Home > Max Woman Blog > पप्पा माझ्या मम्मीचे : ज वी पवारांना लेकीच्या अनोख्या शुभेच्छा

पप्पा माझ्या मम्मीचे : ज वी पवारांना लेकीच्या अनोख्या शुभेच्छा

आपल्या सर्वांना "दलित पॅंथर" म्हणून परिचीत असलेल्या ज वी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेक ॲंजेला पवार हिने शुभेच्छा देताना पॅंथर चा तुम्हाला माहित नसलेला स्वभाव खास शैलीत मांडलाय…. वाचा

पप्पा माझ्या मम्मीचे : ज वी पवारांना लेकीच्या अनोख्या शुभेच्छा
X

पप्पांचा आज वाढदिवस. त्यांचा वाढदिवस म्हणजे शुभेच्छांची नुसती मुसळधार बरसात. ते साहजिकच आहे म्हणा. आंबेडकरी चळवळीतील जुने जाणते नेते, कार्यकर्त्यांपासून ते आजचे सर्व गटांमध्ये विभागले गेलेले कार्यकर्ते, नेते आणि "दलित पॅन्थर" सह समग्र चळवळींचे अभ्यासक यांच्यासाठी एक आधारवड असलेले पप्पा म्हणजे ज. वि. पवार यांचा वाढदिवस म्हणजे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. आज पप्पांना ७६ वर्षं पूर्ण झाली. मम्मी शिवायचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस. आजवर तिच्या भक्कम पाठींब्यावर त्यांनी मैदानं गाजवली पण २९ जानेवारी २०२१ रोजी ती म्हणजे जयमाला पवार आम्हाला सोडून गेली आणि पप्पा खूप एकाकी झाले आहेत. यातच कोरोनामुळे त्यांना घरात अडकून पडावं लागत आहे. हे एकाकीपण कोणीही दूर करू शकत नाही पण आपण थोडा खुसखुशीतपणा नक्कीच आणू शकतो. त्यातीलच हा एक छोटासा प्रयत्न. यातून कदाचित तुम्हालाही पॅन्थरचं एक वेगळंच खवय्या रूप दिसेल.

मम्मीने पप्पांचा मूड नेहमीच जपला. लग्नाच्या आधीपासून ती त्यांना ओळखत असल्यामुळे "पॅन्थरची भूक मोठीच असते, मग ती चळवळीची असो की खाण्याची", हे तिला पक्क कळून चुकलं होतं. मंत्रालयात नोकरी करताना तिचा अनेक स्तरातील आणि विविध जातीतील स्त्रियांशी संबंध यायचा. जेवणाच्या वेळी त्यांच्या डब्यांची देवाणघेवाण व्हायची. त्यामुळे टिपिकल कोकणी जेवण बनवणारी माझी मम्मी हळूहळू सर्व प्रकारचे पदार्थ बनवू लागली. माझी आजी म्हणजे पप्पांची आई, "माझी सून बामनासारखी जेवण बनवते", असं म्हणायची. मम्मी वेळ मिळेल तेंव्हा वेगवेगळे पदार्थ बनवायची आणि "केलं जमलं तसं" या अर्थाचा "दिलं डपरवून" हा तिने शोधलेला खास शब्दप्रयोग करायची. ती किचनमध्ये जेवणा व्यतिरिक्त काही करत असली की पप्पांना त्याचा वास यायचा. मग हातातलं काम बाजूला सारून ते "कशाला काय बनवत बसतेस" म्हणत किचनमध्ये यायचे. मम्मी म्हणायची, "आला का वास पॅन्थरला?" मग तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिने तळून काढलेले गरमागरम भजी "हुश्श हुश्श" करत दोन्ही हातांच्या ओंजळीत आलटून पालटून घेऊन हॉलमध्ये बसून एकेका भजीचा आस्वाद घेऊ लागत. "प्लेट तरी घ्या," हे आर्जव सुद्धा बाउन्सर जायचं त्यांना. मम्मीचा स्पीकर आतून सुरु व्हायचा, "कशाला कशाला म्हणायचं, आणि गुपचूप घेऊन पळायचं!" हा सीन मी अनेकदा बघून खो खो हसले आहे.बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी आणि बौद्ध धम्माचे पाईक असून सुद्धा काही बाबतीत ह्या दोघांनीही कट्टरपणा ठेवला नाही. दिवाळी साजरी करायची नाही हे ठरलेलंच होतं. पण आपण मिश्र वस्तीत राहतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांची फराळाची ताटं येतात, मग ती मोकळी किंवा मग साखर टाकून परत करावी लागतात. शिवाय मुलांना सगळीकडून फराळाचा सुगंध येतो, त्यांना खावंसं वाटतं म्हणून मम्मी दिवाळीत सगळा फराळ करायची. त्यात पण मला आणि पप्पांना तिच्या चकल्या आणि पोह्यांचा चिवडा खूप आवडायचा. पप्पा अगदी "कुडुमकुडुम" करत चकल्या खायचे. दिवाळी शिवाय सुद्धा मम्मी चकल्या, लाडू, शेव, चिवडा, शंकरपाळ्या बनवायची. पप्पा घरी असले की त्यांना खायला काही ना काही लागतं. त्याची ही सगळी सोय असायची. त्यांच्यासाठी म्हणून खास मेथीचे, बेसनाचे आणि रव्याचे लाडू ती हमखास करून ठेवायची. घरी दर रविवारी चिकन किंवा मटण पप्पाच आणायचे आणि स्वत:च हॉलमध्ये विळी घेऊन बसायचे आणि कापून द्यायचे, तेच साफ करून ठवायचे. पुढली सगळी प्रक्रिया मम्मीची. पण मटण असलं की ते उकडवून त्याच्या पाण्याचं सूप मुलांना प्यायला देण्याची जबाबदारी पप्पांची.

पप्पांना सर्व प्रकारचे मांसाहार आवडतात. मटण, चिकन, मासे, वजडी, कलेजी सर्व काही. पप्पांच्या मोठ्या भावाची मुलगी म्हणजे आमची विजूताई वजडी छान बनवते म्हणून ते डिपार्टमेंट तिच्याकडे आहे. माझी बहिण अस्मिता काळे हिच्याकडे पाणीपुरी, भेळपुरीचं तर माझ्याकडे मीरा भाईंदरमध्ये मासे चांगले मिळतात म्हणून माश्यांचं डिपार्टमेंट आहे. (जेवणाचा मुळातच कंटाळा असल्यामुळे हे काम मी फारच रेअर करते). पण पप्पांची खवय्येगिरी आज जर कोण खऱ्या अर्थाने जोपासत असेल तर ती आहे आमची वहिनी दर्शना. इथे उल्लेख करण्यासाठी मी तिला वहिनी म्हटलं, नाहीतर ती माझी पोस्ट ग्रॅज्युएशन पासूनची मैत्रीण आहे. माझ्याकडे अभ्यासाला यायची तेंव्हा कधीतरी माझ्या भावाने म्हणजे तेजविलने तिला पटवलं. परिणीत होऊन ती आमच्या कुटुंबात आली आणि पप्पांच्या खवय्येगिरीला जणू काही फोडणीच मिळाली!

दर्शनाचं माहेर पालघरचं, त्यामुळे माश्यांचे पदार्थ आणि इतर मांसाहाराची त्यांच्याकडे मांदियाळी असते. स्वत: शिक्षिका असून सुद्धा तिला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि ती नेहमी वेगवेगळे पदार्थ करत असते. मम्मी असताना रोज दोघींची "आजच्या मेन्यू" वर चर्चा व्हायची. कामं आणि वेळ वाटून झाली की दोघी कामाला लागायच्या. आज मम्मी नसताना दर्शना मम्मी करायची ते सर्व पदार्थ करते. तिला रोजच्या पदार्थांसोबत कॉन्टीनेन्टल पदार्थही चांगले जमतात. पप्पांना ही नव्या पदार्थांची हौस असल्यामुळे ते आनंदाने त्यांचा आस्वाद घेतात. तिच्या पाक कौशल्यामुळेच लॉकडाऊनचा हा कठीण काळ आणि मम्मीची अनुपस्थिती सुसह्य झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आज पप्पांच्या वाढदिवसाला मम्मी असती तर तिने खीर किंवा बासुंदी स्वत: केली असती. पप्पा मम्मीला "जयो" म्हणायचे. कोणताही पदार्थ खाताना "जयो हा पदार्थ असा बनवायची, तसा बनवायची" अशी तिची आठवण ते हमखास काढतातच. कदाचित त्यांच्या मनात असलेल्या पोकळीमुळेच त्यांनी पदार्थ खाल्ले तरी "मी खाल्लं थोडसं," असं उदासीने म्हणतात. इतक्या वर्षात जिभेवर चढलेला मम्मीच्या हातांचा अरोमा आता नसल्यामुळे त्यांचं पोट भरलं तरी बहुधा त्यांचं मन भरत नसावं. पण दर्शनाकडे ते हक्काने पदार्थांची मागणी करतात. दर्शना सुद्धा न कंटाळता त्यांना हवं ते सर्व करते. मम्मीची पोकळी भरून काढण्यासाठी ते आवश्यकही आहे. तनिष्का, अद्विता आणि रेयांश ही तिन्ही नातवंडे पप्पांना एकटेपणा जाणवू देत नाहीत. कॅन्सरशी शेवटची झुंज देताना सुद्धा मम्मीने पप्पांसाठी एक स्वेटर विणला. त्या स्वेटरप्रमाणेच तिच्या आठवणी सुद्धा उबदार आहेत. पप्पांकडे तर आठवणींचा खजिना आहे. या आठवणींसोबत जगण्यासाठी त्यांना बळ मिळो आणि त्यांना आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा!


Updated : 2021-07-16T15:32:49+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top