Home > Max Woman Blog > मुग़ले आझम

मुग़ले आझम

मुग़ले आझम
X

लॉरेन्स ऑलिव्हिए, जॉन गिलगुड, राल्फ रिचर्डसन हे हॉलिवूडमधील श्रेष्ठ दर्जाचे अभिनेते गणले जातात. भारतीय चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये निःसंशयपणे दिलीपकुमारचा समावेश करावा लागेल. मी येथे 'दिलीपकुमार' असा एकेरी उल्लेख केला, कारण नट व खेळाडू यांची आपल्याशी भावनिक जवळीक असते. तेव्हा एकेरी उल्लेखात अधिक्षेप नसून, आपुलकीच आहे. अभिनयातील आब, अदब, सूक्ष्मता, संवेदनशीलता आणि एकूणच प्रगल्भता व सुसंस्कृतता याबद्दल दिलीपकुमारशी कोणाचीच तुलना नाही. अलीकडील काळात त्याचा वाढदिवस चित्रपटसृष्टीतील अव्वल कलाकार मंडळींच्या उपस्थितीत झाला, त्यास धर्मेंद्र, महानायक अमिताभ बच्चन, सुभाष घई, राजकुमार हिराणी, प्रियांका चोप्रा, अनिल कपूरपासून सर्वजण होते. त्या कार्यक्रमात गीतकार जावेद अख्तर यांनी दिलीपकुमारचे ज्या रीतीने कौतुक केले, ते ऐकताना त्याची बेगम सायराबानोही मंत्रमुग्ध झाली आणि जावेद काय बोलत आहेत, ते ती दिलीपकुमारना सांगत होती. कारण मागच्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती बरी नसते आणि दर चार-सहा महिन्यांनी लीलावती इस्पितळाच्या वाऱ्या कराव्या लागतात. दोन-चार वर्षांपूर्वी अमिताभ, आमिर, शाहरुख, सलमान, करीना प्रभृती सर्व महत्त्वाचे कलावंत दिलीपकुमारच्या निवासस्थानी गेले व तेथे त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. दिलीपकुमारच्या पिढीतल्याच नव्हे, तर नंतरच्या पिढ्यांमधील बहुतेक नायक, नायिका, खलनायक, चरित्र अभिनेत्यांनी त्याच्यापेक्षा खूप जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्या तुलनेत दिलीपकुमारच्या चित्रपटाची संख्या ७०-८०च्या पलीकडे नाही. पण गुणवत्तेच्या कसोटीवर आपण त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही, असे अगदी नव्या पिढीतील कलाकारांचेही मत आहे. मला आठवते, 'कर्मा'च्या वेळी नसीरुद्दीन शाह म्हणाला होता की, हा तद्दन व्यावसायिक चित्रपट मी करतो आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे दिलीपकुमार!'शहीद' हा दिलीपकुमारचा चित्रपट बघून धर्मेंद्र कमालीचा प्रभावित झाला होता आणि त्या क्षणापासूनच त्याने सिनेमात जाण्याचे मनावर घेतले. दिलीपकुमारनेही त्याच्यावरधाकट्या भावाप्रमाणे प्रेम केले. दिलीपकुमार हा अभिनयातला शेवटचा शब्द आहे, असे धर्मेंद्रला प्रमाणिकपणे वाटते आणि ते त्याने अनेकदा बोलूनही दाखवले आहे. दरवर्षी दिलीपकुमारला वाढदिवसाच्या दिवशी भेटण्याचे त्याचे व्रत सुरू आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास मराठीत प्रथमच कथन करणारे 'चित्राची गोष्ट' हे पुस्तक मी लिहिले होते. त्याचा प्रकाशन समारंभ जेव्हा मुंबईत विलेपार्ले येथील लोकमान्य सवा संघात पार पडला, तेव्हा त्यास प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपकुमार उपस्थित होता. जब्बार पटेल व विजय तेंडुलकरही उपस्थित होते. तेव्हा क्रीम कलरचा पठाणी सूट परिधान करून दिलीपकुमार आला होता. त्यावेळी 'फायर' या चित्रपटास समर्थन दिल्यामुळे दिलीपकुमार वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याच्या घरासमोर हिंदुत्ववाद्यांनी अर्धनग्नावस्थेत निदर्शने केली होती. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्यात आले होते. दिलीपकुमार आला आणि त्याने आपल्या बालपणी आजी गोष्टी कशा साभिनय सांगत असे, त्याच्या आठवणी सांगून उपस्थितांना अक्षरशः संमोहित केले. चित्रपटांबद्दल संशोधन व उत्खनन करून दुर्मिळ इतिहास विश्लेषक पद्धतीने लिहिल्याबद्दल, त्याने माझे अभिनंदन केले. माझ्याशी अनौपचारिक गप्पा मारताना त्याने त्यातील बारीकसारीक तपशिलांबद्दल चर्चा केली. वीसेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट. तेव्हा माझ्या लक्षात आले की, चित्रपट या माध्यमाच्याच तो विलक्षण प्रेमात आहे! उत्पल दत्त, श्रीराम लागू, अमोल पालेकर, नसीरुद्दीनशाह यांनी रंगभूमी गाजवली व मग ते चित्रपटांत आले. दिलीपकुमार थेट आला तो चित्रपटात आणि ते देखील योगायोगाने. परंतु देवळाली, पुणे, मुंबई इथे त्याने तरुणपणी भरपूर हॉलिवूडपट पाहिले. त्यावेळी आपल्याकडील चित्रपट अभिनय कृत्रिम, नाटकी व बटबटीत असे. दिलपकुमारला नेहमीच संयत अभिनयाचे आकर्षण आहे. दिलीपचा मोठा भाऊ अयूब याच्याकडे चार्ल्स डिकन्स, बर्नार्ड शॉ, शेक्सपिअर, मोपासाँ यांची अनेक पुस्तके होती. यूसुफ ऊर्फ दिलीपकुमारने ती वाचण्याचा सपाटाच लावला. अगदी कार्ल मार्क्सही अभ्यासला. कुराणही त्याला तोंडपाठ होते. मुंबईत यूसुफ अंजुमन इस्लामम या शाळेत (टाइम्स ऑफ इंडियाच्या शेजारची) शिकला. तेथे मुक्री हा त्याचा सहाध्यायी होता. गणितात यूसुफ प्रवीण होता आणि फुटबॉलमध्येही पारंगत. यूसुफने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तो बाँबे टॉकीजमधून. मला कथापटकथा विभागात काम करायचे आहे, असे त्याने सांगितले. विख्यात लेखक पंडित नरेंद्र शर्मा तसेच भगवतीचरण वर्मा तेथे काम करत होते. सुशिक्षित लोकांनाच तेथे बाँबे टॉकीजमध्ये घेत असत. 'ज्वारभाटा' या पहिल्या चित्रपटात दिलीपकुमारचे दिग्दर्शक होते अमिया चक्रवर्ती आणि नायिका होती मृदुला. तेव्हा दिलीप बुजरा होता आणि त्यामुळे नायिकेला मिठी मारण्याच्या दृश्यात काम करताना त्याचे हात थरथर कापू लागले. सेट सोडून तो पळून जाऊ लागला. तेव्हा अमियाजींनी सेटवरच त्याचे पाय बांधून ठेवले...रवींद्रनाथ ठाकूर यांच्या कादंबरीवरील चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी अभी भट्टाचार्यला घेण्यात आले होते. मात्र त्याला हिंदी उच्चार जमेनात. तेव्हा दिग्दर्शक नितीन बोस यांनी त्या जागी दिलीपकुमारला घेतले. 'मिलन'मधील दिलीपच्या कामाचे 'फिल्म इंडिया'चे संपादक बाबूराव पटेल यांनीही कौतुक केले. 'जुगनू'मध्ये दिलीपकुमारने नूरजहाँसमवेत काम केले. मात्र त्यावर मुंबईचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी काही काळ बंदी घातली होती. हा चित्रपट व ही जोडी लोकप्रिय झाली. नलिनी जयवंत व नर्गिससमवेतच्या 'अनोखा प्यार'मध्ये दिलीपने शोकात्म प्रसंगात केलेल्या अभिनयामुळे त्याला ट्रॅजेडी किंग असा किताब मिळाला. फिल्मिस्तानच्या 'शहीद' चित्रपटात चंद्रमोहन व दिलीप यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळते.कोर्टातील दिलीपकुमारचा अभिनय आणि आपल्या मुलाची बाजू लावून धरताना चंद्रमोहनने केलेला जबरदस्त युक्तिवाद हा बघण्यासारखा होता. हा सिनेमा बघूनच धर्मेंद्रला मुंबईच्या रूपेरी सृष्टीत येण्याचे आकर्षण निर्माण झाले. 'घर की इज़्ज़त'मध्ये आपले दुःख विसरण्यासाठी एकच प्यालात बुडालेल्या व्यसनी नायकाची भूमिका दिलीपने केली. दिलीपकुमारचा 'आरज़ू' हा एक महत्त्वाचा चित्रपट. एमिली ब्राँटे यांच्या 'विदरिंग हाइट्स' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची पटकथा इस्मत चुगताई यांची होती. ज्या मुलीच्या प्रेमात तो पडतो, तिच्याशी त्याचा विवाह होत नाही आणि समाजाकडून तुच्छतेची वागणूक मिळाल्याने तो निराश होतो. 'आरज़ू'तील दिलीपचा अभिनय हृदयस्पर्शी होता. 'अंदाज़'मध्ये दिलीपकुमार नायिका नर्गिसला 'तुम मुझे प्यार करती हो,' असे म्हणतो. पण तरीही ती त्याच्यावर गोळ्या झाडते. हा प्रसंग असंख्य तरुणांच्या मनावर कोरला गेलाय. 'जोगन'मधील भक्ती विरुद्ध वासना या संघर्षात दिलीपकुमारने संवादफेकीत पॉझेसचा फार चांगला वापर केला होता. 'हलचल'मध्ये तर बलराज साहनी आणि याक़ूबसारख्या कसलेल्या कलावंतांसमोर दिलीपने प्रभावी शोकात्म अभिनय केला. 'तराना'मध्ये दिलीपचा अभिनय बघण्यासाठी मधुबाला त्याच्या जवळ येऊन बसायची. त्यावेळी दोघांमध्ये प्रेमही फुलू लागले होते. 'दाग़'मधील व्यसनी शंकरची भूमिका करताना दिलीपच्या तोंडी असलेला एक संवाद अजूनही स्मरणात आहे, तो असा – 'दिन में इसकी ज़रूरत होती है'. ज़ालिम रात तो ख़ुद शराब होती है,' असे तो दारूला उद्देशून म्हणतो. 'आन' या पोशाखीपटातही तलवारबाजी, घोडेस्वारी करणाऱ्या आक्रमक नायकाची भूमिका दिलीपने मस्त निभावली. 'दीदार'मध्ये त्याने अंध माणसाची भूमिका केली. ही भूमिका जिवंत व्हावी म्हणून तो बराच काळ अंधांबरोबर घालवत असे. 'इन्सानियत'मध्ये दिलीपकुमार व देव आनंद या दोघांना एकत्र पाहताना, उत्कृष्ट व सामान्य अभिनय यातला फरक लोकांच्या लक्षात आला.

मात्र दिलीपकुमारच्या संपूर्ण कारकिर्दीतील 'देवदास' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणावा लागेल. भूमिकेच्या तयारीसाठी त्याने शरच्चंद्रांची कादंबरी अनेकदा वाचली. दिग्दर्शक बिमल रॉय यांच्यासमवेत अनेकदा चर्चा केली. 'देवदास'चा मानसिक कमकुवतपणा, पारोबद्दलचे त्याचे अपार प्रेम, तिच्या वियोगाचे दुःख आणि आयुष्याबद्दलची व्यर्थता दिलीपकुमारने कमालीच्या सूक्ष्मपणे साकार केली. 'मधुमती'त सैरभैर झालेला नायक त्याने फार परिणामकारकपणे दाखवला. 'आझाद', 'नया दौर' व 'कोहिनूर' मधल्या दिलीपच्या भूमिका ज़िंदादिल नायकाच्या आहेत. 'मुग़ले आझम' या ऐतिहासिक पटात सलीमच्या भूमिकेत आपण दिलीपशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार करू शकत नाही. पण सुरुवातीला, या भूमिकेत आपण शोभून दिसणार नाही, असे त्याला वाटत होते. 'गंगा जमना'मध्ये रांगडा नायक ते दरोडेखोर असा प्रवास करताना, 'मुन्ना हम घर आ गए' असे म्हणून तो प्राण सोडतो, तेव्हा प्रेक्षक हलून जातात. माझ्या मते, 'राम और श्याम' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दुहेरी भूमिका असलेला चित्रपट आहे. त्यातील श्यामच्या भूमिकेतला दिलीप कॉमेडीतही आपण कमी नाही, हे दाखवून देतो. 'लीडर','संघर्ष', 'गोपी', 'सगीना माहतो' अशा त्याच्या किती चित्रपटांचा उल्लेख करायचा? 'शक्ती'मध्ये दिलीपकुमार आणि अमिताभ यात कोणाचा अभिनय सरस, अशा चर्चा नव्या-जुन्या पिढीत रंगल्या होत्या. 'मशाल'मधील रस्त्यात पडलेल्या बायकोला इस्पितळात नेण्यासाठी त्याने केलेला 'कोई है..'चा आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता. 'कर्मा', 'विधाता', 'सौदागर' व 'दुनिया' हे चित्रपट तर तो चरित्र अभिनेता असूनही, केवळ दिलीपमुळेच पाहावेसे वाटले.

अभिनय हे मेहनतीचे काम आहे. गाण्याप्रमाणेच त्याचाही रियाज करावा लागतो. त्यासाठी वाचन, मनन, चिंतनही करावे लागते आणि सदैव अंतर्मुख असावे लागते. चमच्यांच्या गोतावळ्यात राहून, पार्ट्या करून व प्रसिद्धीत राहून अभिनेता म्हणून सिद्ध होता येत नाही. फ़ैज़चे काव्य, गालिबच्या गज़ला आणि कीट्स व टेनिसनच्या रचनांत रमणारा दिलीपकुमार नावाचा मुग़ले आझम शतकातून एखादाच होतो.

Updated : 11 Dec 2020 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top