Home > Max Woman Blog > अंगठ्याच्या करामतीने वेदनाहरण करणारे डॉक्टर पाराशर

अंगठ्याच्या करामतीने वेदनाहरण करणारे डॉक्टर पाराशर

अंगठ्याच्या करामतीने वेदनाहरण करणारे डॉक्टर पाराशर
X

दोन महिन्यापूर्वी माझा उजवा गुढगा अचानक दुखायला लागला. नेहमीप्रमाणे थोडे दुर्लक्ष केले. मग घरगुती उपाय झाले. पण बरे वाटायच्या ऐवजी चालताना पाय Lock व्हायला लागला. मग मुंबई आणि पुणे येथील डॉक्टर झाले. त्यांनी फ़िजिओथेरेपी करायला सांगतली. थेरेपी झाली कि एकदम बरे वाटायचे पण दोन दिवसांनी परत पहिले पाढे पंच्चावन्न!, नामवंत डॉक्टरांचे उपचार झाले तरीही काहीच फरक पडला नाही. पाय सतत दुखतच होता, उलट पायाचे दुखणे आता कंबर आणि पाठीपर्यंत पोहोचले होते. परिस्थिती इतकी बिघडली की कुठल्याच पोझीशनमध्ये बसता झोपतही येत नव्हते. चालताना प्रत्येक पावलाला डोळ्यात पाणी यायचे. चालणे तर पूर्णत: बंद झाले होते. मनात टोकाची निराशा मनात दाटून आली. अशा वेळी जेष्ठ संपादक श्री. मधुकर भावे यांचा जोधपुरच्या डॉक्टर पाराशर यांच्या उपचारपद्धतीवरचा लेख वाचनात आला.

मग आम्ही मुंबईमार्गे जोधपूरला पोचलो. डॉक्टर पाराशरांची भेट झाली. उंच, सावळा वर्ण, भेदक नजर आणि रुबाबदार व्यक्तिमत्व. प्रथम दर्शनी त्यांचे व्यक्तिमत्व मला फार प्रभावशाली वाटले. त्यांनी मला विचारले.

"क्या तकलीफ है?"
"घूटनेमे दर्द है. कमर और पीठमे भी दर्द है." मी सांगितले.

त्यांनी सांगितले,

"लेट जाओ." मी एका भल्यामोठ्या उंच टेबलवर पहुडले. त्यांनी गुढग्यावर हात ठेवून विचारले,
"यहा दुखता है?"

त्यांचा हात लागताच मी वेदनेने कळवळले. त्यांनी कंबर आणि पाठीवरही हात फिरवून कुठे दुखते हे तपासले. काहीही पुढचे प्रश्न न विचारता एका बाटलीतले तेल घेऊन त्यांनी अतिशय हलक्या हाताने मसाज सुरु केला. ५-७ मिनिटे मसाज झाल्यावर ते म्हणाले "जादा प्रॉब्लेम नही हैं. बस दोचार दिनमे ठीक हो जायेगा."

मी टेबलवरून खाली उतरले. तर पाय हलका झाला होता. मी सहज चालू शकत होते. पण हे कदाचित फ़िजिओसारखे असेल, पुन्हा उद्या ये रे माझ्या मागल्या असेही होईल असे वाटले. मग तिथेच रोज रोज दोन वेळा मसाज आणि दोन फ़िजिओ सुरु झाले. देशभरातून अनेक रुग्ण उपचारासाठी इथे येतात आणि रडत भेकत आलेले रुग्ण आनंदाने हसत परत जातात. इथे आलेल्या रुग्णाला कुठलेही औषध दिले जात नाही किंवा हजारो रुपये खर्च करून विविध तपासण्या करायला लावल्या जात नाहीत. फक्त हाताने मसाज करून उपचार केल्या जातात. डॉक्टर सांगतात ही प्राचीन उपचारपद्धती आहे. परंतु काळाच्या ओघात ही विद्या साधारण १८२५ च्या सुमारास लुप्त झाली.




आज अमेरिकेत हा उपचार शिकवणा-या १५०० संस्था आहेत. भारतामध्ये मात्र एकही संस्था ही उपचारपद्धती शिकवीत नाही. डॉक्टरांचे वडील श्री. संवरलाल पाराशर यांना मात्र ही कला अवगत होती. ते घरीच रुग्णावर हे उपचार करायचे. त्यानंतर डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर हे काम करायला लागले आणि आज ५२ वर्षे त्यांचा हा रुग्णसेवेचा यज्ञ सुरु आहे. आपल्या शरीराची एक ठेवण असते पण चुकीच्या सवयीमुळे आपण झोपताना, बसताना चालताना चुकीच्या पद्धतीने चालतो. त्यामुळे हाडे झिजायला लागतात आणि शिरा आपली जागा सोडतात. कधी शिरेवर शीर चढते. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होतो. आणि त्यातून वेदना तयार होते. सुरुवातीला सहन करता येणारी वेदना मग अशक्य व्याधीचे रूप घेते. आपले शरीर हाडे, मांस, रक्तवाहिन्या आणि शिरांनी बनलेले आहे. त्याची प्रत्येक व्यक्तीनुसार शरीररचना आणि ठेवण असते. ती बिघडली की या प्रकारची व्याधी उत्पन्न होते.

इथे रुग्णाला विचारून हे निश्चित केले जाते की कुठे दुखते आहे म्हणजे कोणत्या शिरेची स्थिती विपरीत झाली आहे. त्या ठिकाणची शीर पकडून त्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने हलक्या हाताने तेलाचा मसाज केला जातो. त्यानंतर त्या ठिकाणी फिजिओथेरेपी दिल्या जाते. आणि बघताबघता अशक्य वाटणारी व्याधी ४-५ दिवसात गायब होते. हात पाय आखडलेले रुग्ण चालायला लागतात. गूढगेदुखी, सांधे आखडणे, फ्रोझन शोल्डर, स्पोंडीलायटीस, टेनिस एल्बोने त्रस्त झालेले रुग्ण रोगमुक्त होतात. दिवसभरात ३०० रुग्णांवर इथे उपचार केले जातात. पंधरा डॉक्टरची टीम उपचार देत असते. मी तिथे १० दिवस राहिले त्या काळात देशाच्या अनेक भागातून आलेले रुग्ण मला पाहायला मिळाले.




महाराष्ट्रातून येणा-या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. हे इस्पितळ ख-या अर्थाने धर्मादायी आहे. इथे एका वेळच्या उपचारासाठी फक्त १०० रुपये घेतले जातात. दिवसभरात ४ वेळा उपचार घ्यावे लागले तर ४०० रुपये होतात. याशिवाय एकही पैसा घेतला जात नाही. ज्यांनी मुंबई पुण्यासारख्या महानगरात डॉक्टरांकडून उपचार करून घेतले आहेत त्यांना हे शुल्क किती माफक आहे ते कळेल. केवळ पैसे कमावण्यासाठी काढलेल्या मोठ्या शहरातील खाजगी इस्पितळात १०० रुपयात निदान केसपेपर तरी मिळतो का हा प्रश्न आहे.




अद्भुत उपचारपद्धती.

डॉक्टर पाराशर यांनी वडिलांनी शिकवलेल्या गोष्टींवर पुढे संशोधन करून स्वत:ची अशी उपचारपद्धती विकसित केली आहे. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी शिरांवर दाब देवून केलेला मसाज हे खरोखरच अद्भुत आहे असेच म्हणावे लागेल. विविध औषधे गोळ्या इंजेक्शने आणि फ़िजिओथेरपीला दाद न देणारे दुखणे केवळ दोन अंगठ्यांच्या मसाजद्वारे बरे होते, याचा अनुभव मी स्वत: घेतला. अनेक नामवंत व्यक्तींनी इथे येऊन उपचार घेतले आहेत. त्यात चक्क मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, तमिळनाडूच्या मुख्यमंत्री स्व. जयललिता, दिग्विजयसिंग, शिवराजसिंग अशी कितीतरी नावे सांगता येतील.

ख्यातनाम उद्योगपती श्री अनिल अंबानी यांनी डॉ.पाराशर यांचे उपचार बघून त्यांना 'मी तुम्हाला सप्ततारांकित इस्पितळ काढून देतो, तुम्ही मुंबईत या' अशी ऑफर दिली होती. परंतु त्या इस्पितळात मला ज्यांची सेवा करायची आहे, तो गरीब माणूस येऊ शकणार नाही असे सांगून त्यांनी विनम्र नकार दिला. मलाही आश्चर्य वाटले की इतकी चांगली उपचारपद्धती फक्त १०० रुपयात देणे त्यांना कसे काय परवडू शकते? याबाबत मी त्यांचे पुत्र हेमंतकुमार पाराशर यांच्याशी बोलले तेंव्हा ते अतिशय सहजपणे म्हणाले, "ठाकूरजीने दिया सबकुछ हैं. आदमी पैसेके पीछे लगता हैं. सेहतके तरफ ध्यान नही देता. पचास सालकी उमर होनेतक बहुतसारा पैसा जमा होता हैं, बादमे वो सब पैसा डॉक्टर और दवाईपर खर्चा होता हैं! क्या करना हैं ऐसा पैसा कमाके?" त्यांच्या या एका वाक्यात जीवनाचे किठी मोठे सार होते!

लहानपणापासून आपल्याला सांगतात 'आरोग्य हेच धन आहे, शरीर ही संपत्ती आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याची फळे पुढे भोगतो. डॉक्टर हेमंत पुढे असेही म्हणाले की, दरमहा त्यांच्या या चार माजली इस्पितळाचा खर्च सुमारे १० लाख रुपये आहे. पण एखाद्या महिन्यात जर त्यापेक्षा जास्त पैसे आले तर माझे वडील लगेच एक दोन फ्री शिबिरे करून टाकतात. तो पैसा आपल्याकडे ठेवीत नाहीत. इथे परगावहून आलेल्या रुग्णांसाठी राहण्याची अतिशय उतम सोय केलेली आहे. त्याचबरोबर उत्तम जेवण आणि न्याहारीही दिली जाते. इथली स्वच्छता आणि नीटनेटकेपणा वाखाणण्याजोगा आहे.

त्यांनी स्वत:ची विद्या स्वत:पुरती मर्यादित न ठेवता त्याचा एक अभ्यासक्रमही विकसित केला आहे. जोधपुर विद्यापीठात तो शिकवला जातो. ही सेवा देशभरातील गोरगरिबांना उपलब्ध व्हावी म्हणून दरवर्षी अनेक विद्यार्थी तयार केले जातात.

कलियुगात आपण देवाला बघू शकत नाही असे म्हणतात पण माणसाच्या रूपातच कधी कधी त्याचे दर्शन होते आणि आपल्या दु:खाचे हरण करतो हे मात्र नक्की! मला डॉ.पाराशर यांच्यात ते दर्शन झाले.

संपर्कासाठी पत्ता: श्री संवरलाल ओस्टीओपथी चॅरीटेबल संस्थान,
सेक्टर १८, 'इ' चौपासनी हौसिंग बोर्ड,
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या शेजारी, जोधपुर -३४२ ००८
फोन: ०२९१ – २९७२७७७, ८४२६०७२२२२, ९९२९० ९८९५२
इमेल पत्ता: drparashar@ rediffmail.कॉम
संकेतस्थळ: www.paincure.co.इन
-श्रद्धा खारकर-बेलसरे ८८८८९५९०००

Updated : 25 July 2021 5:01 PM GMT
Next Story
Share it
Top