Home > Max Woman Blog > खरंच कोरोना संपला का?

खरंच कोरोना संपला का?

खरंच कोरोना संपलाय का? लोकांना लोकल सुरु करून हव्यात, मॉलमध्ये शॉपिंगला जायचं, हॉटेलमध्ये खायचं, पण मास्क लावायचा नाही, चाचण्या करायच्या नाहीत, अधिकार हवेत, जबाबदारी नको, या सहा सात महिन्यात रुतून राहिलेला कंटाळा त्यांना काढायचा आहे. त्यासाठी झाला करोना तर झाला, ही मानसिकताही प्रबळ आहे. वाचा पत्रकार शर्मिला कलगुटकर यांचा हा लेख..

खरंच कोरोना संपला का?
X

करोना संसर्गाचे प्रमाण शहरांमध्ये नियंत्रित होताना दिसते, आकडे पाहून हुश्श व्हावं अशी स्थिती आहे का? काही दिवसांपूर्वी करोनाच्या चाचण्यांचे दर कमी करण्यात आले हे दर कमी झाले म्हणून चाचण्यांची संख्या वाढली का? हे चेक करून पाहिल्यानंतर लक्षात आले की लोक तपासण्यांसाठी जात नाही. खासगी तपासण्या करणाऱ्या लॅबच्या कॉर्डिनेटरने सांगितले पूर्वी आम्हाला साडेचारशे ते पाचशे कॉल यायचे आता ते ऐंशी नव्वद असतात. दर कमी होऊनही लोकांची मानसिकता बदलेली नाही यात पूर्णपणे सामान्यांना दोष देऊन उपयोग नाही.

पुन्हा लॉकडाऊन सामान्य माणसांना परवडणारं नाही. नोकऱ्या, रोजगार गेल्यामुळे अनेकांचं जगणं अवघड झालं आहे. नवी नोकरी या काळात कुठे मिळणार? हा प्रश्न आहेच.. करोना झाला तर खासगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यायला पैसे नाहीत, अन् सरकारी आरोग्यसेवांवर विश्वास नाही, असाही एक मोठा वर्ग आहे. समस्या अनेक आहेत.

कणकण येतेय, अंग दुखतंय अशी थोडी तक्रार जरी केली तरी कोरन्टाइन करतील, बाहेर पडता येणार नाही अशी वेगवेगळी कारणं पुढे येत आहे. सामाजिक बहिष्काराची भिती आजही आहेच. त्यामुळे लक्षणं लपवण्याचा कलही वाढता आहे. जे करोनातून बरे झाले आहेत त्यांच्याकडून तसेच सर्कलमधल्या ओळखीच्या तज्ज्ञांकडून औषध घेतली जातात. लोकांची, डॉक्टरांचीही करोनाविषयीची 'समज' रोज वाढते आहे. धोका कुणाला, कधी केव्हा हे ज्याचं त्याने ठरवून घेतलं आहे. (ते किती योग्य यावर वेगळी चर्चा करता येईल)

लोकांना लोकल सुरु करून हव्यात, मॉलमध्ये शॉपिंगला जायचं, हॉटेलमध्ये खायचं, पण मास्क लावायचा नाही, चाचण्या करायच्या नाहीत, अधिकार हवेत, जबाबदारी नको, या सहा सात महिन्यात रुतून राहिलेला कंटाळा त्यांना काढायचा आहे. (त्यासाठी झाला करोना तर झाला, ही मानसिकताही प्रबळ आहे.)

या सगळ्या आकड्यांचा, चढउतारांचा अभ्यास करणारे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सरकारला लोकल पूर्णपणे सुरु करू नका, असं पुन्हापुन्हा सांगत आहे. संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणू हा थंडीमध्ये जोर धरतो असं दिसून आलंय. या विषाणूचा हा पहिला हिवाळा, हा बापुडा आपल्याला घाम फोडणार की हुडहुडी भरवणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे झपाझप कोव्हीड सेंटर बंद करून परवडणार नाही.. अन् आपण गाफील राहूनही चालणार नाही.

पत्रकार शर्मिला कलगुटकर

Updated : 7 Nov 2020 1:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top