Home > Max Woman Blog > प्रवासाला निघताय ?

प्रवासाला निघताय ?

बाहेर फिरायला जाताना बॅग कशी पॅक करावी? नक्की कोण-कोणते कपडे, सामान सोबत घ्यायचं? खासकरून महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी? या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी वाचा सुवर्णरेहा जाधव यांच्या टिप्स
प्रवासाला निघताय ?
X

कोव्हिडची पहिली लाट ओसरली आणि लॉकडाऊनच्या दरम्यान घरात अडकून पडलेले आपण सर्व हळूहळू बाहेर पडू लागलो. तोपर्यंत आता दुसरी लाट आलीच. ती ही लवकर ओसरावी ही आशा ! त्या पूर्वीही शहरातील धकाधकीच्या जीवनातून अधून मधून काहीतरी विरंगुळा मिळावा म्हणून आपण प्रवासाला अधून मधून निघत असूच. रोजची धावपळ, ट्राफिकमध्ये अडकणे, कामाची प्रेशर्स, त्यामुळे होणारी तब्येतीची हेळसांड अगदी नकोसं वाटे आणि मग एखादा ब्रेक घ्यावासाही वाटे. विशेषतः नोकरदार वर्गाला कधी एकदा शुक्रवार येतो असे झालेले असते. दोन दिवस आराम आहे. या कल्पेनेनेच बरे वाटू लागते, मग त्यात वीकेंड धरून एक-दोन दिवसाची सुट्टी आली की मग दुध में शक्कर !

मग काय, डोक्यात आलेल्या या साखरेवर एखाद्या छोट्याशा ट्रीपच्या कल्पना घोंगावायला लागतात. कुटूंब की मित्र मैत्रिणी, समुद्र किनारा की जंगल सफारी, हिल स्टेशन वरचा शांत बंगला की इतर कोणतंही प्रसिद्ध टूरिस्ट ठिकाण, तीर्थक्षेत्र की ट्रेक असे अनेक पर्याय आपण विचारात घेऊ लागतो. मग बाकीची जुळवाजुळव सुरु होते. साधारण कोण कोण बरोबर येऊ शकतील? याचा अंदाज घेतला जातो आणि सुरवात होते ती एक व्हॉटसअप ग्रुप बनवून. मग त्यावर अनेक वेगवेगळ्या कल्पना आणि प्रत्येकाच्या आवडीच्या ठिकाणाचे फोटो शेअर केले जातात आणि त्यानंतर सगळा जमाखर्च वगैरे गणिते घालून एक ठिकाण पक्के होते आणि तो ग्रुप पुढच्या बुकिंग्सच्या तयारीला लागतो.

ते झाले की, प्रवासात बरोबर काय काय न्यायचे, कोणी काय आणायचे? या याद्या बनतात आणि प्रत्येक जण आपापल्या पॅकिंगला सुरवात करतो. आता ते कसे करायचे? हे पूर्णपणे आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत? यावर अवलंबून असते. समुद्र किनारची हवा आणि हिल स्टेशन वरची हवा वेगळी त्यामुळे तिथे घालायचे कपडेही वेगळे, ट्रेकसाठी लागणारे कपडे वेगळे आणि तीर्थ क्षेत्राचे वेगळे. हे सगळे ठरवताना कोणता सिझन आहे ते ही तितकचं महत्वाचे. जवळपासचे ठीक आहे पण एखाद्या मोठ्या सुटीत एका देशातून जाताना असलेले तापमान आणि दुसऱ्या देशात उतरताना असलेले तापमान किंवा सिझन पूर्णपणे विरुद्ध असू शकतो आणि आपण जर तयार नसू तर विचित्र परिस्थिती उद्भवून फजिती होण्याची शक्यताच जास्त !

उष्ण दमट भागात जाताना पातळ, हलके, घाम शोषून घेणारे, पटकन सुकणारे सुतीच कपडे शक्यतो बरोबर घ्यावेत 2, 4 सिंग्लेट्स, शॉर्टस, टी /शर्टस, लाईटवेट जीन्स आणि अंतरवस्त्र एवढ्यात आपले पॅकिंग होऊन जाते. कपड्यांचे रंग ही शक्यतो हलके असावेत एकतर ते उष्णता परवार्तीत करतात आणि उन्हाचा त्रास आपल्याला जास्त होत नाही. हलक्या रंगांची अडचण एकच होते. डाग लवकर पडतात. पण जेव्हा आपण आपल्या आवडत्या लोकांबरोबर असतो, मस्ती मजा करत असतो तेव्हा मात्र पडलेले हे 'दाग अच्छे होते है '!

थंड हवेच्या ठिकाणी मात्र थर्मल्स, हातमोजे, पायमोजे, कानटोप्या, मफलर्स, jackets इत्यादी लोकरीच्या कपड्यांची न संपणारी यादी आणि त्यामुळे खचाखच भरलेली bag, backpack किंवा sack. त्यात समुद्रसपाटीपासून जितके उंच जाऊ तितके जास्त गरम कपडे आणि एक्स्ट्रा लगेज.

थंडीत वापरायच्या कपड्यांचा एक साधा नियम आहे. त्याला म्हणतात 'लेअरिंग.' (थंडी वाजू नये म्हणून एकच जाडजुड jacket न घालता एकावर एक अनेक कपडे घालणे,) समजा थोडं गरम वाटू लागले तर एकेक कपडा काढता पण येऊ शकतो. हिट लॉस होत नाही. शरीरातील उष्णता टिकून राहते. मात्र, अशा अनेक कपड्यामुळे आपले baggage वाढत राहते. त्यात पुन्हा जर सतत आपण साईट सीइंग करत राहणार असू तर कपडे धुवायला किंवा लॉंड्रीमध्ये द्यायला वेळ मिळणार नसतो. त्यामुळे जास्तच कपडे आपण बरोबर घेत असतो.

आता नवीन नवीन पद्धतीच्या bags पण उपलब्ध आहेत. ज्या उचलुन चालावे लागत नाही. कारण त्यांना चाके असतात आणि सहज एकीकडून दुसरीकडे नेता येतात. प्रवास विमानाचा असेल, तर मात्र वजनाचा प्रश्न येऊ शकतो. कारण वेगवेगळ्या विमान कंपन्याचे या बाबतीतील नियम वेगळे असतात. त्यानुसार आपल्याला केबीन आणि check in लगेज किती न्यायला परवानगी आहे. हे पाहूनच सामान भरावे लागते.

आयटीनरीमध्ये जास्तच साईट सीइंग असेल आणि जर रोज प्रवास असेल तर मात्र, एक दोन दिवसांच्या कपड्यांचे सेट्स करून वेगवेगळ्या प्लास्टिक bags मध्ये भरून ठेवावे आणि अशा प्लास्टिक किंवा छोट्या इतर पिशव्यांनी मोठी bag भरावी. जेणेकरून bag मधून हवे तेवढेचं कपडे काढणे सोपे होते आणि पुन्हा वापरलेले आणि खराब झालेले कपडे त्याच छोट्या bag मध्ये घालून ठेवता येतात. packing unpacking चा बराचसा वेळ वाचतो यामुळे.

थंड हवेच्या ठिकाणी कपडे धुतले तरी ते सुकवण्याचा प्रश्न असतोच. मोठ्या हॉटेलमध्ये या सोयी असतात. पण सगळीकडे असतीलच असे नाही. एकवेळ मोठे आणि बाहेरचे कपडे आपण धुतले नाही तरी आतली वस्त्रे आपण धूतोच. ती ही सुकण्याचा प्रश्न असतो. ती घट्ट पिळून पुन्हा एखाद्या टॉवेलमध्ये बांधून पिळावी जेणेकरून त्यातील जास्त असलेलं पाणी शोषून घेतले जाते आणि कपडे सुकवणे सोपे होते.

ऊन नसल्यास पंखे चालू ठेऊन त्याखालीही कपडे सुकत घालता येतात. आणि तेही होत नसेल तर दुसऱ्या कपड्यावर पसरवून बेड आणि गादीच्यामध्ये ठेवावेत. आपण झोपून उठेपर्यंत, आपल्या शरीराच्या वजनाने आणि उष्णतेने ते काही काळात बऱ्यापैकी सुकतात. नंतर जरा हवेवर टाकले की वापरायला तयार. लहान मुलांच्या बाबतीत हा उपाय बरा पडतो. कारण त्याचे कपडे वरचेवर खराब होत असतात.

मात्र, सगळेच जण अशीच bag घेऊन निघतील असे नाही. काही जण sack किंवा back pack घेणं पसंत करतात. एकतर तो पाठीवर घेता येतो अन वेगवेगळ्या प्रकारात आणि आकारात मिळतो. हात मोकळे राहतात त्यामुळे हालचाल सोपी होते. हा sack भरण्याची ही एक विशिष्ट पद्धत असते. काही वरून भरायचे असतात (top लोडिंग ) तसे असल्यास जे सामान कमीत कमी वापरले जाईल ते सर्वात आधी म्हणजे एकदम खाली भरायचे असते. तिथेही वेगवेगळ्या छोट्या प्लास्टिक किंवा कपड्याच्या पिशवीत वेगवेगळे सामान ठेवावे आणि हॉटेल रूम वर तसेच काढून नीट ठेवावे. नंतर त्याच पिशव्या पटकन sack मध्ये भरता येतात. मात्र, sack जर पाठीवर घेऊन जास्त चालायला लागणार असेल तर हलके सामान खालच्या बाजुला आणि वजनदार सामान sack च्या वरच्या बाजूला भरावे. sack भरताना सामानाचे वजन व्यवस्थित distribute झालंय न याकडे लक्ष द्यावे म्हणजे sack घेऊन चालणाऱ्या व्यक्तीला वजनाचा त्रास कमी होतो.

पण प्रवास करत असताना नेमके काय घालावे हे ही तितकेच महत्वाचे असते. प्रवास कसा, कुठे, किती तासाचा नी कोणत्या वाहनाने करणार आहोत यावर ते बरचसं अवलंबून असते. आजकाल चित्रपट तारेतारका आणि त्यांच्या मुलांच्या एअरपोर्ट लूकवरसुद्धा अनेक व्हिडीओज इंस्टाग्रामवर येत असतात.

आपण ज्यात सर्वात कम्फर्टेबल असतो. तेच कपडे प्रवासात वापरावे. पण उदाहरणार्थ, आपण comfortable वाटतात म्हणून shorts घातल्या आणि नंतर गारवा वाढला तर पंचाईत किंवा ट्रेकला चावणाऱ्या कीटकांचा आणि पायात येणाऱ्या काटे असलेल्या वनस्पतीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तिथे अंगभरच कपडे हवेत. फार घट्ट जीन्सचा ही त्रास होतो. विषेशतः जे पुरुष मागच्या खिशात पैशांचे पाकीट ठेवतात ते सतत बसल्याने टोचू नये म्हणून थोडे वाकडे बसतात आणि मणक्याचा त्रास किंवा पाठदुखी त्यांना होऊ लागतो. अतिशय पायघोळ कपडेही चांगले नाहीत. रस्त्यात पाऊस, पाणी लागले तर भिजू शकतात आणि मग ते पुढच्या प्रवासात सांभाळणे कठीण होऊन जाते. त्यामुळे सगळ्याच बाबतीत moderate असलेले कपडे आपण वापरावे.

इतर वेळी सलवार /कुडता/ साडी वापरणाऱ्या स्त्रिया ही प्रवासात जीन्स टीशर्ट/ कुडता घालणे पसंत करतात. अशावेळी एखादा श्रग आणि स्टोल बरोबर असला तर खूप सोपे जाते. तापामानाबरोबरच आजूबाजूचा क्राऊड चांगला नसला तर स्वतःला कव्हर करायला या दोन्हीचा उपयोग होतो.

आणि मग एक दिवस कधीतरी आपण या आपल्या ट्रिप्स पूर्ण करून घरी परततो आणि bag unpack करायला घेतो. तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी विकत घेतलेली souvenirs आपल्या आठवणी रिफ्रेश करु लागतात. त्यातील कपडे धुवायला टाकतांना एखाद्या टी शर्टवर पडलेला आईसक्रीमचा डाग दिसतो, कुठे तरी फाईन डाईन restaurant मध्ये डिनरला गेलेले असताना मारलेले परफ्युम अजूनही दरवळत तिथल्या ambience ची, हळुवार वाजणाऱ्या संगीताची आणि मेनुची आठवण करून देत.

समुद्राचे खारट वास, डोंगरांतील पानाफुलांचे वास, कपड्यांच्या शिलाईत अजून अडकून पडलेली समुद्रावरची रेती, खडे, मुलांनी मळवलेल्या कपड्यांचे रंग, आपल्या पार्टनरचा आपल्या कपड्यांना येणारा सुवास आपल्याला पुन्हा क्षणभर सुखावतो आणि रिकामी झालेली ती bag कपाटात/ कपाटावर ठेवायला जातो. तेव्हा लक्षात येते की, ती रिकामी नाहीच आहे, हे सगळे सुवास, या सगळ्या आठवणीनी अजूनही खचाखच भरलेली आहे.

सुवर्णरेहा जाधव, मुंबई

Updated : 2021-04-10T10:38:54+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top