Home > Max Woman Blog > इभ्रतीची कुस्ती : देशातील तमाम महिलांचा एकाचवेळी पराभव

इभ्रतीची कुस्ती : देशातील तमाम महिलांचा एकाचवेळी पराभव

देशातील तमाम महिलांचा एकाचवेळी पराभव देशाला ऑलिंपिक पदक मिळून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर साक्षीने हा निर्णय जाहीर केला. वाचा या भयान वास्तवावर तेजस्वी बारब्दे पाटील यांनी लिहीलेला लेख.

इभ्रतीची कुस्ती : देशातील तमाम महिलांचा एकाचवेळी पराभव
X

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका पार पडल्या आणि देशातील तमाम महिलांचा एकाचवेळी पराभव झाला. योग्य व्यक्ती निवडून देण्यासाठीची प्रक्रिया म्हणजे निवडणूक. आणि त्याच प्रक्रियेतून जर असत्य उठावदार दिसणार असेल तर आता नेमका विश्वास कशावर आणि कुणावर ठेवावा हा प्रश्न पडतोय.




देशातील सर्वोत्तम मल्ल असलेल्या साक्षी मलिक हिने काही महिन्यांपूर्वी भाजप खासदार तसेच भारतीय कुस्ती महासंघाच्या तत्कालीन अध्यक्ष असलेल्या ब्रिजभूषण सिंग वर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले होते. तिने आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा लढा उभारला. ब्रिजभूषण सिंग ला पुराव्यानिशी तिने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यावेळी या कुस्तीपटू असलेल्या दमदार पोरी अन्यायाच्या विरोधात लढताना अवघ्या देशाने बघितल्या. खरंतर इतके गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीवर शासन तातडीने कारवाई करेल अशी आशा लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. पण तसे काहीच झाले नाही. ब्रिजभूषणची हकालपट्टी होईल असा विचार करणाऱ्या भारतीयांच्या थोबाडात सरकारने अक्षरशः चपराक लागवली.लढा देणाऱ्या खेळाडू रडत राहिल्या, चिडत राहिल्या,ओरडत राहिल्या. पण सरकारने अजिबात कुठली भूमिका न घेता ब्रिजभूषण ला अगदी सेफ केले. कालांतराने कुस्ती संघाच्या निवडणुकांचे सूप वाजले. सरकारने न्याय केला नाही, पण आता निवडणुकीत मात्र न्याय होईल असा ठाम विश्वास खेळाडूंना होता. पण कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषणचाच चेला बसला, आणि साक्षी मलिक ने लढा हरल्याचे म्हणत रडवलेल्या डोळ्यांनी आपले शूज आणि माईक टेबलवर ठेवला. आणि याच क्षणाला भारतातल्या प्रत्येक स्वाभिमानी महिलेचा पराभव झाला.




एखादी महिला कुस्तीपटू देशाला अवघ्या जगात सन्मान मिळवून देते. आपण तिच्या कौतुकाच्या गाथा सर्वांना ऐकवतो. पण ज्यावेळी ती अन्यायाविरुद्ध लढायला उभी ठाकते, त्यावेळी केवळ तुमच्या राजकीय स्वार्थापायी तुम्ही तिचा आवाज दाबता. तिला जाणून दुर्लक्षित करता. आणि त्या अन्याय करणाऱ्या गुन्हेगाराला मात्र सत्तेत ठेवून मोकाट फिरण्याची सूट देता, अशावेळी सरकार म्हणूनच काय पण माणूस म्हणूनही तुम्ही केवळ षंढ असता. तुमच्या सो कॉल्ड हिंदुराष्ट्रात शुभ्र कपड्यातील हसऱ्या चेहऱ्याची भारतमाता अश्यावेळी खरंच हसू शकेल का? बेटी बचाओचे नारे या देशात जोरजोरात दिल्या जातात. नवरात्रात मुलींचे पाय धुवून तिची पूजा ह्या देशात केल्या जाते. आणि नवरात्राची नवलाई संपली की त्याच मुलींना दुर्लक्षित करून त्यांचा आवाज दाबला जातो. अश्यावेळी खरंच ती दुर्गा तुम्हाला आशीर्वाद देत असेल का? कुस्तीपटूवर झालेला अन्याय असो की मणिपूर मध्ये महिलांवर झालेला अत्याचार असो, या देशाचे ५६ इंच छाती असलेले प्रधानसेवक या घटनांवर ब्र सुद्धा काढत नाहीत. उलट गुन्हेगारांना अभय देण्याचं काम करतात. संसदेत विरोधी पक्षाच्या शेकडो खासदारांना एका क्षणात निलंबित करू शकतात. पण ब्रिजभूषण सारख्या लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगाराला मात्र पदावर कायम ठेवल्या जातं. कोणत्या मार्गाने होतोय देशाचा प्रवास?




ब्रिजभूषणचा चेला निवडून येणे आणि साक्षी मलिक ने आपले शूज टेबलवर ठेवत कुस्तीला रामराम करणे ही घटना देशाच्या इभ्रतीला काळिमा फासणारी आहे. हा मुद्दा एकट्या साक्षी मलिक किंवा विनेश फोगाटचा नाहीये, तर इथे जगणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी बाईचा आहे. लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप आणि त्याविरोधात न्यायासाठी लढणाऱ्या महिला जर या देशात सर्वांदेखत हरत असतील, तर देशाची लोकशाही नेमकी कुठे टांगून ठेवलीय हा प्रश्न सामान्य माणसाला सहज पडतो आहे. लोकशाहीला दाबून जी हुकूमशाही आणायचा प्रयत्न या देशात होतोय तो अतिशय भयंकर आहे. आणि हुकूमशाहीचे वारे वाहायला देशात सुरुवात झालीय हे कालच्या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. हुकूमशाही भित्री असते. हुकूमशाही पोचट असते. आणि या महिलांचा आवाज दाबून ज्या हुकूमशाही पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळल्या गेलं ते अतिशय घृणास्पद आहे. खालच्या पातळीचं आहे.




साक्षी मलिकचे रडवलेले डोळे काल देशातील महिलांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा बुरखा टराटर फाडत होते. तिचा घोगरा आवाज इथल्या महिलांची घुसमट बोलून दाखवत होता. आणि ज्या खेळात ती सर्वोत्तम होती आणि ज्या खेळाच्या माध्यमातून तिने देशाची मान उंचावली, त्याच खेळाला रामराम करणारी साक्षी मलिक, हा देश कसा अराजकतेच्या प्रवासाला निघालाय ते सांगत होती. देशाची या वळणाची वाटचाल इथल्या महिलांसाठी धोक्याची आहे. बेटीबचाओ च्या नाऱ्याखाली दबत चाललेले महिलांचे आवाज आणि हुंदके ही अराजकता माजवणाऱ्यांना कधीही माफ करणार नाहीत. लोकशाहीला पद्धतशीरपणे गुंडाळून हुकूमशाहीला जन्माला घालणारे हे नराधमच साक्षी मलीकच्या अश्रुंचे खरे गुन्हेगार आहेत. भारतातल्या संबंध महिलांचे ते गुन्हेगार आहेत. देशाचा हा असा प्रवास भयावह आहे. आकलनापलीकडचा आहे.

- तेजस्वी बारब्दे पाटील, अमरावती



Updated : 23 Dec 2023 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top