Home > Max Woman Blog > मागच्या दोन चार वर्षापासून सखाराम बापूनं स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं...

मागच्या दोन चार वर्षापासून सखाराम बापूनं स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं...

मागच्या दोन चार वर्षापासून सखाराम बापूनं स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं...
X

©ज्ञानदेव पोळ

सगळा देश लॉकडाऊन असतानाच्या काळात अचानक सखारामबापू गेल्याचं कळालं आणि शेकडो मैल लांब असलेल्या एका विषाणूग्रस्त शहरातल्या एका कोपऱ्यात दिवस रात्रींचा हिशोब मोजत बसलेलं माझं रिकामं मन प्रचंड अस्वस्थ झालं. एकेकाळी हिरवाईने नटलेल्या शिवारात सात मजली हसणाऱ्या बापूच्या चेहऱ्याचा असा स्मशानात कोळसा झालेला बघून अक्षरशः गलबलून आलं. मागच्या दोन चार वर्षापासून सखाराम बापूनं घरातल्या एका बंदिस्त कोपऱ्यात स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं. आता तुम्ही म्हणाल, हे काय भलतंच. कोरोनाव्हायरस तर आत्ताच आला आहे, मग बापूनं चार वर्षे आधीच का बंदिस्त करून घेतलं असेल. पण मंडळी हे काहीच नाही, तर मागच्या एक-दोन वर्षात सखारामबापूनं फक्त जेवणा पुरतच तोंड उघडलं असेल. बाकीच्या काळात त्याचे ओठ एकमेकांना चिकटलेलेच राहिले. नेमकं काय घडलं असेल सखाराम बापूच्या जीवनात? तुम्हाला प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण नेमकेपणानं खरंच मला नाही सांगता येणार. तरीही सखाराम बापूची मोडकी तोडकी गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे.

अंधाराच्या पोटातून लाल गोळ्या सोबत सकाळ बाहेर निघावी. क्वारंटाईन केलेल्या घरट्यातून बाहेर पडून पाखरांचा मुक्त किलबिलाट सुरु व्हावा. गावाबाहेरच्या पानंदीतून बैलगाड्यांचा खडखडाट सुरू व्हावा. गोठ्यातून गायी-गुरांच्या हंबरण्याचा आवाज फुटावा आणि अचानकच कोणीतरी येऊन गोठ्यात म्हसरांच्या गराड्यात हातात म्हशीची थानं खाली वर करीत चूळss चूळss धारा काढीत बसलेल्या बापूला हाक द्यावी, "बापू आज ईशील का रं आमच्या मळ्याकडं! कणसात दानं भरायला लागल्यात गड्या! पाखरं लई दमवायला लागल्याती तेवढा माळा घालून दे बाबा वावरात. आणि बापूनं त्याचा शब्द धरून लगेच म्हणावं, "पुढं व्हा आज तिकडच्याच रानात हाय! गाडी जुपून निघालोच आता झकास पैकी माळा घालू बघ!" अशी व्हायची सखाराम बापूच्या दिवसाची सुरुवात.

थंडीच्या दिवसात हिरवागार शालू नेसलेला शाळू पोटऱ्यातून बाहेर पडला की कणसात कोवळं दूध भरलेलं दानं भरू लागायचं. सगळ्या शिवारात पाखरांचे थवेच्या थवे पिकावर उतरू लागत. अशावेळी गरज पडायची ती शेतात पाखरं हाकणाऱ्या हाक्याची. हे हाके दिवस उगवायला आपापल्या शेताकडे पळत असत. पण नुसतं शेताभोवती पळून आणि हाक्या देऊन पाखरं थांबत नसत. त्यासाठी वावरात माळा घालावा लागायचा आणि असा माळा घालण्यात सखाराम बापू एक नंबर पटाईत माणूस. बापूला साऱ्या गावातली माणसं या काळात आपापल्या वावराकडे बोलावणे धाडत. बापू हे काम विनामोबदला करायचा.

हा माळा घालण्यासाठी बापू ओढ्याकडेला शिरायचा आणि करंजीच्या झाडाच्या चार मेढी तोडून त्याच्या समान उंचीच्या खेली येतील अशा अंदाजाने त्या वावराच्या मधोमध रोवून घ्यायचा. उभ्या आडव्या बांबूच्या काट्या बांधून आणि मध्ये बारक्या मेसकाट्या टाकून त्याच्यावर करंजीचे पांजराण अंथरूण ते एकजीव करून घ्यायचा. माळा हलू नये अथवा निसटू नये म्हणून बाजूने आडवी दांडकी ही बांधायचा. वरती चढण्यासाठी एक शिडीही तयार करायचा. आमच्या शेतात पाखरं राखायची काम लहानपणी आम्हाला असायची अशावेळी बापू आमचा माळा इतरांपेक्षा उंच करून द्यायचा. अगदी पिकाच्याही उंचीपेक्षा जास्त. यामुळे लहान उंची असून सुद्धा सगळ्या शिवारातली पाखरं अगदी सहज टिपता यायची. अशा वेळी बापू आम्हाला माळ्यावर एखाद्या पाटीत नाहीतर बुट्टीत रानातली ढेकळे गोळा करून द्यायचा आणि गोफणीने पाखरं कशी टिपायची हे शिकवायचा. दगडापेक्षा ढेकळे पिकावर फेकली की ढेकळे सगळ्या पाखरांच्या अंगावर फुटत जातात हे त्यानेच आम्हाला प्रथम शिकवलं. गोफणीने दगडफेक करण्यापेक्षा आम्ही एक काठी घेऊन रिकामे पत्र्याचे डबेच वाजवत बसायचो. मग बापू आमच्यावर ओरडायचा. म्हणायचा, भडव्यांनो आशनं आन नाय मिळायचं खायला. अशी पाखरं राखत्याती व्हय.

बापूंने घातलेला माळा कितीही नाचलं तरी हलणार नाही की पडणार नाही. की त्याचा एखादा वासासुद्धा निसटणार नाही इतका अप्रतिम माळा उभा करायचा सखाराम बापू. म्हणूनच सारं गाव त्याच्याकडूनच घालून घ्यायचा माळा. बापू त्याच्या वावराशेजारची आजूबाजूची शेतं भाड्याने हाकायसाठी घ्यायचा. या काळात त्याचा दिवस उगवायला दिवस सुरू व्हायचा. बापू माळ्यावर चढला आणि "ह्याss ह्याss हूss" ओरडत गोफणीने ढेकळ फेकू लागला की पाखरं भिऊन लांब पळायची. बापू शिवारात नुसता शिरला तरी त्याच्या आवाजानं लोळत, फिरक्या घेत पाखरं भुर्रकन उडून जायची. इतका दरारा होता बापूचा शिवारात. इतकी भीती होती पाखरांना बापूची. बापूने राखलेल्या शेतात सुगीच्या वेळी खळ्यावर अशी धान्याच्या रासंची पोतीच्या पोती भरत जायची. माणसं म्हणायची, काय रान राखलंय गड्या बापूनं.

दुपारच्या वेळी शेतातला ओला हरभरा उफटून बाभळीच्या झाडाखाली पालापाचोळा गोळा करून हावळा भाजायचा बापू. भाजताना खरपूस सुटलेला वास आणि झालेला धूर बघून आजूबाजूच्या शेतातली माणसं त्याचा हावळा खायला जमायची. आणि गप्पा रंगात यायच्या.

बापूकडे एक सायकल होती आणि तिला लाईट होती लाईट. तुम्हाला याचं कदाचित अप्रूप वाटणारही नाही. पण त्याकाळात गावातली लाईट असणारी पहिली सायकल या बापूची होती. आठवडी बाजाराला गेलेला बापू अंधार धरून जेव्हा गावात सरकू लागायचा तेव्हा पानंदीत त्याच्या सायकलची लाईट दिसली की माणसं, गड्या बापू आला बाजारासनं म्हणत लाईट बघायला रस्त्यावर यायची. ही सायकल त्याला एका मिलिटरीतल्या जोडीदाराने रान हाकल्याच्या मोबदल्यात घेऊन दिलेली. ती त्याने पोटच्या पोरासारखी पुढे आयुष्यभर जपली. पण पोटची पोरं???

सखाराम बापूनं आयुष्यात दुनियादारी केली. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी आपली बैलं घेऊन फुकट राबत राहिला. कधी गाठीला पैका बांधला नाही की की कधी बायकोला नवं लुगडं घेतलं नाही. आल्या गेल्याना मदत करत राहिला. लोकांच्या संकटात धावत राहिला. अडीअडचणीला त्यांना मदत करत राहिला. पण पोटाला आलेली दोन पोरं जशी मोठी होत गेली तसा बापू ढासळत ढासळत गेला. बापूची दोन्ही पोरं शाळा शिकली नाहीत. बापू सोबत शेतातच काम करू लागली. मोठेपणी बापूने त्यांची लग्ने करून दिली. दोनाचे चार हात करून दिले. घरात नव्या सुना आल्या. थोड्याच काळात नातवंड आली. बापू नातवंडात रमू लागला. त्यांना खांद्यावर घेऊन शेता शिवारात फिरू लागला. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण हळूहळू भांड्याला भांडं घासू लागल्याचा आवाज होऊ लागला आणि हळूहळू बायकांनी घर फोडलं.

महिनाभर नुसतं बापूच्या घरात भांडणाचं चकार उठलेलं. अखेर गावातल्या चार माणसांनी मध्यस्थी करून बैठक बोलावली. बापूने घरादासहीत सगळी वाटणी करून टाकली. बापू थोरल्याकडे गेला तर म्हातारी धाकट्याच्या वाटणीला गेली. पण पोरं शेताच्या वाटणीसाठी अडून बसली आणि एक दिवस बापूला तालुक्याच्या कचेरीत घेऊन दोघांनी बापूच्या हाताचं ठसे उठवून घेतलं. बापूच्या वाटणीला एक बारकासा तुकडा ठेवला.

दिवसा मागून दिवस आणि रात्री मागून रात्री सरत गेल्या. तंस बापूच्या घरात वेगळच घडत गेलं. थोरला पोरगा दारूच्या आहारी गेला. दिवस-रात्र गावाबाहेरच्या दारूच्या गुत्त्यावर पडून राहू लागला. पुढं पुढं तर तो फक्त दारू पिण्यापुरतंच तोंड उघडू लागला. तो इतका आहारी गेला की हळूहळू त्याने त्याच्या वाटणीची सगळी शेती विकून टाकली. आणि एक दिवस गावाबाहेरच्या गुत्यापुढं त्याचा दारूने मरून पडलेला देह बापूने गावकऱ्या सोबत स्मशानात नेऊन जाळला. तीच गत धाकट्याची. धाकटा सुरुवातीला काहीतरी काम काढून तालुक्याला जाऊ लागला आणि हळूहळू तिकडेच राहू लागला. तो दिवस रात्र तालुक्याच्या गावालाच पडून राहू लागला. त्याला तिकडे जुगाराचा नाद लागला. तो काही दारू पीत नव्हता पण आकडे लावीत होता. आकडे लावून इतकी उधारी झाली की त्यांनेही एक दिवस त्याच्या नावावरची सगळी जमीन विकून टाकली. आणि तिकडेच एका आकडे लावणाऱ्या बाईला धरून राहू लागला. एकेकाळच्या बापूच्या समृद्ध घराला भिकेचे डोहाळे लागले. सगळ्या घरादारावरच उपासमारीची वेळ आली. उतारवयात थकलेल्या बापूने याचा चांगलाच धसका घेतला. त्याने माणसात उठणं बसणं बंद केलं. आणि काही वर्षांने त्यांनं घरातल्या एका कोपऱ्यात स्वतःला कायमचं बंदिस्त करून घेतलं. कायमचंच. राबायला जायचं तर शेतच उरलं नाही. म्हातारी सहित घरातली बायका-माणसं रोजंदारीवर कामधंद्यासाठी हिंडू फिरू लागली. लोकांच्या बांधायला हात पाय घासू लागली.

मागच्या वर्षी सहज सखाराम बापूला भेटायला गेलो. जाण्याआधीच समजलं. बापू आता माणसांना बघून घाबरतो. छे! छे! माणसांच्या गर्दीत राहणारा आणि आयुष्यभर गर्दीतच जगलेला बापू असा माणसांच्या गर्दीला कसा काय घाबरू शकतो? विश्वासच बसेना. वाट वाकडी नाही तर सरळ करून बापूचं घर गाठलंच. तर बापू कोपऱ्यातल्या वाकाळ अंथरलेल्या खाटेवर पडलेला. एकटाच. एकाकी. कधीतरी मरून गेलेल्या म्हातारीच्या आठवणीने तो असा एकाकी झाला होता की पोराबाळांनी इज्जत, अब्रु, घरदार भुईसपाट केल्याच्या छळणार्या आठवणीने तो असा एकाकी झाला असेल कळायला काहीच मार्ग नव्हता. त्याच्या जवळ जाऊन बसलो. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ तिथेच घालवला. पण शेवटपर्यंत त्याचं मिटलेलं तोंड उघडलंच नाही. त्याचे डोळे नुसतेच शून्यात टकामका बघत आणि पापण्यांची केविलवाणी उघडझाप करीत राहिले. त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला तर क्षणात त्याचा हात थरथरू लागला. आणि लगेच त्यानं तो पटकन सोडवूनही घेतला. कशाची ही भीती? तसाच उठलो. डोक्यात प्रश्नांचा जाळ धडधडू लागलेला. कानातून धुरांचे लोट उसळलेले...

...खरंच, त्यानं तेव्हा माझा हातातील हात भीतीने का सोडवून घेतला असेल? की शेवटचा उरलेला शेताचा तुकडा कोणीतरी हाताचा ठसा उठवून आपल्याकडून लिहून घेतल्याचा भास त्याला झाला असेल? अखेरच्या काळात कशाने मुका झाला असेल सखारामबापू? की तो ठरवून मुका झाला असेल? काहीच कळत नाही. एकेकाळी शेता शिवारात समृद्धीचा काळ पाहिलेल्या बापूच्या वाट्याला काय हे उपेक्षित जीवन लाभले? नेमका कशाला तो घाबरत असावा? की एकेकाळी त्यांने गावाच्या प्रत्येक शिवारात रचलेल्या माळ्याचा एक एक वासा निसटून त्याच्या डोक्यात आपटल्याचा भास त्याला होत असावा? नेहमी अडी अडचणीच्या वेळी शेतातील माळा रचायला पुढे घेऊन जाणारी माणसं त्याचं प्रेत रचायला का एकत्र आली नसतील? कोरोनाच्या भीतीने? की आणखी कशाने? कशाचा परिणाम म्हणायचा हा? उसवत चाललेल्या माणसांतील अंतराचा की माणसांना कचाकच तुडवत आणि मारत पुढे निघालेल्या विषारी काळाचा???

©ज्ञानदेव पोळ

Updated : 1 April 2020 2:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top