Home > Max Woman Blog > The Lockdown: निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा ट्रेलर

The Lockdown: निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा ट्रेलर

The Lockdown: निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा ट्रेलर
X

मी अजून नोकरी आणि गिर्यारोहण करण्यात पूर्णपणे कार्यरत आहे आणि त्यामुळे आठवडाभर कामात- घरातल्या बरोबर आणि रविवार सह्याद्रीच्या खुशीत असे मस्त दिवस जात होते. पण कोरोनामुळे घरात बसायची वेळ आली आणि निवृत्ती नंतर आपले आयुष्य कसे असेल याची थोडक्यात प्रचिती झाली.

गावाकडे आणि काही प्रमाणात शहरात आजही पारंपारिक भारतीय पद्धतीप्रमाणे मुलं, सुना, नातवंडे हे सगळे आजी आजोबांसकट एकाच छताखाली राहतात. त्यामुळे आजी आजोबांना नातवंडांचा सहवास लाभतो आणि नातवडां वर चांगले संस्कार देखील होतात. शहरी भागात/मेट्रो सिटी मध्ये तरी विभक्तीकरणाच्या प्रक्रियेने चांगलेच मूळ धरलेले असल्याने अशी पारंपारिक कुटुंबे फार कमी प्रमाणात दिसतात. विभक्त कुटुंबांचे प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. समाजातील या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

पण ह्या सर्व समस्यां आता पुन्हा प्रकर्षाने जाणवायला सुद्धा लागल्या आहेत. जे ज्येष्ठ नागरिक सध्या एकटे राहत आहेत, त्यांना ह्या प्रसंगी मदतीला घरचे येऊ शकत नाहीत. शेजारी कितीही मदत करत असले तरी ह्या वयात मानसिक आधार देण्यासाठी घरातलेच लागतात. त्याची सल त्यांना खुपत असणारच.

मला वाटते आपण म्हणजे तरुणवर्ग (३५/४९ मधील वर्ग) खूप नशीबवान आहोत. सध्या कोरोना मुळे का होईना आपल्याला एक उत्तम संधी मिळाली आहे. निवृत्ती नंतरचे आपले आयुष्य हे कसे असेल ह्याचा एक ट्रेलर आपण गेले. २०/२१ दिवस पाहत आहोत आहे असे म्हणायला हरकत नाही.

थोडक्यात काय तर उतारवयात आपल्याला चालता येत नाही म्हणून आपण घराबाहेर पडत नाही, एवढाच काय तो फरक बाकी जीवनावश्यक वस्तू साठी घराबाहेर जावे तर लागणारच!

आजकाल शेजाऱ्यांबरोबर आपले संवाद खुपच वाढले आहेत. सोसायटी मध्ये राहणाऱ्या वृद्ध किंवा एकट्या राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आपण सहकार्य करत आहोत. मला वाटते आपण खूप दिवसांनी फक्त माणूस म्हणून जगत आहोत. नाहीतर इतर वेळेस आपण आपले व्यावहारिक पदाचा गाजावाजा करत असतो.

पण आता आपण इंजिनिअर, वरिष्ठ अधिकारी, मंत्री, नेते असे कोणी नसून फक्त एक असह्य, हतबल माणसं आहोत. ज्याला जगण्यासाठी घरात बसून रहायला भाग पडले आहे. यात डॉक्टर, मेडिकल क्षेत्राशी निगडित व्यक्ती, पोलिस, आर्मी तसेच सर्व अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांचा समावेश नक्कीच नाही.

मी माझा अनुभव सांगतो, आजही मी आई-वडिलांसंगती राहतो त्यामुळे मला त्यांच्याशी खूप बोलायला मिळते.

त्यांच्याशी बोलताना विषय निघाला तेव्हा त्यांनी सांगितले, त्यांना निवृत्ती नंतर खूप काही करायचे होते, पण त्याचे नियोजन करायला संधी त्यांना मिळालीच नाही. आईचा आजार, आम्हा भावडंचे शिक्षण- लग्न, त्यातून माझे गिर्यारोहणाचे वेड या अश्या खूप अडचणींमुळे त्यांना त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत.

पण, वडील मला म्हणाले तुला एक संधी मिळाली स्वतःच्या निवृत्ती नंतरच्या आयुष्याची पुनर्बांधणी करण्याची म्हणजे तसा मला अजुन बराच अवधी आहे निवृत्त होण्यासाठी पण जे आजकाल निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत अशा ज्येष्ठ जोडप्यांसमोर एक संधी आहे निवृत्तीनंतर येणार्‍या काळात आपल्या रिकाम्या वेळेचे नियोजन कसे करायचे याचा विचार करण्याची?

हा एक मोठा प्रश्न नेहमीच आ वासून उभा राहतो आहे.

पारंपारिक/ एकत्रित कुटुंब पद्धतीत हा प्रश्न सहसा येणार नाही. कारण आजी-आजोबांचा घरातील नातवडांबरोबर खेळण्यात चांगला वेळ जातो. तसेच आपण नोकरी धंदा करायला मोकळे. परंतु समाज रचनेतील नव्या बदलांमुळे हा प्रश्न एका मोठे स्वरूप घेऊन आपल्यासमोर उभा राहिलेला आहे यात मला तरी शंका वाटत नाही.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेली बहुतेक, निदान मध्यमवर्गीय जोडपी तरी, अलीकडे निवृत्तीनंतरच्या काळाचे आर्थिक नियोजन बर्‍याच आधीपासून करून ठेवताना दिसतात. यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्यासमोर मोठी आर्थिक अडचण सहसा उभी रहात नाही.

माझ्या परिचयातील/ सोसायटी मध्ये ६० ते ८० या वयोगटामधील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनशैलीचे निरीक्षण केले तर एक वैशिष्ट्य नेहमी मला जाणवले आहे. या सर्व व्यक्ती अत्यंत कार्यरत असतात. संपूर्ण दिवस ते कोणत्या ना कोणत्या कामात गुंग असतात. माझ्या मताने, निवृत्तीनंतर सुखी आणि समाधानी आयुष्य घालवण्याची ही गुरूकिल्लीच आहे असे समजले तरी चालण्यासारखे आहे.

पण, आता मला काय कार्य करता येईल? हा विचार निवृत्त झाल्यावर एखाद्या व्यक्तीने करण्याचे ठरवले तर योग्य असे काम त्या व्यक्तीला सुलभतेने मिळणे शक्य नसते. आपण निवृत्तीनंतर काय करणार? याचा विचार निवृत्तीच्या बर्‍याच आधीपासून, म्हणजे निवृत्तीचे विचार मनात प्रथम घोळू लागल्याच्या दिवसापासून करणे गरजेचे असते.

मी माझे स्वत:चे उदाहरण येथे देऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून मला पुढे ज्यावेळी खूप रिकामा वेळ असणार आहे तेंव्हा करता येण्यासारख्या माझ्या आवडीच्या गोष्टी किंवा ज्या करणे आतापर्यंत कधीच जमले नाही परंतु करण्याची प्रचंड इच्छा आहे अशा गोष्टी, यांची एक यादीच मी बनवली आहे.

निवृत्त झाल्यानंतर केलीच पाहिजे अशी एक गोष्ट म्हणजे हास्य क्लब किंवा मित्रांसमवेत दिवसाचा काही काळ घालवणे यासारख्या ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटीज. एखाद्या चहा किंवा कॉफीच्या कपासोबत टपरी/कट्टया वर बसून मित्रांशी गप्पा मारणे हेही यातच मोडते. अशा प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीमधून ज्येष्ठांना जो आनंद मिळतो किंवा जीवन जगण्यासाठी जो उत्साह मिळतो त्याचे वर्णन करणे सुद्धा शक्य नाही. मी अशा प्रकारची ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटी प्रत्येक जेष्ठाने करणे अत्यावश्यक आहे असे मानतो आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येकाने ही अ‍ॅक्टिव्हिटी कशी सुरू करता येईल हे बघितलेच पाहिजे.

माझी खात्री आहे की निवृत्तीच्या पुरेशा आधीपासून योग्य नियोजन केलेली निवृत्तीची वर्षे ही प्रत्येकाच्या आयुष्याचा सुवर्णकाल बनू शकतात.

म्हणून मला वाटतं अजून आपल्याकडे 10 दिवस बाकी आहेत लॉकडाऊन समाप्त होण्यासाठी. तो पर्यंत आपण घरात राहूया, शासनाने सांगितलेल्या नियमाचे पालन करूया आणि निवृत्ती नंतर काय ह्या प्रश्नाचं उत्तर शोधुयात...

-वैभव ऐवळे

Updated : 24 April 2020 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top