Home > Max Woman Blog > आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी...

आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी...

आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी...
X

नुकतीच एन डी स्टुडिओच्या श्री. नितीन देसाई यांच्या आत्महत्येची बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. ज्यांच्याकडे परंपरागत व्यापार केला जात नाही अशा समाजातील, एकट्याच्या कष्टाच्या, कर्तृत्वाच्या आणि हिंमतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नितीन देसाईंच्या आत्महत्येने सगळं ढवळून निघालं. दरवेळी असं काही ऐकलं की काही दिवस लोकं हळहळतात. त्यावर माणसं कशी एकटी पडलीत, ताण कसे वाढलेत, दिवसेंदिवस काऊन्सेलिंगची गरज कशी जाणवतेय. अशा चर्चा झडतात आणि तशाच विरून जातात. पण आत्महत्या काही थांबत नाहीत. स्पर्धा, ताण, अतिमहत्वाकांक्षा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी येणाऱ्या नैराश्यातून असं टोकाचं पाऊल उचललं जातं असं ह्या क्षेत्रातले तज्ञ सांगतात.

आपल्याकडे सर्रास आढळणाऱ्या पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्थेमुळे बहुतेकदा पुरुषाकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. कित्येकजण स्वतःच स्वतःसाठी प्रचंड मोठं लक्ष ठेवतात. ते पूर्ण करताना बऱ्याच जणांची दमछाक होते. त्यामुळे अशा दुर्घटनेत बहुतेकदा पुरुषच बळी पडत असलेला आढळतो.

खासकरून एकट्याच्या व्हिजनमुळे, धडपडीमुळे चालू होणाऱ्या एंटरप्राइजेसमध्ये असं होतं. कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला मोठं होत असताना अनेकानेक हात वेळोवेळी लागत असतात पण वेगवेगळी ध्येयं, अफाट उंची गाठण्याच्या धावपळीत, एकट्याचं महत्व आणि प्रस्थ नकळत आतोनात वाढतं. वेळोवेळी मिळालेल्या संधी आणि वैयक्तिक करिष्मा ह्यांच्या आधारे व्यवसाय मोठा होत जातो आणि त्याहूनही मोठा होत जातो 'अल्फा माणूस'.

नव्या क्षेत्रात सुरुवातीला सगळंच एकट्याला करावं लागतं. निर्णय घ्यावे लागतात. काही चुकाही होतात. छोट्या प्रमाणावर त्या सांभाळल्या जातात. हळूहळू सगळं काही स्वतःच करायची सवय जडते. मग मीच हे सगळं केलंय, मलाच सगळ्यातलं सगळं कळतं असं वाटायला लागतं. मी, मी करता करता आपण इतके पुढे जातो, मोठे होतो की आपल्या सोबत कुणीच नाहीये ह्याची जाणीवही होत नाही.

एखाद्या जंगलात आपण फिरायला जातो तेंव्हा काही छोटी झाडं दिसतात तर काही अतिप्रचंड. काही वेली असतात तर काही झुडूपं. पण हेच जंगल दूरवरच्या डोंगरावर उभं राहून पाहिलं तर जवळजवळ एकाच उंचीवर वाढलेले अनेक महावृक्ष दिसतात. जवळ गेलं तर कदाचित लक्षातही नाही येणार पण दूरवरून पाहिलं तर कळेल की स्वतःलाच नाही तर एकमेकांना आणि एकूणच जंगलाला वादळवाऱ्यापासून संरक्षण देत असलेली ही एक परिसंस्था असते. जी एकमेकांना सोबत घेऊन वाढत असते. कुण्या एका झाडाला वाटू शकतं आपल्यात खूप जास्त ताकद आलीय आणि आपण इतर सगळ्यांच्या खूप वर डोकावू शकतो. छोट्यामोठ्या वाऱ्यांनी कॉन्फिडन्स नको तेवढा वाढून जातो आणि मग एखादं चक्रीवादळ आलं की…

माणसं आणि संस्थाही जंगलापेक्षा काही वेगळ्या नसतात. सगळ्यांना सोबत घेऊन वाढणारी, एकमेकांना मदत करणारी, सर्वांना सारखं महत्व देणारी जंगलं, संस्था आणि माणसं मोठमोठ्या संकटांना जास्त सक्षमपणे तोंड देऊ शकतात. म्हणूनच चुकत असल्यास ती दाखवून देऊ शकणारे, योग्य सल्ला देऊ शकणारे - कॉन्शस कीपर आपल्या आजूबाजूला असावे लागतात. ज्यांचा आधार घेऊ शकतो असे सोबती असावे लागतात. मिळवावे आणि टिकवावे लागतात.

गणितं कोणाची बिघडत नाहीत? चुका कोणाच्या होत नाहीत? नवं काही करायचं, नवी आव्हानं पेलायची म्हणजे ह्याची तयारी असावीच लागते. त्यातला महत्वाचा भाग म्हणजे स्वतःच्या मनाची तयारी करणं. केवळ इतरांच्याच नाही तर स्वतःच्या चुकाही माफ करणं. ते जमलं नाही तर आपलीच प्रतिमा कधी आपली वैरी होते हे आपल्यालाच कळत नाही. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलू शकणारी सक्षम टीम जवळ असणे, मार्गदर्शन करू शकणारे, संभ्रमात असताना योग्य मार्ग दाखवणारे आपले दीपस्तंभ उभारलेले असणे महत्त्वाचे असते. सल्ला मागायचीही सवय ठेवावी लागते. मदत मागण्यात कमीपणा वाटू लागला की मग गोष्टी आणखी बिघडत जातात. गर्तेतून बाहेर पडायचा मार्ग दुष्कर होत जातो आणि एक छान बहरलेला वृक्ष, महावृक्ष व्हायच्या आधी उन्मळून पडतो.

नीट विचार केल्यास ह्यात एकट्याच्याच जीवावर सारं काही करू पाहण्याची वृत्ती दिसून येते. ज्यात एकच नेता असतो आणि बाकीचे सारे फॉलोअर्स असतात. बहुतेक निर्णय एकाच्याच किंवा अगदी मोजक्यांच्या मताने घेतले जातात. जणूकाही एकखांबी तंबूच. कुटुंबातल्या, संस्थेतल्या इतर घटकांच्या घडणीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. किंवा त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची, निर्णय घेण्याची, घडण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे संघातील इतर घटकांच्या मजबूतीकडे दुर्लक्ष होतं. कालौघात त्या एका खांबाला धक्के बसले की अख्खा डोलाराच हलायला लागतो. तयारीत नसलेली बाकीची टीमही मग कर्णधार डळमळला की डगमगू लागते. अशा

नेत्याने जर वेळीच आपल्याकडील विविध कामांची विभागणी केली, निर्णय प्रक्रियेत इतरांना सामावून घेतलं, त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर श्रेय आणि अपश्रेय सगळ्यांमध्ये विभागलं जाईल. त्यामुळे परफॉर्मन्सची जबाबदारी कुणा एकावर न येता संपूर्ण टीमवर येईल. साहजिकच प्रत्येकावर येणारा ताण कमी होऊ शकेल. शिवाय, कोणत्याही परिस्थितीचा विविध अंगांनी विचार केला जाईल. ज्याने योग्य निर्णय घेतला जाण्याची शक्यता वाढू शकेल. अडीअडचणीतून सहीसलामत बाहेर पडण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढू शकेल.

हे सारं अचानक करता येणार नाही. त्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच खिलाडूवृत्तीने एकमेकांसोबत काम करण्याची, सर्वांचा विचार करून निर्णय घेण्याची व घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी सर्वांनी घेण्याची सवय करून घ्यावी लागेल. चर्चेत, निर्णयप्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घ्यावं लागेल. त्यांना त्यांचं मत असण्याची आणि ते मांडण्याची संधी द्यावी लागेल. आणि हे फक्त व्यापार किंवा कार्यालयातच नाही अगदी शाळा किंवा घरापासूनच करता येईल.

थोडक्यात सांगायचं म्हणजे स्पर्धा, ईर्ष्या किंवा कुणा थोडक्यांची श्रेष्ठत्वाची भावना वाढवणाऱ्या एकचालकानुवर्ती मानसिकतेतून बाहेर पडून स्वातंत्र्य, समता, संघभावना आणि सर्व स्तरावरच्या सत्तेचं आणि जबाबदारीचं विकेंद्रीकरण ह्या मूल्यांकडे वाटचाल करावी लागेल.


- समिर व सचिन अधिकारी

Updated : 5 Aug 2023 7:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top