Home > Max Woman Blog > कोरोना फक्त श्रीमंतांचा आजार आहे का?

कोरोना फक्त श्रीमंतांचा आजार आहे का?

कोरोना फक्त श्रीमंतांचा आजार आहे का?
X

रोजच्या प्रमाणे ससून हॉस्पिटल चे जेवण आणि शेल्टर हॉम्स चे जेवण पोहोचवून उद्याच्या सर्व जेवणाची तयारी व नियोजन करून घरी जाण्यासाठी निघालो, रस्ता पूर्ण शुकशुकाट आणि रिकामा होता. कात्रज वरून बिबेवाडीला जाण्यासाठी भारती विद्यापीठच्या मेन गेट समोरच्या रस्त्याने खाली उतरलो, रस्त्यावरून दोन लोक चालत जात होते त्यांच्या तोंडाला मास्क नव्हता, म्हणून मी गाडी थांबवून त्यांची विचारपूस केली.

त्यांना विचारलं कुठे निघालात, तर त्यातील एक व्यक्ती बोलला काही नाही फेरफटका मारून येतो, आत्ताच जेवण झालं म्हटलं पाय मोकळे करावेत. मी त्यांना विचारलं तुमचा मास्क कुठे आहे? तर ते बोलले खिशात आहे. मास्क का नाही लावला आणि असं बाहेर फिरायला परवानगी नाही माहित नाही का, असं मी त्यांना विचारले असता ते बोलले आम्हाला काही नाही होत करोना वगैरे, आम्ही काही कुठल्या मोठ्या माणसाला भेटत नाही. तो मोठ्या माणसांचा आजार आहे हे ऐकून दोन मिनिटं काय बोलावे कळेनासे झाले, त्यांना बोललो जर पोलिसांनी तुम्हाला इथे पाहिलं तर तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातील.

तर ते लोक बोलले की घेऊन जाऊदेत पोलीस स्टेशनला आम्हाला काय फाशी देणार आहेत. हे ऐकताच माझी तळपायाची आग मस्तकात गेली. तो काही केल्या ऐकायला तयार नाही मग मी गाडीतून उतरून त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचे ठरवले तोपर्यंत त्याच्याबरोबर दुसरा माणूस त्याचा हात धरून ओढत मागे घेऊन गेला आणि बोलला साहेब जाऊ दे आम्ही घरी जातो.

आता मला सांगा या प्रवृत्तीचे लोक समाजात असतील तर आपण या महाभयंकर संकटावर कशी मात करणार आज आपल्या देशात, महाराष्ट्रात आणि खास करून पुणे -मुंबई मध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे ते अशा लोकांमुळेच. महाराष्ट्र सरकार प्रशासन सर्व परीने ह्या महाभयंकर संकटाशी दोन हात करत आहे.

पण जोपर्यंत आपण सर्वजण प्रशासनाला घरी बसून मदत करत नाही, तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकणार नाही. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी सहकार्य करा घरी बसा अजिबात घराबाहेर पडू नका आपली व आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या वारंवार साबणाने हात धुवा मास्क वापरा कारण की लढाई कुण्या एकट्याची नसून आपल्या सर्वांची आहे.

✒️विशाल हिरेमठ

Updated : 30 April 2020 5:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top