Home > Max Woman Blog > बुद्ध वंदन   

बुद्ध वंदन   

बुद्ध वंदन   
X

नेपाळ सरकारने वर्ष २०२० हे पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी नोकरीत असताना माझं दोनदा नेपाळला जाणे ऐनवेळी रद्द करावे लागले होते. त्यामुळे काही झाले तरी यावेळी नेपाळला जायचेच असा मी निश्चय केला होता. नेपाळला भेट देण्यासाठी मी पूर्वी नोकरी करत असलेल्या दूरदर्शन मधील मित्र निर्माता राम खाकाळ आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत मित्र झालेले अपर सचिव बी एस गायकवाड असं आमचं त्रिकुट जमलं. बजेट प्रमाणे ट्रॅव्हल एजन्सी बघितली .

नेपाळमध्ये धार्मिक व पर्यटन स्थळे खूप आहेत. गौतम बुद्ध यांचं लुम्बिनी हे जन्म स्थान नेपाळमध्येच आहे. देश विदेशातुन बुद्ध धर्माचे भिख्खू, अनुयायी, श्रद्धाळू दररोज तिथे हजारोंच्या संख्येने येत असतात. नेपाळ सरकारने हे स्थान अतिशय सुंदर ठेवले आहे. शिवाय विविध देशातील सरकारांनी, संस्थांनी या स्थानाच्या सौंदर्यात भर घातली आहे. इथल्या प्रसन्न वातावरणात दिवस कसा जातो हे कळत नाही.

लुम्बिनी येथे इस. पूर्व ५६३ ला वैशाख पौर्णिमेला, कपिलवस्तू नगरीचे शुद्धोदन राजा व महामाया राणीच्या पोटी सिद्धार्थ राजकुमारचा जन्म झाला. वयाच्या २९ व्या वर्षी सिद्धार्थाने गृह त्याग केला. प्रचलीत शारिरीक यातनामय साधना पद्धतींचा सहा वर्षे अवलंब केला. याने दु:खमुक्ती ऐवजी शरीर मुक्तीचा अंतिम टप्पा गाठला. ईच्छीत फल प्राप्तीऐवजी मरणासन्न अवस्था प्राप्त झाली. सिद्धार्थचा राजबिंडा देह हाडांचा सापळा झाला. सिद्धार्थने सुजाताची खीर खाऊन साधना पद्धतीत बदल केला. ऐषो आरामाचे टोक व शरीर यातनेचे टोक या दोन्हींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मध्यम मार्ग निवडला. बुद्ध गयेला पिंपळ वृक्षाखाली ई, स, पूर्व ५२८ला, वैशाख पौर्णिमा दिनी, सिद्धार्थ बुद्ध झाला.

सर्व ब्रम्हांड चारही ब्रम्ह विहारांनी आनंदाने न्हाऊन निघाले. गौतम बुद्धानी ४५ वर्षे सतत पायी प्रवास करत सद्धम्माचा प्रचार केला. ज्ञान प्राप्तीनंतर सारनाथ येथील मृगदाय वनात पंचवर्गीय भिक्षुंना प्रथम प्रवचन दिले. हे प्रवचन "धम्मचक्क पवत्तन" अर्थात धम्मचक्र प्रवर्तन, या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे . "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" करीता, सर्वांच्या दु:ख मुक्तीकरीता ते प्रचार करीत राहीले. वयाच्या ८०व्या वर्षी ते कुशीनगर येथे आले. येथेच दोन शाल वृक्षांच्यामध्ये त्यांनी देह त्यागला व महापरिनिर्वाण पदास ते गेले.

जन्म, ज्ञान प्राप्ती, महापरिनिर्वाण या तीन घटना वैशाख पौर्णिमेला घडून येणे, हे केवळ बुद्धांविषयीच घडले. हे तिन्ही प्रसंग पावन प्रसंग. म्हणूनच याला त्रिविध पावन पौर्णिमा असे म्हणतात.

बुद्धाने या पृथ्वीवर धर्माच्या नावाखाली ज्या जून्या परंपरा प्रचलित होत्या, त्या स्वीकारल्या नाहीत. नवीन धम्म सांगितला. नवीन इतिहास निर्माण केला.

"अत्थाहि अत्थनो नाथो, कोहि नाथो परोसिया" अर्थात मनुष्य स्वतःच स्वतःचा स्वामी त्याचा इतर कोणीही इश्वर नाही, असा स्वयं प्रकाशित बनण्याचा उपदेश केला.

विज्ञानाच्या कसोटीवर आधारित सिद्धांत म्हणजे, "कार्यकारणभाव "! अर्थात कारणाशिवाय काहीही न घडणे. या सिद्धांतामूळे शाश्वतता वादावर आपोआपच पडदा पडला. त्यांनी सांगितले की, सर्व अनित्य आहे. सर्व बदलणारे आहे. हाच निसर्ग नियम आहे.

जगात दु:ख आहे हे पूर्वी काही सांगत होते. परंतु दु:खातून मुक्त कसे व्हायचे, याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. तेच उत्तर भगवान बुद्धाने शोधून काढले. या महान कल्याणकारी दिव्य ज्ञानाचा शोध सम्यक सम्बुद्धाने वैशाख पौर्णिमेला लावला. त्या जीवन मुक्त करणाऱ्या मार्गाला "आर्य अष्टांगिक मार्ग" असे म्हणतात.

या मार्गाद्वारे शीलावर अधिष्ठीत होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दु:ख मुक्त होता येते. यालाच काही लोक मुक्ती, मोक्ष म्हणतात. भगवान बुद्धाने याला "निर्वाण" म्हटले आहे. ते म्हणतात, "निब्बाणं परमं सुखं", निर्वाण हे सर्व श्रेष्ठ सुख आहे. काही लोक, निर्वाण म्हणजे मृत्यू असा चूकीचा अर्थ काढतात. निर्वाण ही सर्व श्रेष्ठ सुखाची परमोच्च अवस्था आहे.

भगवान बुद्ध यांनी सांगितलेली विपसना मी सपत्नीक नाशिक जिल्ह्यातील धम्मगिरी येथे दहा दिवस राहून केली आहे. जगात मानसिक ताण, तणाव वाढत असताना नियमित विपसना खूप आवश्यक आहे.

जगात भारत, नेपाळ, ब्रह्मदेश, चीन, जपान, श्रीलंका, थायलँड आदी देशात बौद्ध धर्माचा विशेष प्रसार झाला आहे. भारतातील अजिंठा, वेरूळ लेणी, ब्रह्मदेश, चीन, थायलँड मधील अनेक प्रसिद्ध बुद्धविहार पहायची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. विश्व शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मनोभावे वंदन.

- देवेंद्र भुजबळ

+91 9869484800.

Updated : 7 May 2020 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top