Home > Max Woman Blog > कोरोनाग्रस्तांसह मृत्यूच्या छायेत जगताना : कोव्हिड योद्ध्याचा भयावह अनुभव

कोरोनाग्रस्तांसह मृत्यूच्या छायेत जगताना : कोव्हिड योद्ध्याचा भयावह अनुभव

आयुष्य जगतांना ,कोरोनाकाळात योगदान दिल्याचं समाधान ,नेहमीच जगण्याचं बळ देत राहील हे शब्द आहेत कोव्हिड योध्दे संदिप देवरे यांचे. ज्यावेळी कोव्हिड १९ भारतात ज्वालामुखीच्या लाव्हारसासारखा पसरत सगळं काही आपल्या कवेत घेत होता त्यावेळी लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण मुंबई, पुणे ही शहरं सोडून आपापल्या राज्यात जात होते. या सर्व वाटसरूंसाठी काम करताना आलेला भयावह अनुभव संदिप देवरे यांनी शेअर केला आहे तो आपण एकदा वाचायलाच हवा.

कोरोनाग्रस्तांसह मृत्यूच्या छायेत जगताना : कोव्हिड योद्ध्याचा भयावह अनुभव
X

(टीप : लेखकाने सदर लेख २४ मे २०२० रोजी लिहिला आहे.)

काल धुळ्याच्या प्रवासी राहत शिबिरात एका ४८ वर्षीय चालता - बोलता वावरणाऱ्या व्यक्तीस कोरोनामुळे प्रत्यक्ष डोळ्यांसमोर मरताना पाहिलं. मी व डॉ अभिनय आम्ही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला परंतु डॉक्टरांना लक्षात आले की हा सर्व प्रकार कोरोनामुळे होतोय व आम्ही काही अंतरावरच उभे राहीलो. आमच्यासह सर्व लोक शुन्य नजरेने हे सर्व बघत राहीले व १०-१५ मिनिटांत त्या माणसाचे मृत शरीर स्थिरावलं. काही सुचत नव्हतं. प्रचंड अस्वस्थता वाढली होती. आपल्यासमोर एखादी व्यक्ती श्वास घेता नाही म्हणून तडफडून मरते आणि आपण साधं जवळही जाऊ शकत नाही. भयंकर प्रसंग होता तो.... डॉक्टर तर घरी जाऊन रडलेत कारण त्यांच्याही आयुष्यात असा पहिलाच प्रसंग की ते डॉक्टर असुनही पेशंटला स्पर्श करु शकले नाहीत.


मृतव्यक्ती बंगालचा होता. त्याच्या सोबत कुणीही नव्हतं. समोर रांगेत शेकडो बंगाली लोकही होते पण त्याला कोणीच ओळखलं नाही. कदाचित त्यासोबत काहीजण असतीलही पण समोर कुणी आलंच नाही. कुणीही कुणाचं नसतं हेच शाश्वत सत्य आहे. ४ तासांनी त्याचा मृतदेह सरकारी दवाखान्यात गेला व दुसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला. तशी अस्वस्थता वाढली. त्या व्यक्तीचे वाट पाहणारं कुटुंब त्याला कधी भेटेल? निदान त्याची गावी जाऊन मरण्याची इच्छा तरी पुर्ण झाली असती. असे अनेक विचार मनात आले आणि मी स्तब्ध झालो.


गेल्या १५ दिवसांपैकी सुरवातीचे पाच दिवस यंग फाऊंडेशनची रविंद्र बोरसे, प्रकाश, वृषभ, आभिनव, मनिष यांची टीम. तर अधुन - मधुन महेंद्रभाऊ व वर्धमानभाऊही येत. नंतर पुर्णवेळ या रिलीफ सेंटरमध्ये एकटाच थांबतोय. लाखो लोक येथे येऊन गेलेत. सतत त्यांच्याशी बोलुन, त्यांना गावी जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन करत संवाद सांधला. येणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्यथा - वेदना होत्या. त्यांचं सांत्वन करतांना कोरोनाचा विचारही डोक्यात नव्हता. फक्त या लोकांनी त्यांच्या गावी नीट पोहचावं ऐवढाच विचार होता. या दरम्यान हजारो कोरोनाग्रस्त लोकही येऊन गेलेत, हे कळालही नाही. धुळ्याच्या आजुबाजूला या दरम्यान जे ४-५ अपघात झाले या प्रत्येक अपघातातील जखमी / मृत व्यक्तीची चाचणी ही कोरोना पॉझिटिव्हच होती यावरुन अंदाज येतो की,किती मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्तांचा प्रवास झालाय. या सर्व लोकांमध्ये गर्दीत मिसळतांना हे कधीच जाणवलं नाही पण कालच्या घटनेने कोरोनाची तीव्रता मात्र जाणवली. किती भयंकर आजार आहे हे ही कळलं.


मेधाताईंसह अनेक कार्यकर्त्यांनी, मित्रांनी मला संदर्भात वेळोवेळी काळजी घेण्यास सांगितले. पण कितीही काळजी घेतली तरी दररोज येणाऱ्या हजारो लोकांमध्ये धोका होताच. ९ मे ला ज्या दिवशी हे रिलीफ सेंटर सुरु झालं त्याच दिवशी हे ठरवुन घेतलं होतं की, जीव गेला तरी चालेल पण हे काम करत राहायचं. कारण या दरम्यान मी दोन वेळा मुंबईवरुन जाऊन परत येतांना पायी चालणाऱ्या लोकांचे आतोनात हाल बघीतले होते. मला तेव्हापासून वाटत होतं की आपण या लोकांसाठी काहीतरी केलं पाहीजे. राजू शिंदेंच्या दातृत्वाला तर सलामच आहे. स्वखर्चाने मंडप टाकत आतापर्यंत २ लाख लोकांना त्यांनी जेवण दिलंय. मेधाताईंकडे बघुन सावित्रीबाई फुलेंच्या प्लेगच्या साथीत केलेल्या कार्याचे स्मरण झाले. सावित्रीबाईंनी आपल्या प्राणाचे बलिदान देत रोग्यांच्या सेवेचे कार्य केले होते. आपण त्याच सावित्रीबाईंचे वारसदार आहोत हे विसरुन कसं चालेल? असे काम करताना मरण यायलाही नशीब लागतं.


मला मरणाची अजिबात भिती नाही पण माझ्यापासून कोणाला आजार लागु नये याची भिती आहेच. यासाठी लांबच आहे. काळजी घ्यावीच लागते कारण मी कोरोना पेशंट नसलो तरी गर्दीत जात होतो. मी रिलीफ सेंटरमध्ये काम करतोय हे ज्यांना माहीत होते त्यांनी मला तेथे जायला नकारच दिला. काहीं तर मला अस्पृश्यच समजु लागले व काही अचानक बोलणं बंद करत लांब राहु लागले पण मला त्याचं वाईट वाटलं नाही. कारण ते त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी असं करत असावेत. जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा मी नाही तर कोण? आणि आता नाही तर केव्हा? हे दोन प्रश्न स्वतःला विचारायचे असं डॉ अभय बंग आम्हाला निर्माण शिबिरात नेहमी सांगत. म्हणून मी ठरवलं की हे मीच केलं पाहीजे व आताच केलं पाहीजे. नाहीतर आपण सामाजिक मुल्यांच्या गोष्टी करायच्या अन् प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की पळ काढायचा या गोष्टींचं शल्य आयुष्यभर बोचत राहीलं असतं.


अशा प्रकारच्या परिस्थितीत आपल्या आपल्या स्नेहीजनांकडून खूप कमी सपोर्ट असतो. त्यांच्या दृष्टीने हे रिकामे काम असते. रिलीफ सेंटरमध्ये काम करतांना, लोकांचं दुःखणं ऐकून वाटायचं आपणही आपल्या सर्वात प्रिय व्यक्तींसोबत भरपुर बोलुन घ्यावं, भेटून घ्यावं. केव्हा काय होईल, काही सांगता येत नाही. पण कोरोनाच्या अनामिक भितीमुळे हे शक्य नसतं. न कळत अशा वातावरणात मी आयुष्याची गोळाबेरीजही करायला लागायचो. भुतकाळात आपल्यामुळे ज्या लोकांना त्रास झालांय, जे लोक दुखाःवले गेले असतील, अशांची जाहीर माफी मागावी, कुणाशीच वैरभाव ठेऊ नये अशा अनेक कृती कराव्याशा वाटल्या. त्यात आता या मजूर प्रवाशांसाठी केलेले काम अत्युच्च आत्मीक समाधान देतंय हे जाणवत असायचं. म्हणून हे काम करतांना कोरोनाची भिती कधीच जाणवली नाही.


मृत्यू अटळ आहे हे सर्वांनाच माहीत असुनही सर्वचजण मरायला घाबरतात. जेथे मरणाचा धोका आहे तेथे बोटावर मोजण्याइतपत सोडले तर विद्वान, गुरु, धर्मगुरू, नैतिकतेच्या, मुल्यांच्या गोष्टी करणारे सामाजिक - राजकीय कार्यकर्ते सर्वच माघार घेतात. अनेक वर्षे धर्मग्रंथांची तत्वज्ञान लोकांना सांगणारे, देवधर्म सांगणारे, आता मदतीची गरज असतांना गायब झालेत. ते कसे दांभिकपणा करत होते हे पदोपदी जाणवते. अर्थात अनेक अपवादही आहेत. अनेक लोक प्रत्यक्ष येऊ शकले नसले तरी अनेकांनी स्वतःहुन आर्थिक मदत केली. त्यामुळे अनेकांना प्रवासखर्च व ORS मिळाले. लोक यामुळे घरी पोहचले. अजुनही काही मदतीचे हात पुढे येतच आहेत कारण अजूनही खूप गरज आहेच. मला आशा आहे की भारतीय जनता लवकरच कोरोनामुक्त होईल. कोरोनाविरूध्दच्या लढाईत अनेक लोक, डॉक्टर, बस कर्मचारी, पोलीस, बँक कर्मचारी, दुकानदार असे अनेक लोक जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यांच योगदानही मोठं आहेच.

ज्याप्रमाणे भारत - पाकीस्तान फाळणी मानवनिर्मित होती, त्याच प्रमाणे भारत - इंडीयाची फाळणी देखील मानवनिर्मित आहे. भारत - पाक फाळणीत लोक मारले गेले तसे येथेही चुकीच्या निर्णयामुळे लोक व लोकभावना मारल्या गेल्यात. त्या पायदळी तुडवल्या गेल्यात. त्या वैशाख वनव्यात पोळल्या गेलेल्या बालकांना, बाळांतीण -गरोदर महीलांना झालेला त्रास हा भयंकर वेदनादायी होता. या वेदनांवर माझ्या परीने मी फुंकर घालण्याचा प्रयत्न केलाय. गाव व मातीशी जोडलेल्या भावनांनी या लोकांना गावाकडे पायी जाण्याचं बळ दिलं व ते घरीही पोहचलेत.

पुढे काय होईल मला माहीत नाही व त्याची भितीही नाही. पण हे उमगलं की माणसांना खरं तर कोरोनामुळे त्रास नाही. बुध्दांनी सांगीतल्याप्रमाणे मोह - माया व विकारांमुळेच हा त्रास आहे. यामुळेच लोक प्रत्यक्ष कृती करायलाही घाबरतात. म्हणून आपण सर्वचजण बुध्दांनी सांगीतलेला सम्यक व स्वयंप्रकाशाचा मार्ग पत्करला तर या दुःखाच्या अंधाराला दुर करणे शक्य होईल.

तुका म्हणे होई मनाशी संवाद,

आपुलाची वाद आपणांशी !! जिंदाबाद !!

संदीप देवरे

संस्थापक - यंग फाउंडेशन

Updated : 29 May 2022 8:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top