Home > Max Woman Blog > 'बाहुबली'पेक्षा अहिल्याबाईंचा पराक्रम अधिक तेजस्वी!

'बाहुबली'पेक्षा अहिल्याबाईंचा पराक्रम अधिक तेजस्वी!

मंगळवारी अहिल्याबाई होळकर यांची जयंती सर्वत्र साजरी झाली. पण अहिल्याबाईंच कार्य बऱ्याच जणांना ठाऊक नाही. सासरा आणि नवरा गेल्यानंतर अठराव्या शतकात एक महिला उभी राहते आणि एक आदर्श राज्य निर्माण करते तेही पेशवाईच्या नाकावर टिच्चून! अहिल्याबाईंच्या कार्याचा आढावा घेणारा दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांचा आवर्जून वाचावा असा लेख...

बाहुबलीपेक्षा अहिल्याबाईंचा पराक्रम अधिक तेजस्वी!
X

'बाहुबली'च्या लेखक-दिग्दर्शकांनी अहिल्याबाई होळकरांचे चरित्र वाचले नसणार.वाचले असते तर त्यांच्या देवसेनेनं, नव-याच्या मृत्यूनंतर पोरगा महिष्मतीच्या गादीवर बसावा, यासाठी २५ वर्षे वाट नसती पाहिली. देवसेनेनं 'जय महेश्वरी' म्हणत महापराक्रमानं स्वतःच राज्याची सूत्रं हातात घेतली असती. ('महेश्वर' ही अहिल्यादेवींनी वसवलेली राजधानी!)देवसेनेच्या २५ वर्षांच्या कथित तपश्चर्येपेक्षा अथवा बाहुबलीच्या पराक्रमापेक्षाही अहिल्येचा ३० वर्षांचा राज्यकारभार अधिक तेजस्वी होता.

१७२५ ते १७९५ असा सत्तर वर्षांचा कालखंड अहिल्याबाईंचा. लहानपणी अहमदनगरला जाताना चोंडी हे त्यांचं जन्मगाव एसटीतून दिसायचं. तेव्हा त्या गावात त्यांच्या काही खाणाखुणाही नव्हत्या. अहिल्यादेवी होळकरांची कर्तबगारी आता कुठे आपल्याला समजू लागली आहे!

अहिल्यादेवींनी ३० वर्षे राज्यकारभार केला. नवरा आणि सास-याच्या (आणि मुलाच्याही) मृत्यूनंतर ही एकटी बाई काय करेल, असा प्रश्न ज्यांना पडला होता, त्यांच्या नाकावर टिच्चून अहिल्यामाईंनी अगदी अखेरच्या क्षणापर्यंत राज्य सांभाळले. वाढवले. अत्यंत मुत्सद्दी आणि प्रजाहितदक्ष अशी महापराक्रमी महाराणी होती ही.

नवरा गेल्यावर सती चाललेल्या अहिल्येस सासरे मल्हारराव होळकरांनी रोखले. मग हातात तलवार घेऊन तिने पुढे असा पराक्रम केला! सती प्रथेनं अशा किती अहिल्या आगीत भस्मसात केल्या असतील! आणि, सती प्रथेच्या या समर्थकांनीच अहिल्यामाईंना 'पुण्यश्लोक' करून टाकले! छत्रपती शिवरायांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' आणि शंभूराजांना 'धर्मवीर' करणा-यांनी अहिल्यादेवींना 'पुण्यश्लोक' करून त्यांच्या हातात कायमस्वरूपी पिंड देऊन टाकली!

अहिल्यादेवी शिवभक्त आणि धर्मपरायण होत्या हे खरे, मात्र क्रांतदर्शी नेत्या होत्या. त्यांच्या राज्यात त्यांनी सती प्रथा बंद केली. हुंडाविरोधी कायदाही केला. स्वतःच्या मुलीचा बालविवाह तर केला नाहीच, उलट तिचे आंतरजातीय लग्न लावून दिले. त्यांनी मंदिरे बांधली, तद्वत मशीद, दर्गेही बांधले. मुख्य म्हणजे विहिरी, बारव, तलाव बांधून शेतीसह शेतीपूरक उद्योग भरभराटीस आणले. मोफत रुग्णालये उभी केली. भटक्या जमातींना मुख्य प्रवाहात आणले. विधवांना न्याय्य हक्क दिले.

"मी बाई म्हणून माझ्याकडे पाहू नका.


खांद्यावर भाला घेऊन उभी राहीन, तेव्हा पेशव्यांच्या दौलतीस जड जाईल. तलवारीच्या जोरावर हे राज्य मिळविले आहे. ते कसे राखायचे आणि वाढवायचे, ते आम्हाला समजते!"


अशा आशयात पेशव्यांना सुनावणा-या अहिल्यादेवींचा पराक्रम कोणत्या उच्च कोटीचा असेल, याची कल्पना आपण करू शकतो! मल्हारराव गेल्यानंतर अनेकांनी होळकरांचे राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अहिल्यादेवी सगळ्यांना पुरून उरल्या.

शाहीर अनंत फंदी, कवी मोरोपंत अशा कलावंतांना (जात न पाहाता) आश्रय आणि आधार देणा-या अहिल्यामाई कलासक्त रसिकही होत्या. 'सत्ताधीश' कसा असावा, याचे उदाहरण म्हणून अहिल्यादेवींकडे पाहायला हवे.

त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकताना आजही ऊर अभिमानाने भरून येतो. हत्तीवर आरूढ होत, त्यांनी केलेल्या युद्धाची वर्णने इतिहास सांगतो. अहिल्यादेवी धनुर्धर होत्या आणि स्त्रियांची फौजही त्यांनी उभी केली.


प्रजेसाठी त्यांनी जे केले, ते वाचताना तर आजच्या राज्यकर्त्यांची लाज वाटू लागते. नेता मुत्सद्दी असावा म्हणजे काय, याचा वस्तुपाठ अहिल्यादेवींच्या चरित्रातून मिळतो. सलग तीस वर्षे स्थिर आणि गतिमान असा राज्यकारभार करत राहाणे हे त्या काळात अपवादात्मक, पण अहिल्यादेवी ते करू शकल्या. कारण, त्या खरोखरच महान होत्या!

३१ मे

#महापराक्रमीमहाराणीअहिल्यादेवीहोळकरजयंती


संजय आवटे
संपादक दैनिक लोकमत

Updated : 1 Jun 2022 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top