Home > Max Woman Blog > मातृत्व आणि कर्तृत्व, दोन्हीला सलाम

मातृत्व आणि कर्तृत्व, दोन्हीला सलाम

एखादी महिला जोखीम घेवून एखाद काम करत असेल तर “उगाच झाशीची राणी बनायला जावू नको” असं आपण सहज बोलून जातो. पण त्यांच्या मातृत्व आणि कर्तृत्वाकडे आपण ‘डोळसपणे’ दुर्लक्ष करतो. अशा अनेक महिला आपल्या आजुबाजूला असतात. अशाच एका महिलेच्या मातृत्व आणि कर्तृत्वाची कहाणी सांगणारा धनंजय देशपांडे यांचा लेख..

मातृत्व आणि कर्तृत्व, दोन्हीला सलाम
X

फलटण ते पुणे या एसटी प्रवासात एक सुंदर अनुभव जवळून घेतला! (गाडी सांगोला ते स्वारगेट अशी होती) आणि पटकन एक वाक्य सुचलं ते हेच की "मातृत्व आणि कर्तृत्व.. दोन्हीला सलाम" त्याला कारणही तसेच होते.

त्या एसटीमध्ये कंडक्टर म्हणून महिला कार्यरत होती. आता तुम्ही म्हणाल की, यात काय विशेष? गेल्या काही काळापासून एसटी महामंडळात महिलांना संधी दिली जातेय. पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांना स्थान दिले जातेय. हे कौतुकास्पद आहेच मात्र ती संधी मिळाल्यावर पुरुष कंडक्टर इतकंच काम महिला करतात असं नाही तर वाढीव एक काम हि त्यांना करावं लागत. ते म्हणजे मातृत्व देखील सांभाळावं लागत.


मी ज्या बसने येत होतो त्याच या महिला कंडक्टर आहेत. अन त्यांच्या सोबत जे बाळ आहे तो त्यांचा छोटुकला गोंडस मुलगा.

त्या मूळच्या सांगोल्याच्या. गेले काही वर्ष झाली त्यां एसटी मध्ये नोकरीस आहेत.

तर माझ्या साडेतीन तासाच्या या प्रवासात मी जे निरीक्षण केलं, अनुभवलं ते अतिशय मन भरून टाकणार अन तितकंच त्यांना "सलाम" करावासा वाटण्यासारखं. एक दोन झलक सांगतो त्यावरून कळेल की महिला व माता असेल तर त्या कंडक्टरला काय काय करावं लागत ?

एक : गाडी स्टँडवरून बाहेर काढताना सराईतसारखे बसच्या मागे राहून शिट्टी वाजवत ड्रायव्हरला सूचना करत होती. अन गाडी बाहेर निघाल्यावर थोडी स्लो असताना सराईत सारखं आत येऊन जागेवर बसली सुद्धा! त्यावेळी ते बाळ एका हातात होत अन दुसऱ्या हाताने शिट्टी वाजवून मदत करण सुरु होत.


झलक दोन : मधल्या मधल्या स्टॉपवर नवीन प्रवासी चढल्यावर त्या मॅडम जागेवरुन उठून त्या त्या प्रवाश्याना तिकीटे देऊन येईपर्यँत ते बाळ गुणासारखं सीटवर बसलेलं असायचं. मात्र आई शेजारी येऊन बसल्यावर त्याच्या खोड्या सुरु व्हायच्या. तर काय झालं, जेजुरी स्टॅन्डमधून निघताना त्या मॅडमनी डबल बेल मारण्यासाठी वरती बांधलेली असते न ती दोरी दोनदा ओढली. बाळाने ते पाहिले अन पटकन उठून त्याने दोरी ओढायचा हट्ट धरला. तसे झाले असते तर बिचारा ड्रायव्हर तिकडे गडबडला असता हे ओळखून त्या मॅडमनी पटकन स्वतःचे एक बोट दोरीवर असे दाबून धरले की बाळ दोरी तर ओढत होत पण घंटी वाजत नव्हती. नोकरीत जॉईन होताना सुरुवातीला ठराविक काळाचे प्रशिक्षण दिले जाते. पण आता हे बोटाने दोरी दाबून धरण्याचे प्रशिक्षण तर त्या मॅडमना मिळाले नसणार. हे नक्कीच! इथं मातृत्व अन कर्तृत्व दोन्ही त्यांनी सांभाळले. मुलाचा हट्टहि पुरवला मात्र ड्युटीवर घोळ पण नाही होऊ दिला.

झलक तीन : बाळाचे घंटीच्या दोरीकडील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी तिकटी पंच करण्याचा चिमटा असतो न तो समोरच्या स्टील रॉड वर हळूच वाजवला. सुंदर आवाज आल्याने बाळाने दोरी सोडून तो चिमटा घेतला अन छान वाजवत बसला. (मुलाचे दुसरीकडे लक्ष कसे वळवावे याचे हे सुंदर प्रत्यंतर पाहिले)

झलक चार : अधून मधून मी त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या अन माझ्या व्हिजिटिंग कार्डच्या मागे दोन ओळी लिहून कार्ड त्यांना दिले. चालत्या बसमध्ये आपण चार ओळी पण नीट लिहू शकत नाही. हेही आज उमजलं. इतकं अक्षर बेक्कार आलेलं. तर त्यांनी ते वाचल्यावर मी हाताने "सलाम" केला. त्या थोड्या हसल्या अन कार्डच्या मागे माझा फोटो व इतर मजकूर असतो तो वाचू लागल्या. अन मग बाळाला त्यांनी कार्डवरील माझा फोटो दाखवून काहीतरी हळूच बाळाच्या कानात बोलल्या. त्यावर ते बाळ एकदा कार्डकडे व एकदा माझ्याकडे पाहायला लागलं अन दोन मिनिटांनी खुद्कन गोड हसलं. आता ते कार्ड त्याला हातात धरून हवं होत. त्यासाठी हट्ट सुरु झाला. आली का आईला पंचाईत. कारण कार्ड चुरगाळेल किंवा अजून काहीतरी होऊन खराब होईल म्हणून बाळाच्या हातात तर कार्ड द्यायच नव्हतं तर पुन्हा तेच "लक्ष वळवण्याचे" स्किल वापरून बाळाला त्यांनी खिडकीतून बाहेरचे बोटाने दाखवत "तो बघ पक्षी" असं म्ह्टल्यावर बाळाने बाहेर बघण्यासाठी मान वळवताच मॅडमनी ते कार्ड पटकन खाकी कोटाच्या वरच्या खिशात टाकून दिले. बात खतम!

त्याही बहुतेक ड्युटी करून थकल्या असाव्यात म्हणून त्यांनाही थोडं रिलॅक्स व्हायचं असाव मात्र बाळ इकडे तिकडे धडपडू नये अशा रीतीने मॅडमनी त्याला हाताची गुंफण टाकली व रिलॅक्स होण्यासाठी डोके टेकवले. मी नंतर मोबाईलवर "चार्ली चॅप्लिन चा मॉडर्न टाइम्स" सिनेमा पाहत बसलो. स्वारगेट आलं! मी उतरताना पुन्हा एकदा "सलाम" केला अन निघालो !

अन लक्षात आलं की गप्पाच्या नादात त्याचे नाव विचारायचेच विसरलो. आता सांगोला येथील कुणी असेल मित्र यादीत तर त्यांच्यापर्यंत हि पोस्ट पोचली तर मलाही थोडं समाधान मिळेल !

डीडी क्लास : आज विशेष वेगळं काय सांगू? सगळं वरती आलेलं आहेच. असं काहीच नाही की "जवळच्या प्रेम" करणाऱ्यालाच काहीतरी द्यावं किंवा शुभेच्छा द्याव्या तर असं ड्युटीवर असताना मातृत्व हि कसरत करताना आनंदी चेहरा ठेवणाऱ्या त्या मातेच्या "बालप्रेमाला" देखील आज शुभेच्छा देऊया की! अन त्यासाठी आजचा एकच दिवस कशाला? वर्षभर असा व्हॅलेंटाईन होऊ शकतो. इतरांच्या जीवनात थोडेफार क्षण आनंदाचे देऊ शकतो. आज नियतीने मला हि संधी त्या महिला कंडक्टर मुळे मिळाली.

तुम्हालाही कुठे न कुठे कंडक्टरच असे नव्हे तर असं वेगळं खास काही दिसलं तर शुभेच्छा बिनधास्त द्या! फक्त त्यात प्रामाणिकपणा दिसला पाहिजे बास!

- धनंजय देशपांडे

Updated : 18 Feb 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top