Home > Max Woman Blog > सत्ताधाऱ्यांचे 'पाळीव' साहित्यिक

सत्ताधाऱ्यांचे 'पाळीव' साहित्यिक

२००२ मध्ये जेव्हा रातोरात वली दखनीची कबर भुईसपाट केली गेली आणि त्यावर गुळगुळीत डांबरी सडक बनवली गेली तेव्हा त्याची पाठराखण करणारे हेच साहित्यिक होते. एका अर्थाने सरकारधार्जिण्या साहित्य व्यवहारावर पारुल खक्कर यांनी खणखणीत चपराक लगावली आहे. म्हणूनच सत्ताधाऱ्यांचे पाळीव साहित्यिक त्यांच्यावर आगपाखड करत आहेत.

सत्ताधाऱ्यांचे पाळीव साहित्यिक
X

गुजरात साहित्य अकादमीच्या 'शब्दसृष्टी'मध्ये अकादमीचे अध्यक्ष विष्णु पांड्या यांनी त्यांच्या संपादकीयामध्ये पारुल खक्कर या कवयित्रीला नक्षलवादी, अराजकतावादी ठरवलं आहे. 'त्या ' कवितेला (कवितेवर संपादकीय असूनही कवितेचं 'राजा, तमारा रामराज्यमा शववाहिनी गंगा' हे शीर्षक मात्र त्यातून पूर्णपणे गायब आहे) कविता म्हणावं का असेही फिजूल प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

गंमत याची वाटते, की याच पांड्या यांनी एके काळी पारुल खक्कर यांचा गौरव करताना 'त्या पुढच्या गुजराती कवितेतील तारा आहेत', असे उद्गार काढले होते.

मुळात पारुल यांनी त्यांच्या कवितेत माँ गंगा प्रेताने भरुभरुन वाहतेय याविषयी तीव्र विलाप व्यक्त केला आहे. ही कविता एका आत्यंतिक सश्रद्ध अशा स्त्रीची अगदी आतून आलेली सच्ची भावना आहे. आतापावेतो श्रद्धेपोटी धार्मिक भजने लिहिणाऱ्या पारुलताई गंगेच्या या अपरुपाने अक्षरशः विद्ध झाल्या आहेत. ही कविता वाचताना त्यातल्या आक्रोशाने, वैयर्थतेने, राजा नग्न असल्याच्या आणि रंगाबिल्लाच्या धीट उल्लेखाने, त्यातल्या प्रखरतेने, तीव्र उपहासाने आपल्याला हलवून सोडते. खरं तर या कवयित्रीने आरसा ठेवलाय आपल्यासमोर. त्यात दिसणारी प्रतिमा प्रधानसेवकांना आणि त्यांच्या परममित्राला रुचणारी नाही हे तर उघडच आहे. करोना महामारीतल्या नियोजनाचा गलथानपणा, ढिसाळपणा, कोलमडून पडलेलं व्यवस्थापन, लाखो लोकांच्या मृत्यूची झाकपाक आणि अवघ्या देशाला आलेली स्मशानवत अवकळा..

पैशांअभावी गंगेत सोडावी लागणारी प्रेतं.. एखाद्या टिपकागदासारखा हा अवघा कल्लोळ टिपून घेणारी संवेदनशीलता आता अराज्यवादी, नक्षलवादी ठरवली गेली आहे. प्रधानसेवकाचे इमानी कुत्रे बनून स्वतःची जागा सेफ करणारे हे पांड्यासारखे सरकारी लेखनकामाठी करणारे म्हणजे अवघ्या गुजराती साहित्याच्या समृद्ध परंपरेला काळिमा फासणारे आहेत.

२००२ मध्ये जेव्हा रातोरात वली दखनीची कबर भुईसपाट केली गेली आणि त्यावर गुळगुळीत डांबरी सडक बनवली गेली तेव्हा त्याची पाठराखण करणारे हेच साहित्यिक होते. एका अर्थाने या सरकारधार्जिण्या साहित्य व्यवहारावर पारुल खक्कर यांनी खणखणीत चपराक लगावली आहे. म्हणूनच सत्ताधाऱ्यांचे पाळीव साहित्यिक त्यांच्यावर आगपाखड करत आहेत.

मी पारुल यांच्या निर्भयी अभिव्यक्तीला सलाम करते आणि

त्यांना नक्षलवादी ठरवणाऱ्यांचा तीव्र निषेध करते.

वैष्णव जन तो तेने कहिये जे

पीड पराई जाणे रे

म्हणणाऱ्या गुजरातच्या भूमीतला आजचा धीट, खणखणीत आवाज पारुल खक्करच्या रुपाने असाच गुंजत राहो अशी इच्छा व्यक्त करते.

- प्रज्ञा दया पवार

Updated : 12 Jun 2021 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top