिक आहे सांगतो. मी आजीला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. वडिल शेतमजूर होते. लहानपणी त्यांच्यासोबत राहून शेतीतील कामं शिकल्याचं त्या बोलल्या. मी म्हटलं,पुढच्या महिन्यात मी कोल्हापूरला जाणार आहे... तुम्ही चला सोबत. त्या बोलल्या,आता तिथं कोणीच नाही माझं. आता इथनं मी कुठचं जाणार नाय...

आजी दोन-तीन महिन्यातच व्हिलेजच्या कायम निवासी होऊन गेल्यात. त्यांचा आवाज मोठा आहे. त्या स्पष्टवक्त्या आणि थोड्या फटकळही आहेत. काम करण्याची त्यांना मनापासून आवड आहे. सगळ्यांनीच काम करावं, असा त्यांचा आग्रह असतो... त्यापोटी त्या जोरात बोलत असाव्यात. मी त्यांना नेहमीच सांगतो.. आजी जरा हळू बोला... माणसं घाबरून व्हिलेजवरून पळून जायची.! त्यांचं उत्तरही ठरलेलं असतं...माझं आवाजचं मोटं आहे सर... पर माझ्या मनात काई नसतयं.

ते खरंही आहे. त्या छोट्या मुलांना आजीच्या ममतेने वागवतात. त्यांच्या तब्येतीची काळजी घेतात. हँप्पी व्हिलेजवर आजीची एक स्वतंत्र ओळख आणि दरारा निर्माण झालाय. नियमित कष्टातून त्यांनी स्वत:ला एक अधिकारही मिळवलाय. त्या कुठंही असल्या तरी, त्यांचं भाजीपाल्याकडं कायम लक्ष असतं. त्यांना काम करा,असं कधीच सांगावं लागत नाही...

या आजीचं माझ्याकडंही लक्ष असतं. आज कोणती भाजी खाणार, असं त्या आठवणीने विचारतात... आता आलेत ना सर महिनाभर जाऊ नको बघा... असं त्यांचं सांगणं असतं. त्यांना मग मला रुद्रा हटबद्दल सांगावं लागतं! माझ्या मनात नेहमी विचार येतो,या आजी व्हिलेजवर आल्या नसत्या तर,एखाद्या वृध्दाश्रमात बेवारस महिला म्हणून जगत राहिल्या असत्या... हँप्पी व्हिलेजनं त्याचं जीवन अर्थपूर्ण बनवलयं. रवी बापटले यांच्या कल्पनेतून साकारलेले हे व्हिलेज किती गरजेचे आहे हे वेळोवेळी सिध्द होतयं.

Updated : 2020-10-25T01:04:35+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top