Home > Max Woman Blog > नव्वदीच्या दशकातील तरूणाईचं प्रेम, ब्रेकअपस, पॅचअप्स सगळ्यांशी निगडीत गाणी गायलेला गायक म्हणजे 'KK'

नव्वदीच्या दशकातील तरूणाईचं प्रेम, ब्रेकअपस, पॅचअप्स सगळ्यांशी निगडीत गाणी गायलेला गायक म्हणजे 'KK'

काही दिवसांपुर्वी सुप्रसिध्द गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच सगळ्यांचा लाडका केके चं हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झालं. नव्वदीच्या दशकात तरूणांच्या गळ्यातील ताईत झालेला गायक म्हणजे केके. तरूणाईला प्रेम फुलवण्यासाठी मदत करणं असो ते ब्रेकअप्स पचवायला शिकवणं यावर एकच जालीम इलाज म्हणजे केके ची गाणी होती. अशा केकेच्या जाण्यावर लोकांच्या लेखण्या बोलल्या नसत्या तरच नवल! केकेच्या गाण्यांच्या आठवणी सांगणारा हा चैतन्य देशपांडे यांचा लेख!

नव्वदीच्या दशकातील तरूणाईचं प्रेम, ब्रेकअपस, पॅचअप्स सगळ्यांशी निगडीत गाणी गायलेला गायक म्हणजे KK
X

२००१-०२ नंतर जवळपास सगळ्याच शाळा कॉलेजेसच्या सेंड ऑफ पार्टीजमध्ये एक गोष्ट कॉमन असायची. प्रोजेक्टरवर जुने फोटोज लावून बॅकग्राऊंडला केकेच्या "पल" अल्बम मधलं "यारों दोस्ती बड़ी ही हसीन है" आणि "हम रहें या ना रहें कल याद आयेंगे ये पल" गाणं लावलं जायचं. सर्व नवीन-जुने, कॉलेजात आलेले-न आलेले, बाहेर पॅसेज मध्ये टाईमपास करणारे, कॅन्टीनमध्ये बसण्यापूरते येणारे सर्व पोरं आणि कॉलेजमध्ये त्यांना एरवी येत जात शिव्या मारणारे लेक्चरर्स हे सगळेच नॉस्टॅलजिक वगैरे होऊन फोटोज आणि गाण्यामध्ये हरखून जायचे.

आत्ताच्या सेंड ऑफ पार्टीजचं माहिती नाही पण दहा-बारा वर्षांपूर्वीच्या सेंड ऑफ पार्टीजला तर हे गाणं मस्ट असायचं. "यारो दोस्ती" गाणं तेव्हाचं फ्रेंडशिप सॉंग होतं. शाळेतुन बंधमुक्त होऊन कॉलेज चे लिबरल वारे वाहायला लागले की प्रत्येकाला

"बेगरज तेरा हो यार

कोई तो हो राज़दार"

असा कोणी शोधायची खुमखुमी लागलेली असते. त्याला शब्दात वर्णन करणारं आणि आवाज देणारं गाणं केकेने युथला दिलं.

हा अल्बम ज्या वर्षी रिलीज झाला त्याच वर्षी भन्साळीचा हम दिल दे चुके सनम देखील रिलीज झाला होता. सिनेमात प्रत्येक एलिमेंट भरभरून ओतल्या गेला होता. प्रत्येकाला आवडण्यासारखी गोष्ट ह्यात सापडत होती. निरागस दिसणारा आणि अभिनय करतानाचा(?) सलमान, सौंदर्याचा मापदंड असणारी आणि पडद्यावर दिलखुलास वावरणारी अल्लड सुरेख निळ्या डोळ्यांची ऐश्वर्या आणि तिने नेसलेल्या वेगवेगळ्या डिझायनर साड्या, दर्दभऱ्या डोळ्यांनी बोलणारा सावळासा अजय देवगण, भन्साळीच्या सिनेमात हमखास असणारी भव्य दिव्यता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे मोजून मापून हावभाव टिपणारा पढवलेला कॅमेरा आणि रिझवणारे आणि मनात घर करणारे संगीत हे सगळं सगळं असताना त्यात एक व्यक्ती एक आवाज आपलं वेगळं अस्तित्व तयार करून गेला. आपल्या आर्त स्वरात, हृदयाला चरे पडणाऱ्या आवाजात गाणारा केके.

कित्येकांच्या रात्रीच्या प्लेलिस्ट मध्ये हे "तडप तडप के" गाणं सापडतच. हे गाणं वॉकमनवर लावून, हेडफोन कानात कोंबून माझ्या इमीजीएट आधीची पिढी तिचे ब्रेकप्स हँडल करू शकली. त्या काळात तेव्हाच्या पिढीचे हे हक्काचे ब्रेकप सॉंग. हे गाणं ऐकतांना प्रत्येक हार्टब्रोकन मुलगा समीर आणि मुलगी नंदिनी झालेली असायची.

केकेने लेट-नाईनटीजचा काळ आपल्या आर्त आवाजाने सुरेल बनवला आहे. तेव्हाच्या तरुणांना त्यांच्या फिलिंग एलाबोरेट करण्यासाठी हक्काचा आवाज उपलब्ध करून दिलाय. प्रत्येक दशकाचा एक किशोर कुमार असतो. आमच्या दशकाचा केके हा मोस्ट एलिजीबल किशोर कुमार होता. झंकार बिट्स सिनेमा कुणी बघितला असेल नसेल पण "तू आशिकी है" प्रत्येकाला पाठ आहे, MP3 हा सिनेमा केवळ केकेने गायलेल्या "मेरा पहला पहला प्यार" ह्या गाण्यामुळे कॉलेजेसच्या शेवटच्या बेंच पासून थेट पहिल्या बेंचपर्यंत पोहचला.

या नवीन पिढीच्या ब्लुटूथ, हेडफोन्स मध्ये तनिष्क बागची, बादशाह, भसाड्या आवाजात ओरडणारा बी प्राक वगैरे लोकांचे आवाज घुमत असतांना आम्ही कॉलेजेस च्या कॅन्टीन मध्ये बसून कढीसमोसे खात खात केकेच्या आवाजाने तृप्त होत गेलो आहोत आणि आमचा पण सेंडऑफ "यारो दोस्ती" गाण्यावर झाला ह्याची निश्चितच सुपेरिअर फिलिंग येते.

केके हा खूप काही फेममध्ये नव्हताच. सततच्या पार्टीज, टीव्हीवरचे अनावश्यक सिंगिंग शोज, स्कॅंडल्स, वादविवाद ह्यात तो कधी पडलेला दिसला नाही. कदाचित इन्ट्रोव्हर्ट असावा. पण गायक लोकांचं एक बरं असतं. वेगळी अशी आठवण ठेवायची गरज नसते; प्लेलिस्ट मधले त्यांचे गाणे त्यांना सतत जिवंत ठेवतात.

नाईन्टीज आणि लेट नाईन्टीजच्या तरुणांचा इमोशल कोशंट सांभाळणाऱ्या केकेला विनम्र श्रद्धांजली.

- चैतन्य देशपांडे

Updated : 3 Jun 2022 5:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top