Home > Max Woman Blog > आपल्या "आत" आपण प्रेशर कुकर जन्माला घालतोय

आपल्या "आत" आपण प्रेशर कुकर जन्माला घालतोय

कोरोनापेक्षा ही वेगाने वाढणारा मानसिक तणाव रोग... अपेक्षाचं ओझं तुमच्या आयुष्यात प्रेशर कुकरचं काम करतायेत का? तुम्ही कोणाच्या अपेक्षांच्या जाळ्यात अडकलेले आहात का? तुमचं मन मोकळं करून आयुष्याला हाय-हाय आणि नैराश्याला बाय-बाय करणारा धनंजय देशपांडे यांचा हा लेख नक्की वाचा..

आपल्या आत आपण प्रेशर कुकर जन्माला घालतोय
X

केवळ हल्लीच्या लॉकडाऊनमुळेच नव्हे तर त्याच्या आधी सुद्धा आपल्यापैकी अनेकजण एका मोठ्या विकाराचे रुग्ण झालेलो आहोत. तो विकार (रोग) म्हणजे, "मी समोरच्याच्या मनासारखं कितीही चांगलं वागलो/वागले तरी उपयोग होत नाही. त्रासच होतो"

खरेतर ही तक्रार घेऊन मला भेटायला येणाऱ्यांची संख्या कमी नाही. जमेल तसे त्यांना सांगतही असतो. तर या सर्वात मोठ्या प्रमाणावर (कोरोना पेक्षाही वेगाने) वाढणाऱ्या या रोगावर आज तुमच्याशी बोलावंसं वाटलं. म्हणून हा लेखप्रपंच.

तर होत काय की, समोरची व्यक्ती आपल्यावर विनाकारण रागावली तर सहसा काय घडतं? आपणही एक तर त्याच्यावर चिडतो, किंवा आपल्या वागण्याचे स्पष्टीकरण देत बसतो. पण मुळात समोरची व्यक्ती "आपली" असेल तर तिला स्पष्टीकरणाची गरज नसते. अन् बाकीचे जे असतात त्यांना कितीशी स्पष्टीकरण दिलं तर त्यांना ते पटवून घ्यायचंच नसतं. मग उगीच डोकेफोड का करायची न?

गडबड अजून एक कुठं होते माहितीय ? तर समजा नवरा बायकोत वाद झाला. तर अशावेळी त्याच्या जवळचे की हितचिंतक दोघांपैकी एकाला सल्ला देतात की,

"तू शांत राहा, थोडं सहन कर ना. नंतर होईल व्यवस्थित सगळं" 

आणि आपणही ते मान्य करून "सहन" करण्याच्या मोड वर जातो. आणि असेच सतत मनात साठवत राहिलो की, "मी किती सहन करतोय / करतेय," हा नवीन त्रास सुरु होतो. तो त्रास जास्त धोकादायक. इथेच तुम्ही तुमच्या आतमध्ये एका प्रेशर कुकरला जन्माला घालता. आतमध्ये वाफ कोंडत राहते. कोंडत राहते. आणि कोंडतच राहते.

शेवट काय होणार मग ? तर जसे प्रत्यक्षातल्या कुक्करला जर वाफ बाहेर सोडणारी शिट्टी (व्हॉल्व) नसता तर कुकर तीन ताड उडून फुटते. नुसतं ते एकटं फुटून उडत नाही तर भोवती असलेल्या भांड्याकुंड्यांना पण त्याचा दणका बसतो. अगदी तसेच आपल्या आत सहनशीलतेच्या नावाखाली नको ते कोंडत राहिल्यावर एक न एक दिवस आपण आतून फुटणार अन ते फुटणं मग सगळंच उध्वस्त करतं.

आपल्यालाही अन समोरच्यालाही. काही नातीच्या नातीच नष्ट होऊन जातात. फुटलेला कुकर जसा फेकून दिला जातो, पुन्हा तो दुरुस्त होत नाही, अगदी तसेच एकदा का जवळची नाती तुटली की, ती पुन्हा कधीच दुरुस्त होत नाहीत. पहिल्यासारखी राहत नाहीत.

म्हणून मनाविरुद्ध असलेलं केवळ मनात साठवलं म्हणजे सगळं आलबेल होईल. हे चूक आहे. त्याला सहनशक्ती म्हणत नाहीत. तर त्याला घुसमट म्हणतात. हीच घुसमट तुमच्या आतमध्ये "प्रेशर कुकर" जन्माला घालते.

मग आता यावर उपाय काय ? तर नक्की उपाय आहे. सहन करणे एकवेळ ठीक आहे. पण ते मनातून आपण समजून घेऊन मगच सहन करावे. गप्प बसणे म्हणजे शहाणपण नाही. तर आतून आपण शांत असणं हे खरं शहाणपण. कारण आपण फक्त शांत बसलो, गप्प राहिलो. पण मनातून समजून घेण्याची प्रोसेसच केली नाही तर काय होईल ? आतमध्ये ते सगळं साठत राहील. आणि मग पुढच्या वादाच्या वेळी हे साठलेलं मागचं सगळं उकरून काढून एकमेकांना प्रचंड बोचकारले जाते. वास्तविक कदाचित पुढच्या वेळचे भांडणाचे कारण अगदी क्षुल्लक असू शकते. मात्र, मागचं सगळं स्फोट होऊन बाहेर येत अन् त्या स्फोटात मग नातं जळून जातं.

म्हणून घरामध्ये जसे काहीवेळा ठराविक वेळेवर कुकरची शिट्टी झाली नाही तर चमचा / पळीने आपण कुकरच्या शिट्टीला थोडं वर उचलतो अन् मग पटकन आतली वाफ बाहेर येणं सुरु होतं.

अगदी असेच आपल्या आत नको ते सगळं "गप्प" बसून साठवलेलं असतं ते उलट एक तर आत साठवूच नये. अन् जर साठलंच तर अधून मधून ते सगळं बाहेर रिलीज करावं. म्हणजे मग स्फोट होत नाही.

आता मूळ मुद्द्यावरचा उपाय सांगतो. की, समोरचा आपल्याला त्रास देतोय, मनासारखा वागत नाहीय. हे सगळं आपल्याला पटत नसतं. कारण आपण बरोबर आहेत अन समोरचा चूक आहे. यावर आपण ठाम असतो. तेच यापुढं टाळायचं.

ऍक्सेप्टन्स (स्वीकार) जितका जास्त तितका आनंद वाढतो. अन एक्स्पेक्टशन (अपेक्षा) जितक्या जास्त तितका आनंद घटत जातो. ज्याचे प्रमाण वाढवाल तितके तेच वाढणार. स्वीकार वाढवला तर आनंद वाढणार, अपेक्षा वाढवल्या तर दुःख वाढणार. लोकांनी मला मी जसा आहे तसे स्वीकारावे. हा हट्ट म्हणूनच चुकीचा!! तर लोकांना मी ते जसे आहेत तसे स्वीकारावे. हे आपल्यासाठी जास्त लाभदायी ठरते. आपला त्रास कमी होतो. आपल्या जगण्यात आनंद व समाधान वाढते.

मी अमुक काही केलं तर समोरची व्यक्ती मला स्वीकारेल, असं म्हणून कोणतेही काम करू नये. म्हणजे समजा नवऱ्याने घरी जाताना बायकोसाठी काहीतरी गिफ्ट नेलं तर ती खुश होऊन मस्त जेवण बनवेल. असं नको. कारण ती एकवेळ खुश होईलही पण जेवण चांगले मिळेल ही नवऱ्याची अपेक्षा ! ती गडबड करते. किंवा बायकोनेही तिला आवडत नसला तरी नवऱ्यासोबत त्याच्या आवडीच्या सिनेमाला जाणे, हेही चूक.

मनाचा कोंडमारा करून आनंद कधीच मिळत नाही. काहीजण याला "तडजोड" असा गोंडस शब्द जोडतात. संसार म्हटलं की तडजोड आलीच, हे वाक्य जुन्या पिढीने वारंवार आपल्या मनावर बिंबवले आहे. तडजोड करा न ! त्यात वाईट नाही. पण ती तडजोड "मनातून पटलं आहे" या मोडवर असेल तरच नातं टिकेल. नाहीतर मन मारून वरवर "सुखी जोडपं" असं चित्र उभं करण्यात अर्थ नाही. त्या ऐवजी समोरच्याची अमुक एक इच्छा का आहे? हे आपण समजून घेतलं तर नक्की आपल्या मनाची घुसमट होत नाही. कारण प्रत्येकाची आवड निवड ही त्याच्या आजवरच्या लहानपणापासूनच्या जडणघडणीत असते. आणि संसारात तर दोन भिन्न कल्चरमधून आलेल्या दोन व्यक्ती असतात.

त्यामुळे आवड निवड / मतं वगैरे वेगळं असणार. हे गृहीत धरलं तर मनातून सगळं समजून घ्यायला सोपे जाते. समोरच्याने तुम्हाला एक्सेप्ट करावे असं म्हणण्यापेक्षा आपण आधी स्वतःला एक्सेप्ट करणं महत्त्वाचं. हे करण्यासाठी सहनशक्ती लागते. ती एकदा का सापडली की ती शक्तीही वाढवत नेता येते. मग इतरांकडूनच्या अपेक्षांचे ओझे कमी होऊ लागते.

आपण समोरच्याला बाहेरून टॉलरेट करतो. मनातून नाही करत. याचा त्रास जास्त होत असतो. मग त्यातून निराशा, चिडचिड, रागराग हे इतर रोग वाढीला लागतात. ज्याचा त्रासही आपल्यालाच होतो. समोरचा निवांत ऑफ इंडिया बँकेचा जणू मॅनेजर असतो.

डीडी क्लास: बहुतेक सगळं वरती सांगून झालं आहे. वेगळं काय सांगू? इतकंच सारांशाने सांगतो की, समोरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही तुमचा मनात ठराविक एक फ्रेम तयार करून त्यात बसवू नका. कारण ती व्यक्ती तशी नंतर नाहीये हे कळलं तर तुमचा भ्रमनिरास होतो. गुलजारजी यांचे एक फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात,

"माझा पुतळा कधीच करू नका. कारण एकदा का पुतळा केलात तर मग मला चूक करण्याची संधी मिळणार नाही. मी अजून काम करतोय. त्यात चुका होऊ शकतात मग त्यावेळी तुम्ही म्हणाल की "गुलजार साब ने ये क्या किया?"

किती मार्मिक बोलले न गुलजार !

तसेच आपण समोरच्याबद्दल फिक्स अशी प्रतिमा तयार करू नये. तो जसा आहे तसा स्वीकारावा. मात्र, त्या आधी आपण स्वतः कसे आहोत? बिनचूक आहोत का ? आपलं कधीच चुकलं नसेल का ? हेही विचार करून स्वतःला स्वीकारावे. मग पहा, जगणं सोपं होतं. हे जे आतमध्ये कुकर जन्माला घालतोय न तोच आपण बंद करूया. आजपासून ! त्यासाठी शुभेच्छा आहेतच.

- धनंजय देशपांडे

लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत

Updated : 1 April 2021 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top