Home > Max Woman Blog > विमलबाईची गोधडी..

विमलबाईची गोधडी..

विमलबाईची गोधडी..
X

ह्या फोटोत आहे ती माझी आज्जी. वडिलांची आई. विमल गणपतराव लाड, वय वर्ष ९३. अजूनही ठणठणीत, आयुष्यात अंगाला कधी कसलाही साबण लावला नाही, डोक्याला शाम्पू लावला नाही, कधी खुर्ची सोफ्यावर बसली नाही, डायनिंग टेबलवर कधी जेवली नाही, खाली बसूनच जेवणार, खाली बसूनच टीव्ही बघणार, गेली पन्नास वर्ष (गणपतराव गेल्यापासून) दिवसातून एकच वेळ जेवणार, रात्री फक्त एक कप चहा, चहात भरपूर साखर टाकून अगदी गोड करून पिणार, दररोज सगळा पेपर वाचणार, अजूनही पेपर वाचतांना चष्मा लागत नाही. गोधडी शिवणे हा छंद, आमच्या कुटुंबातील प्रत्येकाला तिने शिवून दिलेल्या गोधड्या आवडतात.

गणपतराव (म्हणजे आज्जीचे मिष्टर) चार मुलं आणि दोन मुली मागे सोडून वारले. माझे वडील सगळ्यात मोठे, गणपतराव वारले तेव्हा वडील सतरा वर्षांचे होते. परिस्थिती खूपच बिकट, कोल्हापुरातून आजीच्या माहेरी भोरला सगळे निघून आले. भोरच्या शिवाजी विद्यालयात मेसमध्ये आजी पोळ्या करायला जायची, वडील पण कन्स्ट्रक्शन साईट वर सिमेंट वाळू मिक्स करायचं काम करायला जायचे. दिवसाला जी काही कमाई (चार, पाच आणे) होईल त्यात गहू, भात, भाजी, तेल वगैरे घेऊन त्यातून संध्याकाळचं जेवण व्हायचं. असे ते दिवस.

हळूहळू काळ बदलला, विमलबाईंच्या सगळ्या मुलामुलींनी आपापलं आयुष्य उभं केलं, विमलबाईंना आम्ही सगळे मिळून दहा नातवंड झाली, पुढे आम्हा सगळ्या नातवंडांचे लग्न झाले, आज विमलबाईंना नऊ पतवंडं आहेत, त्यातली मोठी पतवंडी श्रेया माझ्या बहिणीची मुलगी आज इंजिनियरिंगला आहे.

गणपतराव वारल्यानंतर काही वर्षांनी माझा जन्म झाला, आणि विमलबाईंना साक्षात्कार झाला की गणपतरावांनी माझ्याद्वारे पुनर्जन्म घेतला आहे. तेव्हापासून आजपर्यंत विमलबाई मला गणपतरावंच समजते. म्हणजे मीच माझ्या वडिलांचा वडील !

मग माझे पण लग्न झाले, त्यानंतर मी इमलबाईची (मी तिला गमतीने इमलबाई म्हणतो) टिंगल करायला लागलो, की जर का कधी माझ्या ह्या जन्माच्या बायकोच आणि तुझं (इमलबाईच) भांडण झालं तर मी माझ्या ह्या जन्माच्या बायकोचीच बाजू घेणार, कारण तुझ्यासमोर माझं लग्न झालं, म्हणजे तुझ्याबरोबरचे सात जन्म संपले, हिच्याबरोबर मला अजून सहा जन्म काढायचे आहेत.

आयुष्यात आपल्याला कष्ट नको असतात, सोयी हव्यात, आराम हवा असतो, सगळं पटकन शॉर्टकटने हवं असत आणि त्या सगळ्या पळापळीत आपण आपलीच वाट लावून घेत असतो. आमच्या पिढीतील मित्रमंडळी गप्पा मारत असतांना बऱ्याचवेळा मागच्या पिढीची आणि आपल्या पिढीची तुलना करतो तेव्हा म्हणतो की आपल्या पिढीचं काही खरे नाही, आपली गाडी ६० पर्यंत गेली तरी खूप झालं.

मागच्या नेदरलँड, अमेरिका दौऱ्यात असतांना तिकडं खूप थंडी होती, अगदी शून्य डिग्रीपर्यंत, पण तिथले वयस्कर लोक बिनधास्त बाहेर फिरत होते, एकटेच, आणि कुणीही पाठीत वाकलेले नव्हते. तेव्हाच मनात विचार आला कि आपण का उगीचच आपल्याला ६० वर्षच धडधाकट जगायला मिळणार आहे असा विचार करतो? कारण आपण असा विचार करून नकळतपणे ६० वर्षाची मर्यादा स्वतःलाच घालून दिली, की सगळे विचार तसेच होतात, प्रत्येक वाढदिवसाला आपण आपलं वय ६० मधून वजा करतो आणि किती शिल्लक राहिले हे बघतो,मग कमी वेळ उरलाय म्हणून सगळ्या गोष्टींची घाई करायला लागतो आणि विनाकारण चिंता, भीती मनामध्ये बाळगायला लागतो आणि वयाच्या आधीच म्हातारे होतो.

यंदाच्या ट्रीपमध्ये मी माझं टार्गेट ६० वरून ९० वर नेलं. फक्त ह्या एका विचाराने माझं स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला, अजून माझं अर्ध आयुष्य शिल्लक आहे, ते सुधृद असण्यासाठी काय करायला पाहिजे, इथपासून ते पुढच्या ४५ वर्षांचं प्लॅनिंग म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि आपण आपले सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो याची जाणीवच खूप आनंद देणारी आहे. मागच्या वर्षी मानसिक आरोग्य या क्षेत्रात काम करायचं ठरवलं आणि अमेरिका, नेदरलँड मध्ये टेक्सस स्कुल ऑफ मेंटल हेल्थ ही नवीन कंपनी स्थापन केली. त्यावेळी बऱ्याच जणांनी मला ह्या वयात लोक रिटायर व्हायचं प्लॅनिंग करतात आणि तू काय नवीन उद्योग सुरु करतोस? ते ही परदेशात? असं म्हणायचे, आता मात्र मला ही कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तब्बल ४५ वर्ष आहेत, इतक्या वर्षात मी अजून चार विषयातील कंपन्या काढून एस्टॅब्लिश करू शकेन. म्हातारपण विचारांनी येत, वयाने नव्हे. जवळपास चार महिने झालेत डाएट सुरु केलं, दररोजचा व्यायाम सुरु केला आणि तीन महिन्यात तब्बल बारा किलो वजन कमी केलं आणि एमआयटीची टेकडी दोनदा सलग चढून जाऊ शकतो इतकी इम्युनिटी देखील वाढवली. गीतेमध्ये आत्मज्ञान ह्या शब्दाचा अर्थ काही केल्या कळत नव्हता, ज्या काही व्याख्या सापडल्या त्या पटत नव्हत्या. पण स्वतःविषयीचा फक्त एक विचार बदलला आणि आत्मज्ञानाचा अर्थ उलगडलला.

(टीप: ते काय डाएट आहे आणि कसला व्यायाम करून तीन महिन्यात १२ किलो वजन कसं कमी केलं ते नंतर पुन्हा कधीतरी)

आज इमलबाईला गोधडी शिवतांना पाहून वाटलं की इतरांच्या देखील मनावरचं जळमट काढून टाकावं आणि इमलबाईंची मस्त उबदार गोधडी घालावी.

-गिरीश लाड

Updated : 30 March 2020 10:22 AM GMT
Next Story
Share it
Top