Home > Max Woman Blog > एका एलिसा ची गोष्ट…

एका एलिसा ची गोष्ट…

एका एलिसा ची गोष्ट…
X

एलिसा ग्रॅनॅटो (Elisa Granato) हे नावं भारतीयांना माहीत असण्याची शक्यता नाही. राजकारणात कोणी काय बोललं ते कोणत्या खेळाडूने किती धावा केल्या आणि कोणत्या पार्टीत कोणत्या अभिनेत्रीने कोणता ड्रेस आणि कोणती लिपस्टिक लावली होती ह्याची नोंद ठेवणाऱ्या लोकांनकडून आणि ते दाखवणाऱ्या माध्यमांकडून हे नावं सगळ्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता कमीच आहे. एलिसा ग्रॅनॅटो ऑक्सफोर्ड विद्यापिठात मॉल्युक्युलर मायक्रोबायॉलॉजिस्ट आहे. एखाद्या जिवाणूमुळे माणसाला कसे रोग होतात? तो जिवाणू कश्या पद्धतीने तो रोग आपल्या शरीरात पसरवतो ह्यावर मूलभूत संशोधन ती करत आहे. अश्या एखाद्या संशोधकाचा आणि भारताचा काय संबंध असा प्रश्न भारतीयांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. तर ह्या एलिसा ने आपल्या ३२ वर्षी असं एक पाऊल उचललेलं आहे ज्याचे दूरगामी परीणाम भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढाईवर होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीयांसाठी एलिसा च युद्ध खूप महत्वाचं ठरणार आहे.

Courtesy : Social Media

२३ एप्रिल २०२० ला आपल्या ३२ व्या वाढदिवशी एलिसा ने युरोप मधील पहिली महिला होती की जिने ऑक्सफोर्ड विद्यापिठाने तयार केलेल्या “ChAdOx1 nCoV-19” ह्या लसीची चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून ती लस स्वतः टोचून घेतली आहे. तर ह्या लसीचे प्राथमिक परीणाम खूप आशावादी आहेत. ६ प्राण्यांवर केलेल्या चाचणीत ही लस टोचल्यानंतर २८ दिवस कोरोना च्या संपर्कात आल्यानंतर ही त्यांना कोरोना ची लागण झालेली नाही. ही लस नक्की काय करते तर संशोधकांनी कोरोना च्या बाह्य भागावर असलेल्या स्पाईक च्या प्रोटीनजिनला एका निरुपद्रवी विषाणू सोबत मिसळवलं गेलं. हे मिश्रण मग एलिसा ग्रॅनॅटो आणि अजून एका स्वयंसेवकाच्या शरीरात सोडण्यात आलं. आता हे मिश्रण त्यांच्या शरीरातील पेशीत शिरून कोरोना व्हायरस च स्पाईक प्रोटीन बनवायला सुरवात करेल. ज्याला आपण लागण झाली असं म्हणतो तसं ह्याच उत्पादन शरीरात चालू झालं की शरीर अश्या व्हायरस पासून रक्षण करण्यासाठी आपल्या इम्यून सिस्टीम म्हणजे (रोगप्रतिकारक शक्ती) मध्ये अँटीबॉडी आणि टी पेशी ज्या अश्या प्रोटीन आणि त्यातील व्हायरस ला मारून टाकतात त्यांच उत्पादन सुरु करेल. जसं आधी सांगितलं तसं हा व्हायरस निरुपद्रवी असल्याने त्याचा शरीराला त्रास होणार नाही पण शरीर अश्या पद्धतीचं स्पाईक प्रोटीन शरीरात घुसल्यावर काय करायचं ह्याची तयारी आणि त्याला शरीरातून हद्दपार करण्यासाठी पूर्णतः सज्ज होईल. पुढे समजा कोरोना व्हायरस शरीरात घुसला तर तो हेच प्रोटीन घेऊन आपल्या शरीरात प्रवेश करणार आणि शरीरातील इम्यून सिस्टीम ला कळल्यावर आपलं शरीर आधीच तयार असलेल्या अँटीबॉडी आणि टी पेशी घेऊन त्याच्यावर हल्ला करून त्या प्रोटीन सोबत कोरोना चा खात्मा स्वतःच करेल.

Courtesy : Social Media

वाचायला हे अगदी सोप्प वाटलं तरी ह्या सगळ्या प्रक्रिया मेडीकल सायन्स च्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीच्या आहेत. प्रत्येक शरीर हे अश्या मिश्रणाला कश्या पद्धतीने प्रतिसाद देते ह्यावर ह्या लसीच यश- अपयश अवलंबून आहे. जितक्या जास्ती लोकांना ही लस टोचली जाईल तितक्या खात्रीपुर्वक आपण सांगू शकू की आपली उपाययोजना व्हायरस ला थांबवण्यात काम करते आहे. इकडे एक लक्षात ठेवायला हवं की वर सांगितलं तसं प्रत्येक शरीर उपाययोजना बनवेल असं नाही. कदाचित त्या व्हायरसमुळे अजून काही धोका उद्धभवेल अथवा शरीर वेगळ्या प्रकारे ह्याला उत्तर देईल हे बघणं अतिशय महत्वाचं आहे. ह्या सगळ्या टेस्ट मध्ये जिवाला धोका ही होऊ शकतो. त्यामुळेच क्लिनिकल ट्रायल अनेक लोकात यशस्वी होतं नाही तोवर कोरोना व्हायरस ची लस यायला वेळ लागणार आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेला आणि लसीच्या कार्यक्षमतेला समजून घेण्यासाठी ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी गरजेचा आहे. पण ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या ह्या लसीचे प्राण्यांवर दिसलेले परीणाम खूप आशावादी आहेत.

Courtesy : social media

ह्या सगळ्याचा आणि एलिसा चा भारताशी काय संबंध तर भारतातील नव्हे जगातील सगळ्यात जास्ती लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ने ह्या लसी चे ६० मिलियन (६ करोड) डोस बनवण्याची घोषणा नुकतीच केली आहे. ह्या लसीची किंमत जवळपास १००० भारतीय रुपये किंवा १४-१५ अमेरीकन $ असणार आहे. सप्टेंबर पर्यंत एलिसा ग्रॅनॅटो आणि इतर स्वयंसेवकांच्या शरीराने ह्या लसी ला कितपत आपलसं केलं तसेच कोरोना च्या सानिध्यात आल्यावर त्यांच्या शरीरात घडलेले बदल जर आशादायक असतील तर ह्या लसीचे उत्पादन करणारा भारत जगातील सगळ्यात मोठा देश असेल. हे जर यशस्वी झालं तर साधारण ४०० मिलियन लसी पुढल्या वर्षी बनवण्याचा सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचा मानस आहे. कोरोना च्या लढाईत यश अपयश हे ह्या क्लिनिकल ट्रायल मध्ये काय निकाल लागतात त्यावर अवलंबून आहे. आशा करूयात की एलिसा ग्रॅनॅटो ह्या सगळ्यातून सुखरूप बाहेर येईल आणि जगाच्या आणि भारताच्या कोरोनाच्या लढाईत एक निर्णायक भुमिका बजावेल. तिच्या ह्या धाडसी निर्णयासाठी आणि तिला माझा सॅल्यूट. उद्या जर ही लस प्रत्येक भारतीयाच्या शरीरावर टोचली जाईल तेव्हा प्रत्येक भारतीयाने एलिसा ग्रॅनॅटो चं कर्तृत्व नक्कीच लक्षात ठेवायला हवं.

जय हिंद!!!

- विनीत वर्तक

https://vartakvinit.blogspot.com/2020/04/blog-post_30.html?m=1

Updated : 9 May 2020 8:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top