Home > Max Woman Blog > धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी…

धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी…

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी त्या निमित्ताने या विकृत मानसिकतेचा चेहरा टराटरा फाडणारा समीर गायकवाड यांचा लेख

धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी…
X

काहींना धोनीच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याची भावना होतेय. याचा इथं अनेकांना संताप आलाय. साहजिक आहे हे. चारेक दिवसापूर्वी अमेरिकेत एका बापाने आपल्या दहा महिन्यांच्या लहानग्या जीवावर बलात्कार केला. त्यानं तिला इतक्या विचित्र पद्धतीने भोगलं की तिच्या मेंदूला धक्का पोहोचला, रेक्टम बस्ट झालं. मुलीचे श्वास मंदावत गेल्यावर त्यानं गुगलवर चेक केलं की लहान बाळ मेल्याचं कसं ओळखावं, बाळ कसं मरतं ! त्यानं सोशल मीडियावर याविषयी चॅटिंगही केलं. काही वेळानं त्या मुलीचा श्वास कुंठला. नंतर रीतसर त्याला अटक वगैरे झाली.

आपल्याकडे रोज खंडीभर बलात्कार होतात, ते आपल्या अंगवळणी पडले आहेत. मात्र ... काही बलात्कार असेही असतात की जे प्रत्यक्ष शारीरिकरित्या होत नाहीत. मात्र ते घडत असतात, अगदी खोलवर आघात करत असतात. फॉकलंड रोडला धंदा करणाऱ्या रीना सालेहाकडे येणारा एक इसम अत्यंत नीच होता. तिच्या खोलीत शिरून तिच्यावर स्वार झाल्यानंतर त्याला मुद्दाम तहान लागायची. रीनाच्या मुलीला तो पाणी आणायला लावायचा. कित्येकदा तो तिच्यासमोर रीनाला मारायचा. हवं ते करायचा.

ती चिमुरडी पार भेदरून जायची. तिच्यावर शारीरिक बलात्कार झाला नाही पण त्याहून भयानक आघात मनावर झाले. रीनाला छळणारा तिच्या नात्यातलाच होता हे नंतर उघड झाले. रीनाची मुलगी स्वरूप मात्र, या धक्क्यातून कधीच सावरू शकली नाही. भेदरलेल्या स्वरूपला घेऊन रीना मिदनापूरला परत गेली. तिला कोलकत्यातील पावलोव मेंटल इस्पितळात दाखल केलं गेलं.... बलात्कार करण्यासाठी शारीरिक जोरजबरदस्तीच केली पाहिजे असे काही नाही. बलात्कार नजरेनेही होतो. स्पर्शाने होतो. शब्दांनीही होतो.

कुठंल्याही स्त्रीबद्दल वाईट अभद्र विखार ओकण्याआधी लोक आता आपली आईबहीणही इमॅजिन करू शकत नाहीत. कारण आताशा लोकांनी त्यांनाही सोडलेलं नाही... थोडंसं अतिरंजित वाटेल मात्र, शांत चित्ताने विचार केला तर काहीसं पटेल... फोटो क्रेडिट मेरी एलन मार्कचे. मोहम्मद हनीफसोबत ही प्रूफस्टोरी कव्हर केलेली. आता तीन दशकं उलटून गेलीत. स्वरूपचं पुढं काय झालं माहिती नाही. मात्र धोनीच्या मुलीची बातमी वाचून तिची तीव्र आठवण झाली. तिच्या भेदरलेल्या नजरेस नजर देता येईल का कुणाला ?

(समीर गायकवाड यांच्या फेसबुक भिंतीवरून) साभार

Updated : 2020-10-11T13:48:12+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top