Home > Max Woman Blog > लॉकडाऊन – विवाहित स्त्रीयांचे लैंगिक शोषण

लॉकडाऊन – विवाहित स्त्रीयांचे लैंगिक शोषण

लॉकडाऊन – विवाहित स्त्रीयांचे लैंगिक शोषण
X

नीता (नाव बदलेले आहे) सकाळी सकाळी फोन करून हे लॉकडाऊन ३ मे ला नक्की संपणार आहे का म्हणून वैतागलेल्या सूरात विचार होती. काय झाले म्हणून विचारले तर म्हणाली काही नाही, आता फार वैताग आलाय या सगळ्या परिस्थितीचा. नीता सांगत होती, लॉकडाऊन झालं तेव्हापासून घरात फक्त खायला करायचं आणि नवरा म्हणाला की त्याच्यासाठी तयार राहायचं. नाही म्हणायचं नाही. घरी आहे तेव्हापासून मोबाईलमध्ये काही काही पाहत असतो. सगळं झाल की, मला त्रास देतो. कधी त्याला नाही म्हणयचं नाही. पण शेवटी किती? याला काही मर्यादा आहे का नाही. रोज सकाळी उठायच. दोन मूल, सासू सासरे, नवरा याचं सगळं पाहायचं. घरी आहेत म्हणून वेगवेगळे पदार्थ खाण्याच्या सगळ्या फर्माइश पूर्ण करायच्या. राहिली साहिली सगळी काम करायची. वर्षभराचे धान्य आणून टाकले आहे. त्याला उन्हात टाकायचं. यासाठी दिवसातून दहा वेळा गच्चीवर खालीवर करायचं. मुलांचा पसारा आवरायचा. हे काम करण्यासाठी मदतीला कोणी नाही. ऐरवीही करतचं असते पण आता लॉकडाऊनमुळे माझे घरकामाचे चोवीस तास झालेत. लॉकडाऊनच्या आधी किमान दुपारी थोडी विश्रांती मिळायची पण आता एक काम संपले की, दुसरे तयार असते. घरातले पुन्हा नाराजच असतात. हिला कामाची आवडच नाही. कधी तरी नवरा घरी असतो त्याच्या मर्जीप्रमाणे वागलं तर काय बिघडेल. हे शब्द ऐकायचे. नीता म्हणाली खर सांगू का, मी घरातल्या कामापेक्षाही जास्त वैतागले ते नवर्‍यामुळे. मी त्याला नाही म्हटलं तर तो ऐकत नाही. तू नवर्‍याला नाही कसं म्हणू शकते म्हणून वाद घालतो. म्हणून आता हे लॉकडाऊन संपावे असे फार वाटते.

नीता सारखेच मत अजून काही स्त्रियांनी व्यक्त केले होते. यात घरकाम करणार्‍या उज्वलाने एका वाक्यात सांगून टाकलं, ‘ताई, माणसं दिवसभर कामासाठी बाहेर जातात तेव्हाच बाईला विसावा मिळतो, नाही तर दिमतीला उभचं राहावं लागतय.' कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी घरात राहणे सुरक्षित आहे. पण स्त्रियांसाठी घर खरचं सुरक्षित आहे का? हे आपल्या देशात आहे की इथून तिथे सगळीकडे चित्र सारखेच आहे. या प्रश्नाच उत्तर ग्लोबली स्त्रियांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. हेच कोविड १९ जेंडर रिस्पॉन्स संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाने प्रकाशित केलेला अहवाल सांगतात.

लॉकडाऊनच्या काळात स्त्रियांवर हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊनचा आपल्याला कसा त्रास होतोय यासंदर्भात घानामध्ये एका स्त्रीने स्वत:चा विडिओ पोस्ट करत सरकारला लॉकडाऊन संपविण्याची विनंती केली आहे. ११ एप्रिल रोजी घाना एमएमए या वेबसाइटने ही बातमी प्रसिद्ध केली होती.

संदर्भ १. https://www.ibtimes.sg/exhausted-too-much-intercourse-ghanaian-women-demand-end-coronavirus-lockdown-video-43015

तर याउलट मलेशिया सरकारच्या महिला विभागाने लॉकडाऊनच्या काळात स्त्रियांनी घरात राहून पुरुषांसाठी चांगले कपडे घालून, मेकअप करा, जोडीदाराला खुष ठेवा असे पोस्टर्स प्रसिद्ध केले.

संदर्भ २. https://www.npr.org/2020/04/01/825051317/dont-nag-your-husband-during-lock-down-malaysias-government-advises-women

तर इंग्लंडचा बॉक्सर बिली जो सौंडर्स याने स्त्रियांना धाकात ठेवण्यासाठी त्यांना कसे पंच, मुक्के मारले पाहिजे असा विडिओ तयार करून पोस्ट केला होता. अर्थात यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्याची बॉक्सरची मान्यता रद्द केली गेली. मलेशियाने त्यांनी प्रसिद्ध केलेले पोस्टर्स काढून टाकले.

संदर्भ ३ . https://www.thesun.co.uk/sport/11279822/billy-joe-saunders-video-hit-women-coronavirus-lockdown-apology/

अशा पद्धतीने विचार करण्याची मानसिकता समाजात पितृसत्तेचे घातक स्वरूप कोरोनाच्या विषाणूपेक्षाही विखारी आहे हेच दर्शविते. एकविसावे शतक प्रगतीचे शतक म्हटले जाते. ही प्रगती नेमकी कोणाची आणि कशाची? तुमच्या देशात आणि तुमच्या घरात सर्व सुखवस्तु असल्या म्हणजे तुम्ही प्रगत झाला आहात का? याच उत्तर पुर्णपणे अजूनही नाही हेच आहे. आजही पुरुषाला स्त्रीच शरीर म्हणजे पुरुषाच्या मालकीच वाटत. बहुसंख्य पुरूषांना स्त्रीने आपल्याला नकार दिलाच नाही पाहिजे किंबहुना नकार देऊ शकत नाही. पुरुषाला जे हव ते देण हे तीच मुख्य काम आहे अशी गैरसमजूत यापेक्षा भ्रम खोलवर रूजला आहे. प्रत्येक जाती धर्मात स्त्रियांच्या लैंगिकतेवर फक्त आपलाच हक्क आहे या विचारांचे लॉकडाऊन शकतानूशतके बंदिस्तच आहे.

-रेणुका कड

Updated : 20 April 2020 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top