Home > Max Woman Blog > बालविवाह : माणूसपणाला चॅलेंज

बालविवाह : माणूसपणाला चॅलेंज

सोशल मिडीयावर एक उत्तरपत्रिका गेले काही वर्षे व्हायरल होती. त्यात शेवटच्या पानावर लिहिलं होतं, 'सर कसं ही करून पास करा,नाहीतर घरचे लग्न लावून टाकतील, मला आपली मुलगी समजा.' शालेय जीवनातील गंमती-जंमतीच्या स्वरूपातील व्हायरल या दोन-तीन वाक्यांतील दाहकता मला नेहमी जाणवते. मला त्या मुलीचा अस्पष्ट चेहरा डोळ्यांसमोर दिसतो. काय विचारांचं काहूर माजलं असेल तिच्या मनात. नको असलेलं लग्न गळ्यात पडणार, मग तो नवरा आयुष्यभर मिरवायचा. सगळी स्वप्नं बाजूला ठेवून द्यायची. भयानक आहे सगळं. वाढत्या बालविवाहांच्या घटनांवर रवींद्र आंबेकर यांचा लेख

बालविवाह : माणूसपणाला चॅलेंज
X

लॉकडाऊन काळात बालविवाहाचं प्रमाण वाढल्याच्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. सती-बालविवाह परंपरा रोखण्याच्या कामात पुढाकार घेऊन स्त्रीयांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रीयेत महत्वाचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात बालविवाह व्हावेत हे धक्कादायक आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात असे प्रकार वाढल्याचं समोर येतंय. एकीकडे जग प्रगती करतंय असं आपण म्हणत असताना ही उलटी गंगा का वाहायला लागलीय, कुठल्याच सामाजिक-राजकीय नेत्यांना यात काही भूमिका घ्यावीशी का वाटत नाही हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.

सामान्यतः कुठल्याही वाइट चाली-रितींच्या बळी या प्राधान्याने महिला असतात. जातीय-आर्थिक विषमतेच्या पहिल्या बळी ही महिला असतात. त्यामुळे लॉकडाऊनचा पहिला फटका ही महिलांनाच बसताना दिसतोय. लॉकडाऊन सुरू झाल्या झाल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या समोर यायला लागल्या. त्यानंतर रस्त्यावर चैन-मंगळसूत्र चोरीच्या बातम्या वाढल्या, याच वेळी काही गंभीर बातम्या या मानवी तस्करी, बालविवाहाच्या ही वाढल्या. एका रिपोर्ट नुसार जगभरातील साधारणतः ३ कोटी मुली-महिला अशा प्रकारच्या प्रकारांना बळी पडल्या आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आहे. सभ्य समाज म्हणून मिरवण्याचा आपला अधिकार हिरावून घेणारी आहे.

मध्यंतरी ग्रामीण भागातील काही लोकांशी बोलत असताना जाणवलं की लॉकडाऊनच्या काळात सर्व काम-धंदा बसल्यामुळे तसेच पाहुण्यांच्या संख्येवर निर्बंध आल्यामुळे अनेकांना ही लग्नकार्य उरकून घ्यायची संधी वाटायला लागलीय. पाहुणे कमी येणार म्हणजे कमी खर्च करावा लागतो. ५० च्या वर लोकांना बोलवता येत नसल्याने मानपानाच्या सर्व सोपस्कारांपासून बचाव होतो. कमी खर्चात लग्न उरकता येतं म्हणून अनेकांनी बालविवाह लावून टाकले. लॉकडाऊन मुळे मुली सतत डोळ्यासमोर दिसत असल्याने तिचं लग्न उरकण्याचा विचार अनेक पालकांच्या मनात यायला लागलाय. शिक्षण बंद असल्याने त्याचा फटका मुलींना बसतोय.

बालविवाहाचे अनेक गंभीर परिणाम मुलीवर होत असतात. तिची शारीरिक-मानसिक वाढ झालेली नसते, जन्माला आलेलं मूल हे कुपोषणाच्या गर्तेत ढकललं जातं. माता मृत्यू-बालमृत्यू तसंच आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न त्यानंतर निर्माण होतात. या सर्वांबरोबरच अनेक मानवीय आणि सामाजिक प्रश्न ही निर्माण होतात.

सोशल मिडीयावर एक उत्तरपत्रिका गेले काही वर्षे व्हायरल होती. त्यात शेवटच्या पानावर लिहिलं होतं, 'सर कसं ही करून पास करा,नाहीतर घरचे लग्न लावून टाकतील, मला आपली मुलगी समजा.' शालेय जीवनातील गंमती-जंमतीच्या स्वरूपातील व्हायरल या दोन-तीन वाक्यांतील दाहकता मला नेहमी जाणवते. मला त्या मुलीचा अस्पष्ट चेहरा डोळ्यांसमोर दिसतो. काय विचारांचं काहूर माजलं असेल तिच्या मनात. नको असलेलं लग्न गळ्यात पडणार, मग तो नवरा आयुष्यभर मिरवायचा. सगळी स्वप्नं बाजूला ठेवून द्यायची. भयानक आहे सगळं.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालाप्रमाणे जवळपास ८४ टक्के महिलांचा त्यांच्या मनाविरूद्ध विवाह होतो. लॉकडाऊन मुळे सक्तीने मोलमजूरी, लैंगिक शोषण यांचे प्रमाण ही वाढलं आहे. हे सर्व आपल्या आसपास होत असतं आणि आपण उघड्या डोळ्यांनी हे सर्व बघत असतो. आपली नैतिक जबाबदारी आहे, अशा घटनांना थांबवण्याची. जर अशा घटना होत असतील तर पुढाकार घेण्याची. दुर्दैवाने अनेक राजकीय-सामाजिक नेते यांचा अशा घटनांना पाठींबा असतो. त्यांचं स्वतःचं मत ही या घटनांच्या विपरित नसतं, आणि हेच नव्या भारतासमोरचं सर्वांत मोठ चॅलेंज आहे.

आपल्यात जराही माणूसपण शिल्लक असेल तर आपण हे चॅलेंज स्विकारलं पाहिजे. या अनिष्ट प्रथा-परंपरांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आज गप्प बसलात तर मानवजातीचा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही.

- रवींद्र आंबेकर

Updated : 12 Oct 2020 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top